मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:06 AM2023-06-27T09:06:52+5:302023-06-27T09:15:31+5:30

Michael Jackson: ‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सन. परवाच त्याचा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त जगभरात त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणी जाग्या केल्या. त्याच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं आणि गूढतेचं वलय त्याच्या मृत्यूनंतरही कायम होतं.

Michael Jackson: Wanted to Live 150 Years; But.. | मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण..

मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण..

googlenewsNext

‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सन. परवाच त्याचा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त जगभरात त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणी जाग्या केल्या. त्याच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं आणि गूढतेचं वलय त्याच्या मृत्यूनंतरही कायम होतं. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, तो दिवस तर त्याचे चाहते आजही विसरलेले नाहीत.

२५ जून २००९. लॉस एंजेलिस. दुपारी दोन वाजून २६ मिनिटांनी अचानक दूरचित्र वाहिन्यांवर वृत्त झळकायला लागलं. मायकेल जॅक्सन यांचं निधन!.. अनेकांसाठी तो खूप मोठा धक्का होता. या धक्क्यानं अमेरिकेत अनेक लोक रस्त्यावरच बेशुद्ध पडले. काही मिनिटांतच सोशल मीडिया वेबसाईट्स क्रॅश झाल्या. नैराश्यात गेल्यानं १३ जणांनी आत्महत्या केली! सुसाईड प्रिव्हेन्शन हॉटलाइनवरही जगभरात शेकडो कॉल आले. हॉटलाइनवर असलेल्या तज्ज्ञांनी त्यांना कसंबसं आत्महत्येपासून परावृत्त केलं. 

ज्या मायकेल जॅक्सनला तब्बल दीडशे वर्ष जगायचं होतं, तो केवळ पन्नाशीतच कसा काय मृत्युमुखी पडला याचं अनेकांना आश्चर्य वाटत होतं. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे लोकांना जाणून घ्यायचं होतं. खुद्द मायकेल जॅक्सनलाही वाटत होतं, आपण दीडशे वर्ष नक्कीच जगू. त्यासाठी त्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न, प्रयोगही सुरू होते. आपलं वय ‘वाढू नये’, ते शरीर-मनावर दिसू नये, यासाठी मायकेल थेट ऑक्सिजन चेंबरमध्येच झोपायचा. आपल्या वयाची वाढ खुंटावी यासाठीचा हा प्रयोग होता. त्याशिवाय आपल्या राहत्या घरीच त्यानं तज्ज्ञ अशा बारा डॉक्टरांची टीम आपल्या दिमतीला ठेवली होती. हे डॉक्टर कायम त्याच्या सोबत असायचे. मायकेलनं काय खावं-प्यावं, कोणत्या वेळी काय करावं, याचा सल्ला ते त्याला द्यायचे. ही टीम त्याची सर्वतोपरी काळजी घेण्याबरोबरच त्याच्या औषधांचं डाएटही ठरवून द्यायची. एवढंच नाही, त्याचं खाणं-पिणंही आधी प्रयोगशाळेत टेस्ट केलं जायचं. त्यानंतरच तो ते खायचा! आपल्या आवाजाचा पिच उंच राहावा यासाठी फिमेल हार्मोनल इंजेक्शन्सही तो घ्यायचा!

अत्यंत गरीब परिस्थिती ते गडगंज संपत्तीचा मालक आणि पुन्हा दिवाळखोरीची अवस्था अशा सर्व चक्रातून मायकेल गेला होता. मायकेलचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी इंडियाना येथे झाला होता. आठ भावंडांमध्ये मायकेल सर्वांत धाकटा. केवळ दोन छोट्या खोल्यांत ते राहायचे. मायकेलचे वडील जोसेफ वॉल्टर (जोई जॅक्सन) बॉक्सर होते. ते गिटारही वाजवायचे. मायकेलची आई कॅथरीन पियानो वाजवायची. 

खायचे फारच लाले पडल्यानंतर १९६४मध्ये मायकेलच्या वडिलांनी ‘जॅक्सन ब्रदर’ नावाचा आपला घरचाच एक म्युझिकल बॅण्ड तयार केला. त्यात घरातलीच सारी मंडळी गाणं-बजावणं करायची. मायकेलच्या वडिलांना खास करून मायकेलचा फार राग यायचा. एकतर त्याचं नाक चपटं, चेहराही वाकडातिकडा. हे पोरगं काही कामाचं नाही म्हणून ते कायम त्याच्यावर चिडायचे, डाफरायचे. त्यात परफॉर्मन्स खराब किंवा त्यांच्या मनासारखा झाला नाही, तर कंबरेच्या बेल्टनं मायकेलची पिटाई ठरलेली. 

नवनवीन गाणी लॉन्च केल्यामुळे या बॅण्डचं थोड्याच काळात बऱ्यापैकी नाव झालं. पण, लवकरच हा बॅण्ड बंदही पडला. नंतर मायकेलनं चित्रपट क्षेत्रातही उमेदवारी करून पाहिली. पण, त्याचा पहिलाच चित्रपट ‘द विज’ चांगलाच आपटला. मात्र या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर क्विन्सी जोन्स यांनी मायकेलचं टॅलेण्ट ओळखलं होतं. त्यांनी मायकेलला सोबत घेऊन तीन सोलो म्युझिक अल्बम लॉन्च केले. ते चांगलेच लोकप्रिय झाले. त्यानंतर मात्र मायकेलनं मागे वळून पाहिलं नाही. मायकेलचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण लगेच समजू शकलं नाही, पण औषधांच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. मायकेलच्या मृत्यूवेळी त्याचा मुख्य डॉक्टर त्याच्या सोबतच होता. नंतर निष्काळजीपणाबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं.

मृत्यूनंतर कमाईत प्रचंड वाढ
मृत्यूसमयी मायकेल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता; पण मृत्यू होताच त्याची ‘कमाई’ प्रचंड वाढली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचं कर्ज चुकतं केलं. मृत्यूनंतरही सर्वाधिक कमाई करणारा तो गायक होता! मायकेलचा मृतदेह सोन्याच्या शवपेटीत पुरण्यात आला होता. डान्स करताना १९७८मध्ये त्याचं नाक तुटलं होतं. त्यानं अनेकदा प्लास्टिक सर्जरी केली होती. आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या मायकेलची स्किनही १९८३नंतर अचानक बदलली आणि तो ‘गोरा’ दिसायला लागला. त्वचेच्या आजारामुळे त्याच्या अंगावर पांढरे-काळे डाग पडले होते. ते लपवण्यासाठी त्याला ब्लिचिंग आणि व्हाईट मेकअप करावा लागायचा. पण त्याचमुळे त्याच्यावर वर्णद्वेषाचाही आरोप झाला.

Web Title: Michael Jackson: Wanted to Live 150 Years; But..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.