शाळकरी मुलाहाती बंदूक, हा पालकांचा दोष?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:07 AM2022-01-19T10:07:19+5:302022-01-19T10:10:29+5:30
मिशिगनमधल्या इथन क्रम्बलीच्या निमित्ताने अमेरिकेत नवी चर्चा सुरू झाली आहे : शाळेत बंदूक चालल्यास जबाबदारी (कुणा) कुणाची?
- डॉ. गौतम पंगू, ज्येष्ठ औषधनिर्माण शास्त्रज्ञ, फिलाडेल्फिया, अमेरिका
३० नोव्हेंबर २०२१. मिशिगन राज्यातल्या ऑक्सफर्ड गावातल्या १५ वर्षांच्या इथन क्रम्बलीने त्याच्या शाळेत केलेल्या गोळीबारात चार विद्यार्थी प्राणाला मुकले आणि सात जण जखमी झाले. वास्तविक ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना; पण अमेरिकेत सर्रास होणारी मास शूटिंग्ज आणि नंतर चार दिवस उमटून शांत होणाऱ्या ठराविक प्रतिक्रिया हे सगळेच एका खिन्न करून सोडणाऱ्या चाकोरीचा भाग झालाय; पण यावेळी मात्र एक गोष्ट नेहमीपेक्षा वेगळी घडली. इथनबरोबर जेम्स आणि जेनिफर या त्याच्या आई-वडिलांनाही या गुन्ह्याबद्दल अटक झाली.
आतापर्यंत शाळांतल्या गोळीबाराच्या बहुसंख्य घटनांमध्ये बंदूक घरातूनच येत असली तरी पालकांना जबाबदार धरण्यात आल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ आहेत; पण यावेळी मात्र सरकारी वकील कॅरन मॅक्डोनाल्ड यांनी इथनच्या आई-वडिलांवर मनुष्यवधात अनैच्छिक सहभाग घेतल्याचा आरोप ठेवला आहे. हा निर्णय त्यांनी का घेतला, तो योग्य की अयोग्य, याबद्दल अमेरिकेत चर्चेला उधाण आलेय.
इथनला काही मानसिक समस्या होत्या. ‘आपल्या घरात भूत आहे’ असे टेक्स्ट मेसेजेस तो काही महिन्यांपासून आपल्या आईला करीत असे. प्राण्यांचा छळ करून त्यांना ठार मारतानाचे स्वतःचे व्हिडिओ त्याने बनविले होते. चक्क एका मृत पक्षाचे डोके आपल्या खोलीत सहा महिने ठेवले आणि नंतर तो ते शाळेच्या बाथरूममध्ये ठेवून आला होता; पण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या संगोपनाकडे कधीच फारसे लक्ष दिलेले नसायचे. त्याच्यासाठी त्यांनी कधी मानसशास्त्रीय मदत घेतली नाही.
नोव्हेंबरमध्ये थॅंक्सगिव्हिंगच्या वेळी जेम्स क्रम्बलीने इथनबरोबर जाऊन नवीन बंदूक विकत घेतली. इथनने त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केली. त्याची आई-जेनिफरनेही ‘ही बंदूक हे माझ्या मुलाचे ख्रिसमस प्रेझेंट आहे’ असे सोशल मीडियावर मिरविले. त्यांनी ही बंदूक किंवा घरातल्या अन्य बंदुका इथनपासून सुरक्षित ठेवायचेही कष्ट घेतले नाहीत.
नंतर थोड्याच दिवसांनी इथन शाळेत सेलफोनवर बंदुकीच्या गोळ्यांबद्दल माहिती शोधताना त्याच्या शिक्षिकेला दिसला. शाळेने त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. नंतर थोड्याच दिवसांनी त्याने आपल्या गणिताच्या वर्कशीटवर काढलेले गोळीबाराचे रक्तरंजित चित्र आणि ‘हे विचार थांबत नाहीयेत. मला मदत करा’ असा मजकूर अजून एका शिक्षिकेला दिसला. शाळेने ताबडतोब त्याच्या आई-वडिलांना बोलावून घेतले आणि ४८ तासांत इथनचे समुपदेशन सुरू करावे लागेल, असे सांगितले; पण तेव्हाही त्या दोघांनी आपण नुकतीच त्याला बंदूक घेऊन दिल्याचे सांगितले नाही, त्याला घरी घेऊन जायलाही नकार दिला आणि त्याच दुपारी हा भयानक प्रकार घडला. गोळीबाराची पहिली बातमी ऐकल्याऐकल्या जेम्सने ९११ ला फोन करून ‘गोळीबार करणारा इथन असू शकतो’ हे सांगितले आणि जेनिफरने टेक्स्ट मेसेज करून त्याला थांबवायचा प्रयत्न केला; पण जे व्हायचे ते घडून गेलेच होते! जेम्स आणि जेनिफरवर गुन्हा दाखल केला असला तरी तो सिद्ध करणे तितकेसे सोपे नाही. मिशिगनमध्ये १५ वर्षांच्या मुलाला बंदूक बाळगायची परवानगी नसली तरी बंदूक ज्यांची आहे त्यांनी ती मुलांपासून सुरक्षित ठेवावी असाही कोणता कायदा नाही. शिवाय त्या दोघांवर मनुष्यवधाचा आरोप असल्याने त्यांना नुसतीच इथनच्या मानसिक समस्यांबद्दल माहिती होती हे दाखवून भागणार नाही, तर त्याच्यात धोकादायक हिंसक प्रवृत्ती आहेत याचीही कल्पना होती हे सिद्ध करावे लागेल.
आई-वडिलांवर गुन्हा दाखल करायच्या निर्णयाचे ‘गन कंट्रोल’चा पुरस्कार करणाऱ्या गटांकडून स्वागतच झालेय. अमेरिकेच्या घटनेने नागरिकांना बंदुका बाळगायचा हक्क दिलाय, त्याबरोबर बंदुका सुरक्षितपणे वापरल्या जातील याची जबाबदारीही दिलीय. या उदाहरणावरून बाकीचे आई-वडील आणि बंदुका बाळगणारे लोक धडा घेतील आणि आपल्या बंदुका मुलांपासून तरी सुरक्षित ठेवतील.
शाळांची सुरक्षा वाढविणे हा अशा गोळीबाराच्या घटनांची तीव्रता कमी करायचा उपाय आहे; पण पालकांना ‘ही आपली कायदेशीर जबाबदारी आहे’ याची जाणीव झाली तर या घटना मुळात घडणेच कमी होईल, असे या समर्थकांचे म्हणणे! पण या निर्णयाला विरोधही होतोय आणि तोही फक्त बंदूक-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या ‘उजव्यां’कडूनच नव्हे, तर समाज आणि कायद्याच्या अभ्यासकांकडूनही. मुलांच्या गुन्ह्याची शिक्षा सरसकट पालकांना द्यायला सुरुवात झाली तर त्याचा फटका समाजातल्या गरीब, अल्पसंख्यांक, गोऱ्या सोडून अन्य वर्णाच्या लोकांना जास्त बसेल आणि न्यायव्यवस्थेतला पक्षपात अजून वाढेल असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय क्रम्बली मातापित्यांचे वागणे कितीही निष्काळजी, मूर्खपणाचे आणि अनैतिक असले तरी त्यांना फार तर दिवाणी न्यायालयात दंड होऊ शकेल, पण त्यांना ‘गुन्हेगार’ ठरविण्यासाठी भावनेच्या भरात कायदा हवा तसा वाकवायचा प्रयत्न करणे अयोग्य आहे, असे हे विरोधक म्हणतात.
मुळात जर बंदुकांच्या वापरावर नियंत्रण आणणारे कायदे मंजूर झाले तर अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल; पण अमेरिकेत बंदुका बाळगायच्या हक्काची नाळ थेट मूलभूत व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलेली असल्याने आणि नॅशनल रायफल असोसिएशनसारख्या संस्थेची राजकारणातली ‘लॉबी’ मजबूत असल्याने हे कायदे कधीच पुढे सरकत नाहीत. या दुर्घटनेनंतर काही दिवसांतच रिपब्लिकन पक्षाच्या थॉमस मॅसी आणि लॉरेन बोबर्ट या लोकनियुक्त प्रतिनिधींनी आपापल्या परिवाराबरोबर ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारे फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते आणि त्या फोटोंमध्ये प्रत्येकाच्या-अगदी लहान मुलांच्या सुद्धा हातात बंदूक होती!
सरकारी वकिलांनी क्रम्बली माता-पित्यांबरोबर इथनच्या शाळेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केलाय. त्यांच्या मते, इथनचे एकंदर वागणे लक्षात घेऊन शाळेने आधीच काही पावले उचलली असती तरी हा प्रकार टळला असता. इथनच्या गुन्ह्याची जबाबदारी त्याच्याबरोबरच पालकांवर आणि शाळेवर टाकण्याची वेगळी दिशा पकडणाऱ्या या खटल्याचा निकाल कसा लागतो हे बघणे मत्त्वाचे ठरणार आहे. सर्वसंबंधित घटकांमध्ये किमान एक सामूहिक जबाबदारीची भावना वाढीला लागली तर बरेच निरागस जीव वाचतील, यात शंका नाही!
gautam.pangu@gmail.com