मिहानला योगसामर्थ्याची संजीवनी ?

By admin | Published: September 16, 2016 01:38 AM2016-09-16T01:38:08+5:302016-09-16T01:38:08+5:30

नागपूरच्या मिहान या कधीकाळच्या महत्त्वाकांक्षी, बहुचर्चित व बहुप्रतीक्षित प्रकल्पातील एक कोटी रुपये एकर किमतीची २३० एकर जमीन केवळ २५ लाख रु. एकर

Mihanna Sanjivartha Yogasarthartha? | मिहानला योगसामर्थ्याची संजीवनी ?

मिहानला योगसामर्थ्याची संजीवनी ?

Next

नागपूरच्या मिहान या कधीकाळच्या महत्त्वाकांक्षी, बहुचर्चित व बहुप्रतीक्षित प्रकल्पातील एक कोटी रुपये एकर किमतीची २३० एकर जमीन केवळ २५ लाख रु. एकर एवढ्या अल्पदराने योगगुरू रामदेवबाबा यांना देऊन राज्य व केंद्र सरकारने त्या बाबांच्या औद्योगिक महत्त्वाकांक्षांना बळ देतानाच आताशा मृतवत वाटू लागलेल्या मिहानमध्येही थोडीशी धुगधुगी आणली आहे. मिहानमध्ये येऊ घातलेले अनेक बडे उद्योग अजून रस्त्यात थांबले आहेत आणि तेथे आलेले थोडे उद्योगही अजून स्थिरावायचे राहिले आहेत. तेथे व्हावयाचे एक अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र अजून स्वप्नात राहिले असताना रामदेवबाबांचा हा प्रकल्प तेथे केवळ त्यांच्या योगसामर्थ्याच्या बळावरच अवतरला आहे. त्या सामर्थ्याला अर्थातच केंद्रीय भूतलमंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सामर्थ्याचीही जोड आहे. मुळात विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मिहानची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या प्रकल्पात दरवर्षी किमान पाच लक्ष अभियंत्यांना नोकऱ्या मिळतील अशा त्याच्या जाहिराती झाल्या. दर दहा मिनिटाला जगभरातून आयात होणारा माल त्यातील विमानतळावर उतरेल व तेथून तो जगाच्या व देशाच्या इतर भागात पाठविला जाईल असे तेव्हा सांगितले गेले. तसे सांगण्यात काँग्रेसएवढेच भाजपचे पुढारीही आघाडीवर होते. प्रत्यक्षात त्यातले काहीएक झाले नाही. एकदोन प्रकल्प आले आणि तेवढ्यावर सारे थांबले. मध्यंतरी मिहानची जागा काही खासगी विद्यापीठांना देऊ करण्याचा विचारही जोर धरताना दिसला. (उच्च शिक्षण हाही आता उद्योगच झाला असल्यामुळे त्याचे औद्योगिक प्रकल्पातले तसे आगमन यथोचितही ठरले असते.) वास्तव हे की राजकारणाने जनतेच्या केलेल्या फसवणुकीचे मिहानएवढे मोठे उदाहरण देशात दुसरे नाही. त्यामुळे त्या पडित प्रकल्पावर रामदेवबाबांनी त्यांचा अन्न प्रकल्प उभा करून त्याला संजीवनी पुरविण्याचे जे काम हाती घेतले त्याबद्दल त्यांचे व त्यांना आणण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. जी जमीन इतरांना चार पट किमतीने मिळायची ती त्यांना पावपट किमतीत दिली गेली याबद्दल काही ‘असंतुष्टांनी’ केलेली टीका खरी असली तरी भारतीय संस्कृतीत योगी म्हणविणाऱ्याबद्दल आपण उदार व आदराची भूमिका घेतली पाहिजे एवढेच त्यांनाही सांगायचे. रामदेवबाबांना दिलेल्या या एकरी ७५ लक्ष रुपयांच्या दक्षिणेची रक्कम इतरांना यापुढे द्यावयाच्या जमिनीच्या भावात वाढ करूनही भरून काढता येणे शक्य आहे व तसेच ते होईल. नपेक्षा बाबांच्या प्रकल्पात ज्या ‘हजारों’ना नोकऱ्या व कामे मिळणार आहेत तीच त्या रकमेची भरपाई समजता येईल. रामदेवबाबा हे भाजपचा उघड प्रचार करतात. श्री श्रींसारखा भिऊन छुपा प्रचार करणाऱ्यातले ते नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी सरकार जास्तीचे उदार धोरण स्वीकारील हे उघड आहे. आपणही त्यांचा होतो तो लाभ करून घेऊन आनंद मानावा हेच अधिक शहाणपणाचे आहे. त्यातून रामदेवबाबा हे नुसते योगगुरू राहिले नाहीत. १५ हजार कोटींचा उद्योग उभारणारे ते देशातील आघाडीचे उद्योगपतीही झाले आहेत. त्यांच्या औद्योगिक महत्त्वाकांक्षा हिंदुस्थान लिव्हरसह देशातल्या बड्या कंपन्यांना आव्हान देण्याच्या आहेत. त्या बड्या उद्योगांपुढे कायद्याच्या अडचणी आहेत. त्यांच्या प्रकल्पांना, हालचालींना आणि योजनांना सरकारच्या अनेक खात्यांची पूर्वपरवानगी लागत असते. रामदेवबाबांचे सामर्थ्य अशा परवानग्या त्यांच्या पायाशी खेचून आणत असल्यामुळे व त्यांच्या औषधादी प्रकल्पांना वैद्यकीय स्वरुपाची वैधानिक प्रमाणपत्रे लागत नसल्यामुळे ते या कंपन्यांना अल्पावधीत मागे टाकतील व आपल्या विजयाचा झेंडा उभारतील याविषयी आपणही आश्वस्त राहिले पाहिजे. शिवाय इतर कंपन्यांच्या कमी प्रतिच्या उत्पादनाला नावे ठेवणे ही कायद्यात व व्यवहारात बसणारी बाब आहे. पतंजलीच्या उत्पादनाला नाव ठेवणे हा परंपरेचा अपमान ठरणार आहे. त्यांच्या वैद्यकीय उत्पादनांवर आक्षेप आले तरी त्यांना हात लावण्याची देशाच्या सार्वभौम सरकारला हिंमत झाली नाही ही बाब आपण सदैव ध्यानात ठेवली पाहिजे. तात्पर्य, अल्प किमतीत जमीन, सरकारचे सर्वतोपरी साहाय्य आणि टीकामुक्तीचे अभय अशा योगसामर्थ्यामुळे प्राप्त झालेल्या कवचांच्या बळावर पतंजलीचा उद्योग मोठा होईल याविषयी आपणही साशंक असण्याचे कारण नाही. तसाही बाबांनी योगाचा वर्ग थांबवून आपल्या औद्योगिक कामांकडे आता जास्तीचे लक्ष घातले आहे. कोणत्याही मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनाची नसतील एवढी बाबांच्या खाद्यपदार्थांची दुकाने आता गावोगाव दिसू लागली आहेत. शिवाय त्यांच्या निष्ठावान ग्राहकांचा वर्गही मोठा व वाढता आहे. मात्र एखाद्या योग्याला वा धर्मपुरुषाला राजसत्तेने सन्मान देणे समजण्याजोगे असले तरी त्यापैकी एखाद्याने उभारलेल्या उद्योगाच्या वा व्यवसायाच्या मागे सरकारने आणि राजकारणाने उभे होणे हा प्रकार बराचसा गूढ वाटावा असा आहे. काही का असेना मिहानचे मढे झाले असे लोक म्हणू लागले असताना रामदेवबाबांनी त्यांच्या अन्न प्रकल्पाच्या उभारणीने त्या मृतवत वाटू लागलेल्या उद्योग क्षेत्रात थोडीशी का होईना धुगधुगी आणली याचेच समाधान मोठे म्हणावे असे आहे.

Web Title: Mihanna Sanjivartha Yogasarthartha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.