सौम्य चवीचे चायनिज

By admin | Published: June 26, 2016 03:54 AM2016-06-26T03:54:43+5:302016-06-26T03:54:43+5:30

गेली कित्येक वर्षे चायनिज हा खाद्यप्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. किंबहुना एक काळ चायनिजनेच गाजवलेला आहे. पण आपण खातो ते इंडियन चायनिज. मात्र चायनिजची चव कितीतरी

Mild Tea Chinese | सौम्य चवीचे चायनिज

सौम्य चवीचे चायनिज

Next

- भक्ती सोमण

गेली कित्येक वर्षे चायनिज हा खाद्यप्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. किंबहुना एक काळ चायनिजनेच गाजवलेला आहे. पण आपण खातो ते इंडियन चायनिज. मात्र चायनिजची चव कितीतरी वेगळी आणि सौम्य असते.

आजकाल हॉटेलमध्ये जेवायला जायचे तर अनेक जण पिझ्झा, पास्ता आणि मेक्सीकन पदार्थांनाच जास्त पसंती देतात. आम्ही मैत्रिणींनीही खूप दिवसांत पंजाबी जेवण काय चायनिजही खाल्लं नव्हतं. हॉटेलमध्ये जेवायला जायचा प्लॅन करताना या वेळी चायनिज खायचं असं ठरलं. त्यासाठी आॅथेटिंक म्हणजेच अस्सल चायनिज खाण्याला पसंती दिली. मग नवी मुंबईच्या हेन डायनेस्टी रेस्टॉरंटमध्ये अस्सल चायनिजचा मस्त आस्वाद घेतला.
मांचाऊ सूप म्हणजे तिखट सूप हेच समीकरण होऊन गेलं आहे. पण हे सूप पिताना त्यात पाण्याबरोबर भाज्या, हिरव्या मिरच्या, मीठ, सोया सॉस घातला होता. नेहमी पितो त्या तिखट सूपपेक्षा हे सूप अत्यंत सौम्य चवीचं होतं. तर चॉय चाऊ फन (फ्राईड राईस)मध्ये फक्त गाजर आणि फरसबी एवढ्याच भाज्या होत्या. खाताना जाणवलं की, आपण नेहमी जे चायनिज खाल्लंय ते तिखटच असतं. मग हे अस्सल चायनिज नेमकं कसं असतं? त्यामुळे हे जाणण्याची उत्सुकता वाढली.
चायनिज जेवण म्हणजे टेस्टसाठी अजिनोमोटो वापरायचंच असा एक समज आहे. पण अस्सल चायनिजमध्ये अजिनोमोटो अजिबातच वापरत नाहीत. एवढंच काय ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचा वापरही होत नाही. तर त्याऐवजी बटाटा आणि राईस स्टार्चचा वापर केला जातो, असे या हॉटेलच्या शेफ दुर्गे खडकांनी सांगितले.
बरेचदा हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक जण जेवणाआधी सूप पितात. पण चिनी जेवणाची परंपरा ही जेवणानंतर बाऊलभर सूप पिण्याची आहे. आपण जो शेजवान राईस नेहमी खात आलोय त्यात लाल रंग आणि रेड चिली पेस्टचा वापर सढळहस्ते होत असतो. पण अस्सल चायनिज शेजवान राईस एकदम कमी तिखट असतो. त्यात भाज्यांबरोबर अगदी नावालाच रेड चिली पेस्ट घातलेली असते. त्याचा थोडासा उतरलेला तिखटपणा हेच त्याचे गमक आहे. थोडक्यात चायनिजमध्ये तिखट पदार्थ करताना तिखट भरमसाठ न घालता अगदी कमी घातले जाते. या पदार्थांना फ्लेवरसाठी थोडे जाडसर दिसणारे चायनिज लसूण वापरले जाते. जे आपल्या नेहमीच्या लसणीप्रमाणे जास्त तिखट वा उग्र नसते. याशिवाय फ्लेवरसाठी सॅलरी, स्टारफूल, ड्राय रेड चिली (सुकवलेली लाल मिरची) यांचा वापर केला जातो. तर सोया सॉस, चिली सॉस यांचा अगदी थोडा वापर चवीसाठी केला जातो. चायनिज पदार्थ ज्या भांड्यात करायचा आहे त्या भांड्यात पदार्थ चिकटू नये म्हणून ते पूर्ण गरम करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर त्या भांड्यात थोड्याशा तेलात लसूण, भाज्या, सॉसेस शिजवलेला भात वा न्यूडल्स घातले जाते. तिखट खाणाऱ्या लोकांना हे सौम्य चवीचे चायनिज कदाचित मिळमिळीत लागू शकतं. किंबहुना सौम्य (ब्लंट) चवीचं चायनिज हीच तर चायनिजची खरी ओळख आहे. अशी अस्सल चव देणारी मुंबई, नवी मुंबई परिरसरात चायना बाऊल, चायना बिस्त्रो, रॉयल चायना, मॅनलेंड चायना, हेन डायनेस्टी अशी बरीच रेस्टॉरंट आहेत. ग्लोबल चव आवडणाऱ्या आजच्या तरुणाईला आता या अस्सल चवीने भुरळ पाडली आहे. थोडक्यात काय, तर जे अस्सल असते तेच टिकते. त्यामुळे आता या चवीच्या सौम्य चायनिजचा आस्वाद मात्र घ्यायलाच हवा. या चायनिज पदार्थांत आणखीही गमती आहेत, त्याविषयी पुढच्या भागात.

मधाचा मुबलक वापर : चायनिज जेवणात मधाचा वापर सलाड्स, स्टार्टसमध्ये आवर्जून केला जातो. त्यासाठी मध - मिरचीचा वापर असलेल्या हनी चिली सॉसचा वापर केला जातो. त्यासाठी थोडेसे आले, सॅलरी स्टिक्स, भरडलेली लाल मिरची, थोडीशी रेड चिली पेस्ट, मीठ हे सर्व मधात टाकून मिक्स केले जाते. असा हा सॉस क्रिस्पी बटाटा, कॉर्नमध्ये छान लागतो. आंबट, गोड आणि थोडीशी तिखट चव असलेला क्रिस्पी पोटॅटो तयार करताना बटाट्याचे चिप्ससारखे तुकडे करायचे. ते पोटॅटो स्टार्चमध्ये टाकून मिक्स करायचे आणि डीप फ्राय करून घ्यायचे. फ्राय झाल्यावर तेलात लसूण परतून घेऊन त्यात हनी चिली सॉस, सोया सॉस घालायचा आणि त्यात बटाटे मिक्स करायचे. बटाटा आणि मधाचे कॉम्बिनेशन असलेला हा प्रकार खाताना अफलातून लागतो.

Web Title: Mild Tea Chinese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.