मैलाचा दगड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:07 PM2018-12-21T22:07:46+5:302018-12-21T22:12:09+5:30

आपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात.

Milestone! | मैलाचा दगड !

मैलाचा दगड !

Next

मिलिंद कुलकर्णी
आपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात.
खान्देशात आता हळूहळू यासंबंधी जागरुकता तयार होऊ लागली आहे, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. काही व्यक्ती, संस्था त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, हे कौतुकास्पद आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील महानुभाव पंथींयांचे एकमुखी दत्त मंदीर आणि तेथे दत्तजयंतीला होणारा यात्रोत्सव, घोडे बाजार प्रसिध्द आहे. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने तेथे येतात. अश्वशौकीन घोडेबाजारात आवर्जून येतात. पण यात्रोत्सवाला देशपातळीवर नेण्यासाठी पर्यटनमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल, सारंगखेड्याचे नेते जयपालसिंह रावल यांनी पुढाकार घेऊन ‘चेतक फेस्टिवल’ची संकल्पना साकारली. राज्य सरकारच्या पर्यटन महामंडळाने या उत्सवासाठी अर्थसहाय्य देऊ केले. त्यामुळे केवळ आठवड्यासाठी असणारी ही यात्रा आता महिनाभरासाठी होऊ लागली आहे. टेन्ट सिटी, सारंगखेडा बंधाºयाच्या जलाशयाचा उपयोग करुन जलक्रीडा, चित्र प्रदर्शन, साहसी क्रीडा प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे उपक्रम नियोजित करण्यात आले. सुरुवातीला प्रतिसाद कमी असला तरी हळूहळू गर्दी वाढेल. चर्चा होईल, हा विश्र्वास निश्चित येतो. सारंगखेड्यासारख्या आडवळणाच्या गावात असा महोत्सव आयोजित करुन एक चांगला पायंडा सुरु झाला.
मराठी प्रतिष्ठानने प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने ३७०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम साकारला. जळगाव आणि वांग्याचे भरीत हे समीकरण आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यात हिरव्या मोठ्या वांग्यांना खास चव असते. कांद्याची पात, लसूण, मिरची याचा उपयोग करीत तुरकाठ्यांवर भाजलेल्या वांग्याचे भरीत आणि कांदा, मुळा, गाजर, कळण्याच्या भाकरी किंवा पुºया, कोशिंबीर असा मेनू असला की पंचपक्वानापेक्षा त्याची चव खवैय्यांना खुणावते. जगभर गेलेले जळगावकर भरीताचे दिवाने आहेत. केळीच्या मळ्यात होणाºया भरित पार्ट्यांना हुरडा पार्टीसारखी लज्जत असते. मुंबई, पुण्यात राहणाºया मूळ जळगावकरांसाठी या चार महिन्यात वांगे आणि कांद्याची पात, किंवा तयार भरित पाठविण्याची खास व्यवस्था केली जाते. गावोगाव भरीत विक्रीचे अनेक केंद्र हे खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवितात. याच भरिताला जागतिक ओळख देण्यासाठी प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी ‘विश्वविक्रमा’चा संकल्प सोडला. मराठी प्रतिष्ठानचे हरहुन्नरी कार्यकर्ते विजय वाणी आणि जमील देशपांडे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला. दत्तात्रय चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांनी जळगावच्या उपक्रमात सहभाग देऊन हा उपक्रम यशस्वी केला. विश्वविक्रमाच्या निमित्ताने जळगावच्या भरिताची चर्चा झाली. पुढे मनोहर यांच्या पुढाकाराने भरित अटकेपार जाईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
केळीच्या बाबतीत असेच काही तरी व्हावे, अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. केळी पावडर, वेफर्स यापुरती मर्यादीत राहिलेला प्रक्रिया उद्योग मोठ्या स्वरुपात होण्याची नितांत गरज आहे. नाशवंत फळ असल्याने त्याच्या दळणवळणाच्या मर्यादा आहेत. कष्ट करुनही त्याचे योग्य मोल शेतकरी बांधवांला मिळत नाही, हे लक्षात घेऊन याचठिकाणी प्रक्रिया उद्योगासाठी काय करता येईल, यावर आता नव्यापिढीने विचार करायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील आमचूरसंबंधी विचार व्हायला हवा. आदिवासींसाठी आंबा हा कल्पवृक्ष आहे, पण प्रक्रिया उद्योग नसल्याने ते केवळ व्यापाºयाचे धन होत आहे.
चेतक फेस्टिवल, भरिताच्या विश्वविक्रमामुळे सुरुवात तर चांगली झाली, असेच म्हणायला हवे.

Web Title: Milestone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.