कोट्यवधीचे शेती उत्पन्न पाण्यात

By admin | Published: October 5, 2016 03:50 AM2016-10-05T03:50:43+5:302016-10-05T03:50:43+5:30

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन,

Millions of agricultural produce in the water | कोट्यवधीचे शेती उत्पन्न पाण्यात

कोट्यवधीचे शेती उत्पन्न पाण्यात

Next

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी बहरलेली असतानाच परतीच्या पावसाने दगा दिला़ तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ पेरणी झालेले ७० टक्के खरीप एक तर वाहून गेले वा पाण्यात गेले़
आता पाहाणी होईल़ पंचनामे होतील़ आश्वासने मिळतील़ सरकार मदतही देईल़ प्रश्न आहे तो कोट्यवधीच्या नुकसानीचा आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या दोन-चार हजारांच्या मदतीचा़ मराठवाड्यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीसह सर्वच जिल्ह्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा होतो़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ७ लाख ७७ हजार ५०० एकरांमध्ये सोयाबीन होते़ त्या खालोखाल ६ लाख ३१ हजार ७२० एकरांमध्ये कापूस होतोे़ शिवाय उडीद, ज्वारीचा पेराही मोठा होता़ तुलनेने यंदा पाऊस बरा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़, परंतु परतीच्या पावसाने पिके तर पाण्यात गेलीच, शिवाय लाखो हेक्टर जमीन खरडून गेली़ एकूण पेरा झालेल्या शेती क्षेत्रापैकी ७० टक्के पेरा क्षतिग्रस्त झाला़ म्हणजेच नांदेड जिल्ह्यात सव्वापाच लाख एकरांवरील सोयाबीन आडवे झाले़ एकरी १० क्विंटल उत्पन्न निघेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता़ त्याला तीन हजार भाव जरी गृहीत धरला तरी एका जिल्ह्यात दीड हजार कोटींचे सोयाबीन उत्पन्न बुडाले आहे़ कापूस, उडीद, ज्वारीचे आणखी वेगळे़ एकंदर अतिवृष्टीने शेतमाल व्यवसायावरही संकट कोसळले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती काही उरले नाही़ अनेकांनी मोठ्या कष्टाने जमीन कसली होती़ कोरड्याठाक पडलेल्या तलावातील, मोठ्या प्रकल्पांमधील गाळाचा उपसा करून खडकाळ जमीन सुपीक केली, मात्र पावसाने काळी माती वाहून गेली़
बळीराजा आशावादी
खरीप गेले, आता रबी चांगली येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ त्या आशेवरच येणारा दिवाळ सण गोड करण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे़ जणू ओल्या दुष्काळाच्या वेदनेला भरलेल्या जलसाठ्यांची सुखद किनारही आहे़ मराठवाड्यातील धरणे, मध्यम लघुप्रकल्प ६८़१५ टक्के भरले आहेत़ गेल्या वर्षी ते केवळ ८़१३ टक्के इतक्याच जिवंत साठ्याने व्यापले होते़ मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी ७३़२७ टक्के भरले आहे़ निम्न तेरणा, दूधना, मांजरा, माजलगाव धरणेही भरली आहेत़ येलदरीत येवा सुरू आहे़ त्यामुळे केवळ जिल्हा शहरे, तालुक्याचे ठिकाणे व मोठ्या गावांना निव्वळ पेयजलासाठी गेली अनेक वर्षे राखीव असलेली धरणे सिंचनासाठी उपयोगात येतील़ रबीला पाणी मिळेल़ जलसंकटही घोंघावणार नाही़ हा सुखद अनुभव असला तरी शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीतील दुरवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही़ ज्या शेतकऱ्यांनी लाखांत उत्पन्न मिळविले असते, त्यांना हजार अन् शेकड्यावर समाधान मानावे लागते, ही शोकांतिका बदलावी लागेल़ किरकोळ मदत नव्हे, तर भक्कम नुकसान भरपाई मिळाली पाहिजे़ तीही तातडीने़
२४ जण बचावले
मराठवाड्याला दुष्काळाचे नावीन्य नाही़ अतिवृष्टी अन् पुराचे फटके मात्र अभावाने बसतात़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अन् आॅक्टोबरच्या प्रारंभाला मराठवाड्याच्या बहुतांश भागात विशेषत: नांदेड व लातूर जिल्ह्यात नद्यांना पूर आले़ शेकडो गावांचा संपर्क तुटला़ हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले़ धरणांचे दरवाजे उघडले, राज्य मार्ग नव्हे, तर राष्ट्रीय मार्गही २३ तास बंद राहिले़ त्याच वेळी लिंबोटी धरणालगत अन् इतर ठिकाणी उद्भवलेल्या पुरात २४ जण अडकले होते़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या महत्प्रयासाने हानी टळली़ मदतीसाठी आलेले हेलिकॉप्टर परतले होते़ धोका वाढला होता़ अशा बिकट स्थितीत सर्वच्या सर्व २४ जण सुखरूप बाहेर आल्याने स्थानिक आपत्ती व्यवस्थापनावरचा विश्वास अधिक बळकट झाला़
- धर्मराज हल्लाळे

Web Title: Millions of agricultural produce in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.