लाखो रुपये उधळून पक्षिमित्र उडाले भुर्रर्र्र..!

By admin | Published: January 1, 2017 11:58 PM2017-01-01T23:58:30+5:302017-01-01T23:58:30+5:30

जायकवाडी धरण आणि पक्षी अभयारण्याच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेल्या दोन पेट्रोलिंग बोटींमध्ये तेल टाकायला पैसे नाहीत.. त्यावर चालक नेमण्याची तरतूद नाही..

Millions of rupees blew up the birdcatcher Bhurrr .. .. | लाखो रुपये उधळून पक्षिमित्र उडाले भुर्रर्र्र..!

लाखो रुपये उधळून पक्षिमित्र उडाले भुर्रर्र्र..!

Next

सुधीर महाजन, (संपादक, लोकमत, औरंगाबाद)
जायकवाडी धरण आणि पक्षी अभयारण्याच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेल्या दोन पेट्रोलिंग बोटींमध्ये तेल टाकायला पैसे नाहीत.. त्यावर चालक नेमण्याची तरतूद नाही.. झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही... अशा दुष्काळी परिस्थितीत उत्साहप्रिय पक्षिमित्रांनी आणि त्यापेक्षा जास्त उत्साही वन्यजीव विभागाने या आठवड्यात औरंगाबादनजीक जायकवाडी पक्षी अभयारण्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव भरविला. दणक्यात तो साजराही केला. स्थानिक विद्यार्थ्यांना दूर ठेवत औरंगाबादेतून दोन एसटी बसेस भरून परगावातील विद्यार्थ्यांना पक्षिदर्शन घडविण्यात आले. हे विद्यार्थी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याने भाजपाचे दोन-चार कार्यकर्ते, वनविभागाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब; शिवाय बोटावर मोजण्याइतक्या पक्षिमित्रांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा झाला. त्यासाठी लाखो रुपयांची उधळण केली गेली. वन्यजीव विभाग आणि दोन-चार पक्षिमित्रांनी या महोत्सवातून काय साध्य केले? पक्ष्यांना त्याच स्थितीत सोडून लाखो रुपये उधळत सारेच भुर्रर्र झाले, आणखी काय?
जवळपास ३४० चौरस मीटर परिसरात पसरलेल्या जायकवाडी धरणाच्या जमिनीचे अधिग्रहण करताना सिंचन विभागाने सर्व शेतकऱ्यांना रीतसर पैसे देऊन ती ताब्यात घेतली. हे निष्कासित शेतकरी या जमिनीपासून दूर गेले. नंतरच्या काळात काही राजकारणी आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी ही जमीन बळकावली. थोड्याथोडक्या नव्हे तर जवळपास ३० टक्के जमिनीवर अतिक्रमण झाले. तिथे दहापट जास्त पाणी
पिणारे उसाचे पीक घेण्यात येऊ लागले. धरणातच ऊस लावायचा आणि
त्याच्या भरवशावर स्वत:चे इमले उभारायचे असा उद्योग सुरू झाला. वन्यजीव विभागाने याकडे कधी लक्ष दिलेच नाही. उसाच्या शेतीत भरमसाठ कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. ते जलजंतंूच्या मुळावर उठले आहे. पक्ष्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला
आहे. एकूणच अन्नसाखळी नष्ट
होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण काढणे सोडून इव्हेंटवर पैसे उधळण्यातच वन्यजीव विभागाने धन्यता मानली.
बरं, हा प्रश्न दोन-चार पक्ष्यांपुरता मर्यादित नाही. जायकवाडी धरणाच्या नाथसागर पाणलोट क्षेत्रावर साधारण ४५ ते ५० वर्षांपासून पक्ष्यांचे आगमन होत आहे. जायकवाडी धरणाचा पाणथळ व दलदलयुक्त परिसर या पक्ष्यांना भावतो. पक्ष्यांची संख्या वाढल्याने १९८६ मध्ये राज्य शासनाने जायकवाडी पक्षी अभयारण्य जाहीर केले. पैठण,
गंगापूर, शेवगाव, नेवासा (अहमदनगर ) येथील ११८ गावे या अभयारण्याच्या क्षेत्रात समाविष्ट केली. वन्यजीव विभागाचे कार्यालय पैठण येथे कार्यान्वित करण्यात आले. पक्ष्यांसाठी मिळालेले चार-दोन पैसे (जवळपास ४० लाख रुपये) त्यांच्या कल्याणासाठी वापरले गेले असते तर त्यांचे नष्टचर्य कायमचे दूर झाले असते. पण वन्यजीव विभाग आणि स्वत: पक्षिमित्रांनाही तसे व्हावेसे वाटले नाही. त्यांना केवळ आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचा इव्हेंट साजरा करावयाचा होता. तो त्यांनी केला. तब्बल ४० लाख रुपये उडविले.
पक्ष्यांचा प्रमुख अधिवास
असलेल्या व हजारो वृक्षसंपदा
असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयापाठीमागील परिसरातून दीड वर्षापूर्वी तस्करांनी जवळपास ९०० वृक्ष तोडून नेले. तक्रार करूनही वन्यजीव विभागाने दखल घेतली नाही. तहसीलदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. फिर्याद देण्यासाठी कुचराई करणारा वन्यजीव विभाग या इव्हेंटमध्ये मात्र प्रचंड उत्साही दिसला.
धरणाची आणि परिसरातील पक्षी-प्राण्यांची सुरक्षा व्हावी म्हणून दोन बोटी घेण्यात आल्या आहेत. वन्यजीव विभागाने या बोटींसाठी सुरुवातीपासून एका पैशाची तरतूद केली नाही. त्यामुळे अधून-मधून कधीतरी एखादा चालक घेऊन एखादी फेरी मारली जायची. दोन वर्षांपासून तीही बंद आहे. किमान १५ वर्षांपासून पेट्रोलिंग बोट केवळ नावालाच उभी आहे. या दोन्ही बोटी कार्यान्वित व्हाव्यात असे वन्यजीव विभागाला वाटले नाही. त्यापेक्षा पक्षी महोत्सवाचा हा इव्हेंट त्यांना महत्त्वाचा वाटला.
मुळात अशा इव्हेंटसाठी पक्षिमित्रांनी पैसे मागणेच चुकीचे. ती चूक त्यांनी केली. यावर वन्यजीव विभागाने त्यांना स्वत:चा ब्रॅण्ड आणि पैसाही देऊन कळस चढविला. त्यामुळे या विभागाचे पहिले प्रेम पक्षी की पक्षिमित्र, हा प्रश्न उपस्थित होतो. असे इव्हेंट साजरे करायला काहीच हरकत नाही. पक्ष्यांच्या-प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ते आवश्यकच असतात.
पण, पक्ष्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी
पैसा नसताना लाखो रुपये अशा
इव्हेंटवर उधळणे चुकीचे नव्हे काय?
एवढे करूनही अभयारण्याच्या पायथ्याशी राहणाऱ्यांना डावलून काय साध्य
केले?

Web Title: Millions of rupees blew up the birdcatcher Bhurrr .. ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.