मन नियंत्रण
By Admin | Published: March 6, 2017 11:38 PM2017-03-06T23:38:28+5:302017-03-06T23:38:28+5:30
अत्यंत प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीने मनावर खूप सखोल विचार केलेला आहे.
अत्यंत प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीने मनावर खूप सखोल विचार केलेला आहे. संपूर्ण योगदर्शन मनाची साधना आहे. भारतीय परंपरेत मनाला जे महत्त्व दिलेले आहे, ते या म्हणीनुसार पूर्णपणे स्पष्ट होते.
‘मन एव मनुष्याणां
कारणं बन्धमोक्षयो:’
अर्थातच मन हे मनुष्याच्या बंधनाचे व मोक्षाचे कारण आहे. यामुळेच भारतीय विचारवंतांनी मनावर सर्वसमावेशक भाष्य केलेले आहे. मनाची व्याख्या करताना असे सांगितले की, मन म्हणजे विचार-प्रवाह. हा विचारप्रवाह जसा असेल, त्याचप्रमाणे मनुष्याची वाणी असेल व तसेच त्याचे कर्म असेल. भारतात मनाशी संबंधित जे शास्त्र विकसित झाले आहे, त्यात प्रथम मनाला नियंत्रित करण्याबाबत सांगितले आहे व त्यानंतर त्याच्या पलीकडे जाण्याबाबत सांगितले आहे. मनाला कसे नियंत्रित केले पाहिजे या विषयी जी सर्वात महत्त्वपूर्ण बाब सांगितली आहे, ती आपल्याला श्रीमद्भगवतगीता व पातज्जल योगशास्त्रात पूर्ण स्पष्ट रूपात आढळते. श्रीमद्भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संभाषणात अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो की, मन अत्यंत चंचल व कणखर आहे आणि हेच मन व्यक्तीला हलवून टाकते. जसे
वायूला पकडणे कठीण आहे, त्याचप्रमाणे मनावर नियंत्रण मिळविणेसुद्धा अवघड आहे.
‘चन्चलं हि मन:कृष्ण’
अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्ण अत्यंत समर्पक शब्दात दिलेले आहे. तसेच एक मोठे रहस्य उघड केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, या चंचल व दुर्निग्रह मनाला नियंत्रित करण्यासाठी अभ्यास व वैराग्याची आवश्यकता आहे.
‘अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्यण च गृह्यते’
अर्थातच अभ्यास व वैराग्य या दोघांच्या कार्यानुसार मनाला नियंत्रित करता येतं. अभ्यासाची चर्चा वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. ज्ञान, भक्ती व कर्म या तीन मार्गाने मनावर नियंत्रण मिळविता येईल. योग या तिन्ही मार्र्गाचे प्रमुख तत्त्व आहे. त्यामुळेच ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग अशा शब्दांचा उपयोग केला जातो. या सर्व साधनेत मनाच्या नियंत्रणासाठी श्वासाची साधना जास्त महत्त्वपूर्ण मानली गेली आहे.
‘चले वाते चलं चित्तं
निश्चले निश्चलं भवेत।’
अर्र्थातच जेव्हा श्वास गतिमान होतो, तेव्हा मनही गतिमान असते व जेव्हा श्वास थांबतो तेव्हा मनसुद्धा नियंत्रित होते. वैराग्याद्वारे विषय-वासनाची आसक्ती कमी करून मनावर नियंत्रण करता येते. वैराग्यामुळे मन शांत तसेच स्थिर होते. अध्यात्मिक साधनेचा कळस त्यावेळी गाठता येतो, जेव्हा साधक मनाच्या पलीकडे जाऊन आत्मसाक्षात्कार करतो. हीच परमोच्च आनंदाची स्थिती आहे.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय