Mantralaya: मंत्रालय एका क्लिकवर!
By दीपक भातुसे | Published: June 25, 2023 12:57 PM2023-06-25T12:57:39+5:302023-06-25T12:57:56+5:30
Mantralaya: सरकारी काम आणि सहा महिने थांब, याची प्रचिती शासकीय कार्यालयांत येते. छोट्याशा कामासाठीही वारंवार खेटे मारावे लागतात. लालफितीच्या कारभाराचा अनेकांना वाईट अनुभव आला असेल. मात्र, कॉम्प्युटरच्या मदतीने ई-ऑफिस प्रणालीमार्फत फाइल्सचा निपटारा कसा जलद होऊ शकतो,
- दीपक भातुसे, विशेष प्रतिनिधी
सरकारी काम आणि सहा महिने थांब, याची प्रचिती शासकीय कार्यालयांत येते. छोट्याशा कामासाठीही वारंवार खेटे मारावे लागतात. लालफितीच्या कारभाराचा अनेकांना वाईट अनुभव आला असेल. मात्र, कॉम्प्युटरच्या मदतीने ई-ऑफिस प्रणालीमार्फत फाइल्सचा निपटारा कसा जलद होऊ शकतो, याचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक विकास खरगे यांनी यशस्वी केला. त्यानंतर त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागात १०० टक्के त्याची अंमलबजावणी केली. आता मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या १३ खात्यांमध्ये ३१ जुलैपर्यंत ई-ऑफिस प्रणाली १०० टक्के राबविली जाणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि १०० टक्के ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर आता मंत्रालयातील सर्व विभागांत ही प्रणाली वापरण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. राज्याच्या प्रशासनात टपाल आणि फाइल्स ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन हाताळण्यास सर्वप्रथम २०११ साली सुरुवात झाली. टपाल आणि फाइल्सचा प्रशासनातील प्रवास हा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर असा होत होता. मात्र, ज्येष्ठ सनदी अधिकारी विकास खरगे यांनी याला सर्वप्रथम छेद दिला. टपाल आणि फाइल्सचा प्रवास एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवरून असा ऑनलाइन सुरू केला. सध्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या खरगेंकडे सांस्कृतिक कार्य विभागाचा कार्यभार आल्यानंतर या विभागातही त्यांनी ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात केली. या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यासाठी सहकार्य केले. त्यापुढचा टप्पा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या १३ खात्यांमध्ये आता ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के ई-ऑफिस प्रणाली राबविली जाणार आहे, तर मंत्रालयातील इतर विभागांतही ही प्रणाली वापरण्यास हळूहळू सुरुवात झाली असून, भविष्यात मंत्रालयातील सर्व विभागांचा कारभार ई- ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाइन होणार आहे.
मोबाइलद्वारेही फाइलवर कार्यवाही
अधिकारी केवळ कार्यालयातच नव्हे, तर आपल्या मोबाइलवर किंवा आयपॅडवर प्रवासात किंवा बाहेर असतानाही फाइलवर कार्यवाही करू शकतात. त्यामुळे अधिकारी कार्यालयात नाही किंवा सुटीवर आहे म्हणून एखादी महत्त्वाची फाइल प्रलंबित राहणार नाही.
ई-ऑफिसचे शिल्पकार
२०११ मध्ये मी मसुरी अकादमीतील अधिकाऱ्यांबरोबर दक्षिण कोरियाला गेलो होतो. तेथे असताना मसुरी अकादमीतील अधिकारी लॅपटॉपवर काम करताना दिसले. मी त्यांना त्याबाबत विचारले असता, आपण ऑनलाइन फाइल्सचा निपटारा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरियात बसून फाइल्सचा अशा पद्धतीने ऑनलाइन निपटारा होत असल्याचे पाहून मी या प्रणालीबाबत अधिक माहिती घेतली. आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांत ही प्रणाली राबविली जाणार आहे.
- विकास खरगे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव
जलदगतीने फाइल्सचा प्रवास
कक्ष अधिकारी फाइल तयार करतो. त्यानंतर ती फाइल संबंधित विभागाचे उपसचिव, सहसचिव, अवर सचिव, सचिव आणि नंतर मंत्र्यांकडे जाते, तर काही फाइल्स पुढे मुख्यमंत्र्यांकडे जातात. पुन्हा फाइलचा प्रवास उलटा होतो आणि त्यानंतर आदेश काढले जातात. अनेकदा फाइल कुठे प्रलंबित आहे? हे वरिष्ठांना कळत नाही. ई-ऑफिसमुळे फाइलचा प्रवास जलदगतीने होणार आहे.
- आता कारणे देता येणार नाहीत!
- टपाल अथवा फाइल गहाळ होण्याचा किंवा सापडत नाही, हे कारण आता कुणालाही देता येणार नाही.
- ई-ऑफिस प्रणालीद्वारे जनतेकडून मुख्यमंत्री, मंत्र्याना दिल्या जाणाऱ्या पत्रावरही ई-ऑफिसच्या माध्यमातून ऑनलाइन कार्यवाही होणार आहे. त्यामुळे टपालाचा निपटाराही जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.