मंत्रालयातून पालिकेत ! सत्तांतरानंतर नेत्यांचे पाय जमिनीवर..
By सचिन जवळकोटे | Published: December 8, 2019 08:28 AM2019-12-08T08:28:42+5:302019-12-08T08:29:58+5:30
लगाव बत्ती
- सचिन जवळकोटे
‘हात आकाशाला टेकले तरी पाय जमिनीवरच ठेवावे लागतात’ याचं भान आता सत्तेवरून पायउतार झालेल्या कैक नेत्यांना येऊ लागलंय. पाच वर्षे जनतेलाच शहाणपणाचे सल्ले देणारी नेतेमंडळी आता लोकांमध्ये मिसळू लागलीय. ‘दक्षिण’चे ‘देशमुख’ आता ‘जनता दरबार’ भरवू लागलेत, तर ‘उत्तर’चे देशमुख चक्क ‘इंद्रभवन’मध्ये वावरू लागलेत. ‘मंत्रालयातून थेट महापालिका’ आवारात फिरणाऱ्या माजी मंत्र्यांचा हा उलटा प्रवास सत्तांतराचा चमत्कार दाखवू लागलाय.
‘देशमुखां’च्या अकल्पित ‘चाली’
1) गेल्या कित्येक दशकांत ‘हात’वाल्यांची सत्ता असताना त्यांचा एकही मंत्री कधी ‘इंद्रभवन’ परिसरात आल्याचं ऐकिवात नाही. मोठे नेते बंगल्यात बसूनच निवडणुकीची सूत्रे हलवायचे. अडीच वर्षांपूर्वी मात्र ‘देवेंद्रपंतां’नी तंबी दिल्यानं महापौर निवडीवेळी दोन्ही ‘देशमुख’ थेट महापालिकेत आलेले. यंदा तर राज्यात सत्ताही नाही. त्यामुळंं कोणतीच रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसलेले ‘उत्तर’चे ‘देशमुख’ पालिका आवारात ठाण मांडून बसलेले. भलेही ‘महापौरपदी यन्नमताई’ ही त्यांची मनापासून इच्छा नसली तरीही ‘चंदूदादा कोल्हापूरकर’ यांची सूचना त्यांना ऐकावीच लागली. मात्र त्यांनी या साºया प्रकरणात अशा काही ‘चाली’ खेळल्या की ‘महेशअण्णा’ जिंकूनही हरले.
2) खरंतर ‘विजयकुमारां’च्या गोटात ‘अंबिकातार्इं’चं नाव ‘महापौरपदा’साठी घोळत होतं. त्यांनी ते नाव वर पाठविलंही. मात्र तिकडं मुंबईत ‘देवेंद्रपंत’ अन् ‘चंदूदादा’ यांनी समाजाच्या बेरजेचं वेगळंच गणित मांडलं. ‘महेशअण्णां’ना तीस हजार मतं देणाऱ्या ‘पूर्व भागा’ला आपण यंदा चान्स दिला तर भविष्यात हा समाज आपल्याच पाठिशी राहील, असं या दोघांनी ठणकावून सांगितल्यानं ‘विजयकुमारां’चा नाईलाज झाला. विशेष म्हणजे यावेळी या दोघांनी ‘आपण महेशअण्णांना वेळोवेळी गुप्त मदत केलीय’ याची जाणीवही करून दिली.
3) मात्र या ‘देशमुखां’नी एक खेळी केली. ‘काळजापूर मारुती’जवळच्या बंगल्यातून थेट मुरारजीपेठेतल्या ‘देवेंद्र’शी संपर्क साधला. तत्काळ ‘देवेंद्र’ या बंगल्यावर गुपचूप हजर झाले.‘तुमच्या सासूला मी तिकीट देतोय. तुम्ही किती मेंबर आणणार ?’ असं विचारून एकीकडं याचं क्रेडिट पूर्णपणे स्वत:कडं घेतलं...अन् दुसरीकडं ‘कोठे’ घराण्यात पद्धतशीरपणे फूट पाडली. या दोघांचा संवाद म्हणे ‘महेशअण्णां’नाही कळू न दिलेला.
4) मात्र याचवेळी ‘महेशअण्णां’ना आपली ‘धनुष्यनिष्ठा’ दाखविण्याची घाई झालेली. त्यांनी ‘महाआघाडी’ची टूम काढून थेट ‘नार्वेकरां’शीच संपर्क साधला. ‘सेनेचा महापौर’ बनविण्यासाठी आपण आपल्या ‘व्याहीं’चाही पराभव करायला तयार आहोत, हे ‘मातोश्री’ला दाखवून दिलं. दरम्यान, ‘आपल्या अण्णांना आपल्या सासूपेक्षा स्वत:चं करिअर मोठ्ठं वाटतंय’ हे लक्षात आल्यामुळं ‘जावईबापू देवेंद्र’ही बिथरले.
5) मात्र, ‘महापौर निवड’ होताना ऐनवेळी ‘धनुष्यबाण’वाल्यांनी कलटी मारली. अर्ज माघारी घेऊन तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला; मात्र उपमहापौरपदासाठी ‘हात’वाल्यांना मतदान करण्याचा निर्णय झाला, तेव्हा ‘देवेंद्र’ थटून बसले. आतल्या केबीनमध्ये ‘काका-पुतण्या’चा वादही झाला. ‘तुमच्यामुळं माझ्या सासूला मी मतदान करू शकलो नाही. मग मी कशाला तुमचं ऐकू ?’ म्हणत मनातली खदखद मांडली. अखेर ‘बालहट्टा’पुढे ‘राजहट्ट’ थकला. ‘हात’वाल्यांना मतदान झालंच नाही. ‘कमळ’वाल्यांच्या ‘यन्नमताई’ प्रथम नागरिक बनल्या. ‘देवेंद्र’च्या सासू महापौर बनल्या; मात्र ‘काका-पुतण्यात’ ‘कोठे’तरी फूट पाडून ‘विजयकुमार’ जिंकले.. ‘महेशअण्णा’ हरले.
6) इकडं ‘हात’वाले ‘चेतनभाऊ’ही खूप हुशार निघाले. आयुष्यभर ‘खोबरं तिकडं चांगभलं’चा उदो-उदो करणाऱ्या मंडळीत या ‘भाऊं’चं नाव नेहमीच वर असतं. ‘महेशअण्णा’ जेव्हा ‘हाता’बरोबर पालिकेत सत्तेवर होते, तेव्हा हेच ‘चेतनभाऊ’ सकाळ-सकाळी मुरारजीपेठेतल्या बंगल्यावर असायचे. दुपारी ‘पार्टी’ मेंबरबरोबर दिसायचे, तर सायंकाळी ‘संकेत’ हॉटेलवर गप्पा मारायचे. मात्र या ठिकाणी ‘महाराज ग्रुप’मध्ये ‘अमोलबापूं’नाच अधिक मान... अन् ‘बापू’ आजकाल ‘महेशअण्णां’बरोबर निष्ठेनं काम करू लागलेले. हेच ‘चेतनभाऊं’ना कुठंतरी खटकू लागलेलं...‘हात’वाल्या ‘शिंदें’सोबत काम करताना त्यांना ‘पिसें’सोबतचे ‘शिंदे’ म्हणे नकोसे वाटू लागलेले. त्यातूनच त्यांनी या महापौर निवडीत केवळ ‘पिसें’साठीच ‘महाआघाडी’ केल्याचा ‘गवगवा’ केला...अन् ‘पिसें’पासून ‘बापूं’ना तोडण्यासाठी ‘कांगावा’ही केला.
‘थोरले काका’ पाडापाडीत माहीर...
...तरीही चिमणी न पाडण्यासाठी तयार !
सध्या सोलापुरात एकच विषय चर्चेचा. तो म्हणजे ‘चिमणी’चा. ‘सिद्धेश्वरची चिमणी पडणार की राहणार ?’ यावर पैजांवर पैजा लागलेल्या. ‘केतनभार्इं’च्या स्वप्नातही म्हणे आजकाल ‘चिमणी’च येऊ लागलेली. तरी नशीब, सत्ता गेल्यामुळं ‘विजयकुमार’ शांत बसलेले...मात्र याच सत्तांतराचा फायदा घेण्यासाठी ‘धर्मराज’नी योग्य वेळ साधलेली. सोलापुरातील एका बड्या नेत्याच्या माध्यमातून थेट ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याशी संपर्क साधला गेलेला. ‘चिमणीची व्यथा’ त्यांच्या कानावर टाकलेली.
खरंतर ‘चिमणी पाडू देऊ नका’ ही केलेली विनंती ‘काकां’साठी चक्रावून टाकणारीच होती...कारण ते केवळ ‘पाडापाडीत’ माहीर. ‘देवेंद्रपंतां’चे एका रात्रीत आलेले सरकार त्यांनी तिसऱ्या रात्रीच पाडून टाकलेलं. असो, तरीही त्यांनी म्हणे ‘चिमणी पाडू देणार नही’ असा शब्द दिलेला. आता बघू चिमणी पाडणारा ठेकेदार सोलापुरात येतो तरी की नाही ? आलं का लक्षात...लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)