आनंद मंत्रालय! आनंदी समाजस्वास्थ्य! --जागर-- रविवार विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:08 AM2018-03-04T01:08:30+5:302018-03-04T01:08:30+5:30

आपणास पुन्हा एकदा समाजसुधारणेच्या मार्गानेच जावे लागेल, अन्यथा त्या गैरसमजुती, अंधश्रद्धा, खोट्या सामाजिक प्रतिष्ठा, जिवंत ठेवून आनंदी जीवन जगता येणार नाही. शेतकºयांच्या आत्महत्यांकडेही तसेच पाहावे लागणार आहे...

 Ministry of pleasure! Happy Social Health! --Jagger-- Sunday Special | आनंद मंत्रालय! आनंदी समाजस्वास्थ्य! --जागर-- रविवार विशेष

आनंद मंत्रालय! आनंदी समाजस्वास्थ्य! --जागर-- रविवार विशेष

Next

- वसंत भोसले
आपणास पुन्हा एकदा समाजसुधारणेच्या मार्गानेच जावे लागेल, अन्यथा त्या गैरसमजुती, अंधश्रद्धा, खोट्या सामाजिक प्रतिष्ठा, जिवंत ठेवून आनंदी जीवन जगता येणार नाही. शेतकºयांच्या आत्महत्यांकडेही तसेच पाहावे लागणार आहे...

माणसांनी आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे चंगळवाद असे समीकरणाचे दिवस आता संपले आहेत, असे मानायला हरकत नाही. महाराष्ट्र सरकारने माणसाला आनंदी राहण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रोत्साहन देण्यास खास मंत्रालय (खाते) सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. संकल्पना खूपच चांगली आहे. अनेक विकसित राष्ट्रांत ही संकल्पना राबविली जाते आणि आपल्या देशाचा प्रत्येक नागरिक आनंदी कसा होईल, कसा राहील याचा विचार करण्यात येतो. त्यासाठी समाजस्वास्थ्य वाढीस लागणाºया असंख्य योजना आखल्या जातात. तसा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. आपल्या समाजाच्या बाबतीत ही संकल्पना राबविणे तसे थोडे अवघडच आहे; पण विचार मांडायला आणि करायला काहीच हरकत नाही. शेवटी अंतिम ध्येय काय असावे, तर कल्याणकारी राज्यव्यवस्थेत दु:ख, दारिद्र्य, दैन्य संपवून लोकांना आनंदी राहण्याची व्यवस्था करणे होय. त्यासाठी प्राधान्य द्यायला हरकत नाही.

महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून देशभर ओळखले जाते. या राज्याने स्वीकारलेला विकासाचा मार्ग पाहता आनंदी जीवनाचे स्वप्न खूप दूरवर कोठेतरी उभे आहे, असे वाटते. किंबहुना तो एक कल्पनाविलास असू शकतो का, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. समाजातील मोठा वर्ग अनेक मूलभूत सुविधांपासून दूर आहे. त्यावर मात करण्याचा प्रयत्न प्रत्येक माणसाचा आहेच; त्याचबरोबर शासन व्यवस्थेचाही आहे. तो कोणी नाकारणार नाही. मात्र, समाज कल्याणकारी योजना राबविण्याचे दिवस मागे पडले; आता सामाजिक सुरक्षा देऊन समाजाला आनंदी जीवन जगण्याचे वातावरण तयार करण्याचे दिवस आले आहेत, असे म्हणता येईल. त्याचा स्वीकार करायला हरकत नाही. आनंदी दिवसाची पहाट म्हणजे ज्यांच्या दैनंदिन विवंचना संपल्या आहेत, उत्तम शिक्षण मिळाले, उत्तम नोकरी मिळाली, कष्ट करण्याची संधी मिळाली, बढती मिळाली, उत्तम पगार आणि सेवा मिळाल्या. निवृत्तीनंतर उत्तम निवृत्तिवेतन मिळाले. दरम्यानच्या काळात विवाह, वैवाहिक जीवन, मुले-बाळं, त्यांचे संगोपन, शिक्षण आणि त्यांना योग्य मार्गावर सोडून निवृत्तीचे सशक्त आनंदी जीवनाचा आस्वाद घेण्यासाठीचे क्षण आता समोर आले आहेत, असा मर्यादित विचार या मंत्रालय स्थापन करण्यामागे असेल असे वाटत नाही. (पण तेच होईल, अशी भीतीही वाटते.)

हा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण असे की, आपल्या समाजातील खूप मोठा असंघटित वर्ग असंख्य दैनंदिन विवंचनेतून मार्गक्रमण करतो आहे. तो आर्थिक संकटात कधी कोसळेल सांगता येत नाही. तो कधी समाजातील रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना बळी पडेल सांगता येत नाही. जाती व्यवस्थेतून आलेल्या खोट्या प्रतिष्ठा, समजुती आणि समाजाच्या दबावाखाली कधी चिरडून जाईल हे सांगता येत नाही. जातीय दंगे, धोपे, धार्मिक तणाव आणि दंगलीत कधी होरपळून निघेल सांगता येत नाही. सांगलीचे प्रा. डॉ. नितीन नायक यांनी २ मार्च रोजी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीची एक आठवण वॉटस् अ‍ॅपवर शेअर केली होती. त्या मेसेजने माझा तो दिवस सुरू झाला. सकाळी फिरायला गेलो असता त्यांची चहा घेण्यासाठी सांगलीतील आमराई क्लबवर भेट झाली. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी घडलेल्या घटनेचा वडिलांच्या जीवनावर झालेल्या परिणामाने संपूर्ण कुटुंब कसे अस्वस्थ झाले होते, हे सांगत होते. त्यांचे वडील उडपी! सांगलीत काँग्रेस भवनासमोरील हॉटेल चालवीत होते. ते नुकतेच सांगली जिमखान्याकडून घेऊन त्यात गुंतवणूक केली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून दंगा झाला आणि त्यांचे मधुबन हे जिमखान्याच्या परिसरातील हॉटेल उद्ध्वस्त करण्यात आले. कारण ते उडपीचे कर्नाटकी होते. त्याचा परिणाम असा झाला की, मानसिक धक्क्यातून ते कधी उठलेच नाहीत. अनेक वर्षे ते अंथरूणाला खिळून होते. अकरा वर्षांच्या नितीन नायक यांना शिक्षण सोडून हॉटेल सांभाळावे लागले. ही एक घटना झाली. त्यांना कोणी मदतीचा हात दिला नाही. समाजस्वास्थ्य बिघडल्यानंतर एका कुटुंबावर कसे परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सांगली जिल्ह्यातीलच एक घटना आहे. पत्नी विवाहानंतर दोन महिन्यांतच गरोदर झाली. तिचे पूर्वी प्रेमप्रकरण होते, असे सांगण्यात आले. त्या युवकापासूनच तिला दिवस गेल्यात आणि होणारे अपत्य आपले नाहीच, या विचाराने पछाडलेल्या सासू, सासरे, पती, आदींनी तिचा अमानुष छळ केला. गर्भपाताचाही प्रयत्न झाला. माहेरी पाठवून दिले. तिला गोंडस मुलगा झाला. त्याला ठार मारण्यास सांगण्यात येऊ लागले. आपल्या पोटात वाढलेल्या बाळाला ठार कसे मारायचे या विचाराने ती मातोश्री कसे जीवन कंठीत असेल? तिने अखेर स्वत:च्या मुलाला ठार मारले. आता त्याचा तपास पोलीस करीत आहेत. हे सर्व असे घडले असेल तर ज्या युवकावर तिचे प्रेम होते, त्या संबंधातून मुलगा झाला, असा आरोप होता तर, हा समाज तिला त्या युवकाबरोबरच विवाह करण्यास मोकळीकता का देत नाही? तसे नसेल तर एका संबंधानेही विवाहानंतर पहिल्याच महिन्यात महिलेला दिवस जाऊ शकतात, हे कोणी कसे त्यांना सांगत नसेल? यातूनही पुढे जर तो मुलगा आपला नाहीच, असे सर्वांना वाटत होते तर एका अनाथालयात का सोडले नाही? मुले होत नसलेली असंख्य कुटुंबे या अनाथालयाच्या

प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यातही मुलगा हवा
असणारी असंख्य जोडपी आहेत. सांगलीत एका कुटुंबाला मूल होत नाही म्हणून दहा वर्षे सर्व उपचार, मंत्रतंत्र करून झाले. अखेरीस एक अनाथ मुलगा त्यांना मिळाला. आज ते कुटुंब आनंदाने त्याचा ‘आपला’ मुलगा मानून सांभाळ करताहेत, त्याला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करताहेत. अनाथ मुलाला पालक भेटले आणि पाल्याच्या प्रतीक्षेत दु:खी असणाºयांना जीवनातील ते शल्य दूर करण्याचा तसेच मुलाला वाढविण्याचा आनंदही त्यांना मिळून गेला.

समाजात असाही आनंद घेता येतो, हे कोणी त्या सहा महिन्यांच्या मुलाला ठार मारणाºयांना सांगितलेच नसेल? अशी अनाथालये आहेत आणि त्याच्या दारावर आनंदाची प्रतीक्षा करणारी जोडपी उभी आहेत, हे त्यांना माहीतच नसावे? महाराष्ट्र शासनाने ‘आनंद मंत्रालय’ काढताना माणूस कोणत्याही विवंचनेने दु:खी असेल तर त्याला आधार देण्याचे काम करावे. कॉन्सिलिंग करावे त्याला समजून घ्यायला हवे आहे. एखाद्या घरातील कर्ता पुरुषाला (म्हणजे ज्याला नोकरी मिळाली आहे.) अपघात होतो, बरा न होणारा आजार होतो. त्याला व्यसन लागते किंवा त्याने काही चुकीचे निर्णय घेतल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. अशा परिस्थितीतील पदरात दोन लहान मुले असणारी अर्धशिक्षित महिलेला कोणाचाही आधार मिळत नाही. मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. संपूर्ण कुटुंबालाच विचित्र वळण लागते. पूर्वीच्या काळी अशा परिस्थितीतील मोठ्या कुटुंबातील इतर भाऊ, चुलते सांभाळ करीत होते. मात्र, तेदेखील सांपत्तिकदृष्ट्या संपन्न घराण्यात शक्य व्हायचे. गरिबाच्या घरात अशी अघटित घटना घडली की, संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर येते, अशी असंख्य कुटुंबे आज आपल्या आजूबाजूला आहेत.

आई-वडिलांना न सांभाळ करू शकणारी कुटुंबे आहेत. सांपत्तिक स्थिती असूनही सांभाळ न करण्याचे मानसिक आजारपणही आपल्या समाजात आले आहे. तरुण मुलं नोकरी-कामासाठी मोठ्या शहरात किंवा परदेशात स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढते आहे. अशा पालकांना समाजात आधार देणाºया संस्था किती आहेत? आई-वडील एड्सने वारलेल्या असंख्य मुलांचा सांभाळ करणारे आहेत. त्या मुलांना आधार देणाºया सामाजिक संस्था कमी आहेत. ज्या आहेत, त्यांची क्षमता फारच कमी आहे. कोल्हापुरात एका पोलीस अधिकाºयाच्या घरात ठेवून घेण्यात आलेला लहान मुलगा हा अशाच उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील निराधार मुलगाच होता. त्याचा गैरफायदा घेणारे कुटुंब त्याच्याच वाटेला यावे, हे त्याचे दुर्दैव! असंख्य वेश्या महिलांच्या जीवन कहाण्या पाहिल्या तर त्या समाजाने जगण्यास त्यांना नकार दिलेल्या कहाण्याच आहेत. त्यांच्या मुलांचे संगोपन, आरोग्य, शिक्षण करण्यासाठी पुरेशा सामाजिक संस्था कोठे आहेत? ज्या आहेत, त्यांना समाज आणि शासन कितपत पाठबळ देते?

समाजातील अशा परिघाबाहेर फेकलेल्या लोकांना (मग ते वृद्ध असो, असाध्य रोगाने आजारी असोत, अनाथ असोत की विधवा, निराधार महिला असोत) आधार देणाºया संस्था मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या पाहिजेत. सर्व जबाबदारी कुटुंबांनी घ्यावी, अशी अपेक्षा केली तरी असंख्य कुटुंबे, अपघाताने, आत्महत्येने, आजाराने, शिक्षणाअभावी किंवा व्यसनाने निराधार झाली आहेत. याशिवाय अनिष्ट सामाजिक चालीरीती, अंधश्रद्घेने अडचणीत आली आहेत. अनिष्ट प्रथांनी नको त्या गोष्टींवर कुटुंबाचे उत्पन्न खर्ची घालताहेत.हे सर्व समाजाने दिलेल्या अडचणी, समाजाने निर्माण केलेल्या अडचणी आणि सामाजिकव्यवहार करताना अपघाताने आलेल्या अडचणीत निम्म्याहूनअधिक समाज सापडला आहे. त्याला त्यावर मात करण्याचे मार्गदर्शन व्हायला हवे, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे प्रशासकीय कार्यालय, मोठे न्यायसंकुल किंवा पोलीस मुख्यालयाइतके भव्यदिव्य आधार केंद्र हवे. तेथे मानसिक, शारीरिक आणि समाजाच्या वाईट चालीरीतीने संकटात सापडलेल्यांना मार्गदर्शन करता आले पाहिजे. उत्तम डॉक्टर, समोउपदेशक, समाजशास्त्रज्ञ हवे आहेत. आपण केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर तयार करण्याचे कारखाने उभे करीत आहोत; पण सामाजिक जीवनाचा आश्रय, समाजस्वास्थ्य निर्माण करणाºया समाजशास्त्रांकडे दुर्लक्ष करीत आहोत.

आनंद मंत्रालयाचे स्वागत करताना समाज ज्या कारणांनी अस्वस्थ आहे, त्यांना भिडणाºया योजना राबविणारे हे मंत्रालय व्हायला हवे आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्रातील किमान एक लाख कुटुंबे संकटातून जातात. सुमारे पन्नास हजार लोक ठार होतात आणि त्याच्या दहापट लोक जखमी होतात. त्यातील दहा टक्के तरी कायमचे जायबंदी होतात. रस्ते अपघात हा एक रस्ते, वाहन, नियम, कायदे यांचा विषय नाही. आपले सामाजिकीकरण ज्या पद्धतीने होतं, ते मन आणि डोके ते वाहन चालविते. त्या मस्तवालपणातून बहुतांश अपघात होतात. मोटारसायकलीवरून तरुण ठार होण्याचे कारणही तेच आहे.

आपणास पुन्हा एकदा समाजसुधारणेच्या मार्गानेच जावे लागेल, अन्यथा त्या गैरसमजुती, अंधश्रद्धा, खोट्या सामाजिक प्रतिष्ठा, जिवंत ठेवून आनंदी जीवन जगता येणार नाही. शेतकºयांच्या आत्महत्यांकडेही तसेच पाहावे लागणार आहे. त्याची आर्थिक विवंचना जेवढी जबाबदार आहे, तेवढेच सामाजिक वातावरणही कारणीभूत आहे. समाजस्वाथ्य्य सुधारले तर आनंद विस्तारत जाईल, त्यासाठी नव्या मंत्रालयाला शुभेच्छा!

Web Title:  Ministry of pleasure! Happy Social Health! --Jagger-- Sunday Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.