शिक्षण क्षेत्रातील अनाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:47 AM2018-03-06T00:47:56+5:302018-03-06T00:47:56+5:30
या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची वा भविष्यवेत्त्याची गरज नाही. एखादवेळी महसूल विभागावरही ताण करील एवढा प्रचंड भ्रष्टाचार आज शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहे.
या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची वा भविष्यवेत्त्याची गरज नाही. एखादवेळी महसूल विभागावरही ताण करील एवढा प्रचंड भ्रष्टाचार आज शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहे. अगदी शिपायापासून ते बोर्ड आणि विद्यापीठातील अधिकारी वर्गापर्यंत या भ्रष्टचाराची पाळेमुळे गेली आहेत. इतकेच काय एमपीएससी आणि यूपीएससी यातील भ्रष्टाचाराच्या सुरस कथाही बाहेर येऊ लागल्या आहेत. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अगदी प्रामाणिकपणे कसून अभ्यास करणारी गुणी मुले या परीक्षेत अव्वल येणे अपेक्षित आहे. पण ही प्रतिभावान मुले जेव्हा आपल्या परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी चालू असल्याचे आणि काही शिक्षकही कॉपीबहाद्दरांना मदत करताना पाहतात तेव्हा ते खचून जातात. आपण केलेली सर्व मेहनत आता पाण्यात जाणार आणि कॉपी करणारी ही मुले आपल्या पुढे जाणार ही जीवघेणी जाणीव त्यांना होते. का व्हावे असे. ‘यावर्षीच्या परीक्षा कॉपीमुक्त होणार’ असे शासन व शिक्षण विभाग दरवर्षीच छातीठोकपणे सांगत असते. पण होते काय ? आजही अनेक केंद्रांवर सर्रास कॉपी चालते. पेपर फुटत आहेत. उत्तरपत्रिका जाळल्या जात आहेत. बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या १४२० उत्तरपत्रिका म्हणे आगीत खाक झाल्या. नेमकी उत्तरपत्रिकांनाच आग कशी लागते? या प्रकरणात काही संबंधितांना निलंबित करण्यात आले. तसेच ‘विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांना गोपनीय पद्धतीने गुण दिले जातील’ अशी सारवासारवही शिक्षण विभागाकडून करण्यात आली. पण ही गुणदान प्रक्रिया प्रामाणिकपणे होईलच याचे मोजमाप काय? ज्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या किंवा जाळण्यात आल्या त्यात अनेक गुणवंत विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे काहीही न लिहिणारे बहाद्दरही असतील. या गोपनीय गुणदान पद्धतीत सर्वांना एकाच पंक्तीत आणले तर तो गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय ठरणार नाही का? शिक्षण विभागाकडे याचे उत्तर निश्चितच नसणार! झालेले आणि होत असलेले घोटाळे निस्तारण्यात आणि घोटाळेबाजांना संरक्षण देण्यातच त्यांचा वेळ खर्च होत आहे. दहावी-बारावी हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. या टप्पावरच जर त्यांना अशा कटू प्रसंगांना सामोरे जावे लागणार असेल तर शिक्षणावरचा त्यांचा विश्वासच उडून जाईल आणि ते देशासाठी मोठे घातक ठरणार आहे.