दयनीय व हास्यास्पद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:46 AM2019-02-09T05:46:03+5:302019-02-09T05:46:31+5:30
पंतप्रधान मोदी प्रसिद्धीच्या मागे आहेत. आपले नाव जगभर व्हावे, ही त्यांची इच्छा. गीता मेहता यांच्या पतीच्या प्रकाशन संस्थेने आपले चरित्र प्रकाशित करण्याची त्यांची मनीषा पद्म पुरस्कारामुळे उघड झाली.
गीता मेहता या लेखिकेचे नाव सध्या फारसे चर्चेत नाही. १९४३ मध्ये दिल्लीत जन्माला आलेल्या गीता मेहता या उडिया भाषेतील लेखिका. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या कन्या आणि आताचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या त्या भगिनी आहेत. यंदाच्या गणराज्य दिनी भारतसरकारने इतरांसोबत त्यांनाही पद्मश्री हा सन्मान दिला, तेव्हा त्यांचे नाव काहीसे चर्चेत आले. पण त्या कोण आणि काय वगैरे चौकशीत कुणी पडले नाही. मात्र पुढे काही दिवसांनी त्यांनी तो किताब सरकारला परत केला. तसे करताना ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य वा लेखन स्वातंत्र्याची गळचेपी’ अशी कोणतीही कारणे त्यांनी सांगितली नाहीत. ‘हा पुरस्कार मला का दिला गेला हेच मला अजून कळत नाही’ असे सांगून त्यांनी तो परत केला आहे.
त्याचमुळे त्याची खरी कहाणी ही साऱ्यांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. आता साºयांच्या लक्षात आले ते कुतूहल खरे आहे आणि मनोरंजकही आहे. गीता मेहतांची अनेक पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांचे २१ भाषांत भाषांतरही झाले आहे. १९७० ते ७१ या काळात त्यांनी युरोप आणि अमेरिकेसाठी टेलिव्हिजन नेटवर्कवर कामही केले आहे. त्यांचे बहुतेक लिखाण भारतीय पार्श्वभूमीवरचे आणि या क्षेत्राची स्थिती सांगणारे आहे. त्यांचे पती सोनी मेहता हे आॅल्फ्रेड ए नुफ या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या संस्थेने फ्रँकलीन डी रुझवेल्ट, महात्मा गांधी, केनेडी अशा जगविख्यात नेत्यांवर चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती जगभर खपली आणि वाचलीही जात आहेत. एवढी मोठी पार्श्वभूमी असणाºया गीता मेहता यांना आपल्याला पद्मश्री का दिली गेली हे कळले नसेल, असे समजणे हा खुळेपणा आहे.
पंतप्रधान मोदी हे प्रसिद्धीच्या मागे लागलेले पुढारी आहेत आणि त्यांना त्यांचे नाव भारताच्या सीमेबाहेर व जगात जास्तीचे चर्चिले जावे अशी इच्छा आहे. आपले चरित्र गीता मेहता यांच्या पतीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित करून जगात आणावे ही त्यांची मनोमन इच्छा आहे. त्याचसाठी त्यांनी गीता मेहता यांना या पुरस्कार वितरणाआधी दिल्लीला पाचारण केले. त्यांच्याशी त्यांनी दीड तास चर्चा केली. या चर्चेत कोणताही महत्त्वाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक किंवा वाङ्मयीन विषय नव्हता. आपल्याला का बोलविले आणि आपल्यासाठी देशाचे पंतप्रधान एवढा वेळ का काढतात याचे आकलन गीता मेहता यांनाही तेव्हा झाले नाही. त्या परत गेल्यानंतर त्यांना पद्मश्री जाहीर झाली. तेव्हा त्यांच्या डोक्यात स्वच्छ प्रकाश पडला आणि त्या पद्मश्रीचे व त्यासाठी पंतप्रधानांनी आपल्यासोबत घालविलेल्या दीड तासाचे रहस्य उलगडले. ही पद्मश्री पंतप्रधानांना त्यांच्या प्रसिद्धीसाठी व त्यांच्यावर आपल्या पतीच्या प्रकाशन संस्थेने एक चांगले पुस्तक प्रकाशित करावे या हेतूने दिली गेली हे लक्षात येताच त्या स्वाभिमानी स्त्रीने तो सन्मान तत्काळ परत करण्याचा निर्णय आपल्या पतीच्या संमतीने घेतला.
पद्मसारख्या पुरस्कारांतील व्यक्तींची निवड हा याआधीही चर्चेचा विषय बनला होता. अनेकदा तर ज्या क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार दिले गेले आहेत, त्या क्षेत्रात ज्यांनी आधी भरीव कार्य केले आहे, त्यापेक्षा नवोदितांनाही पुरस्कार दिल्याचे मुद्दे गाजले होते. सध्याच्या सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्रीने पुरस्कारासाठी लिफ्ट बंद असताना धापा टाकत जिने चढून कसा प्रयत्न केला होता, याचा रंगतदार किस्सा मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे प्रकाशात आला होता. या सा-या पार्श्वभूमीवर मेहता यांच्या पद्मश्रीची गोष्ट सामाजिक माध्यमांवर सर्वतोमुखी झाली आहे.
नेते त्यांच्या प्रसिद्धीसाठी कोणत्या पातळीवर जातात आणि त्यासाठी देशाचे आदरणीय सन्मान वापरायलादेखील ते कसे मागेपुढे पाहात नाहीत हे या घटनेने साºया देशाला व जगालाही कळले. नेत्यांचे नाव व मोठेपण त्यांच्या कामाने अधोरेखित होते. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांनी वा पुस्तकांनी ते मोठे होत नाही. मात्र प्रसिद्धीसाठी पुढारी अशा मार्गांचा वापर करीत असतील तर ते नाव मोठे होण्याऐवजी दयनीय व हास्यास्पद होते. मोदींनीही त्यांचा हेतू गीता मेहता यांना सांगितला नाही. मात्र त्या जाणकार स्त्रीला तो कळल्यावाचूनही राहिला नाही. त्याची परिणती देशाचा सर्वोच्च पुरस्कार परत करण्यात झाली, ही बाब जेवढी दयनीय, तेवढीच नेत्यांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरली.