मिशन वर्ल्डकप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:54 AM2023-09-07T07:54:32+5:302023-09-07T07:54:38+5:30

भारतातील क्रिकेटवेड वेगळं सांगण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये कितीही अपयश आले, तरी विश्वचषकाच्या तोंडावर आता आपला संघ काहीतरी करेल, अशी आशा घेऊन पुन्हा एकदा चाहते क्रिकेटकडे वळतात.

Mission ICC Cricket One Day World Cup! | मिशन वर्ल्डकप!

मिशन वर्ल्डकप!

googlenewsNext

आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ५ सप्टेंबरला भारतीय संघाची घोषणा केली. क्रिकेटविश्वातील सर्वांत जास्त प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या संघाची घोषणा निर्धारित वेळेच्या अखेरीस झाली आणि सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या भारतीय संघातील १५ शिलेदार सर्वांसमोर आले. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंसह सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, शुभमन गिल, ईशान किशन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनाही संघात स्थान मिळाले. क्रिकेटविश्वाची सध्या दोन पर्वांमध्ये विभागणी होते. एक म्हणजे ‘आयपीएल’आधीचे आणि दुसरे ‘आयपीएल’नंतरचे. २००८ साली सुरू झालेल्या ‘आयपीएल’पासून क्रिकेटविश्वात झपाट्याने बदल झाले आणि यामध्ये निर्णायक भूमिका ठरली ती भारताची.

भारतातील क्रिकेटवेड वेगळं सांगण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये कितीही अपयश आले, तरी विश्वचषकाच्या तोंडावर आता आपला संघ काहीतरी करेल, अशी आशा घेऊन पुन्हा एकदा चाहते क्रिकेटकडे वळतात. भारताने अखेरचे विश्वविजेतेपद २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकले होते. त्याने मारलेला अखेरचा विजयी षटकार आजही क्रिकेटप्रेमींच्या मनावर कोरलेला आहे. त्यामुळेच या विश्वविजेतेपदानंतर दरवेळी भारताकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगली जाते. चाहत्यांची ही आशा पूर्ण करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले असले, तरी यंदाचा विश्वचषक मायदेशात होणार असल्याने पुन्हा एकदा तो विजयी क्षण अनुभवता येईल, अशी आशा चाहत्यांनी लावली आहे.

२०११ ते गेल्यावेळच्या २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेवर नजर टाकल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, यजमान देशाने विश्वचषक उंचावला आहे. २०११ साली भारताने हा पराक्रम पहिल्यांदा केल्यानंतर २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि २०१९ साली इंग्लंडने ही कामगिरी केली. त्यामुळेच यंदा पुन्हा एकदा भारतीय संघ या पराक्रमाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वासही चाहत्यांना आहे. भारताने निवडलेल्या संघाची फलंदाजी खोलवर असून, गोलंदाजीत मात्र अनेक प्रश्न उद्भवतात. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या क्षमतेवर काहीच प्रश्न नाही. दोघेही जागतिक दर्जाचे गोलंदाज; मात्र त्यांच्या जोडीला फिरकी गोलंदाजांमध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलला न मिळालेले स्थान धक्कादायक आहे.

रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे तीन फिरकीपटू शानदार आहेत, वाद नाही; पण तिघेही डावखुरे आहेत. यामध्ये चहल मागे पडला तो त्याच्या फलंदाजी कौशल्यामुळे. जडेजा, अक्षर यांचा अष्टपैलू खेळ सर्वांनीच पाहिला असून, कुलदीप काहीवेळा उपयुक्त फटकेबाजीही करतो आणि यामध्येच चहल मागे पडतो. तळाची फलंदाजी ही कायम भारताची कमजोर बाजू ठरली आहे. शिवाय हरभजन सिंगनंतर एकही उजव्या हाताने ऑफ स्पिन ‘दमदार’ मारा करणारा गोलंदाज भारताला गवसलेला नाही. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची भेदकता कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्यास पुरेशी ठरते. भारतीय संघ यामध्येही अजून मागेच आहे. त्याउलट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या आघाडीच्या संघांकडे अशा गोलंदाजांचा तोफखानाच आहे. फलंदाजी भारताची कायम ताकद ठरली आहे; मात्र तरीही आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या वेगवान माऱ्याविरुद्ध चाचपडलेल्या फलंदाजांना पाहून भारतीय फलंदाजांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच.

यंदाची विश्वचषक स्पर्धा मायदेशात होणार असल्याने भारतीय संघाला यजमान म्हणून फायदा होईलच; पण त्याचवेळी इतर संघांचे (पाकिस्तानव्यतिरिक्त) प्रमुख खेळाडूही ‘आयपीएल’निमित्त भारतात सातत्याने खेळत असतात हे विसरता कामा नये. २०११ च्या विश्वचषकानंतर झालेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांत भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आले; तसेच यादरम्यान झालेल्या विविध टी-२० विश्वचषक स्पर्धांतही भारताला बाद फेरींतच पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळ करून दोन्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. जिंकण्यासाठी कणखर मानसिकता दाखवतानाच दडपण झुगारून खेळ केल्यास पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर भारताची मोहोर नक्की उमटेल.

Web Title: Mission ICC Cricket One Day World Cup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.