गर गलतियां बाबर की थी, जुम्मन का घर फिर क्यों जले...
By विजय दर्डा | Published: June 6, 2022 08:09 AM2022-06-06T08:09:28+5:302022-06-06T08:09:58+5:30
प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची प्रवृत्ती चुकीची ठरवून सरसंघचालक मोहन भागवतजींनी देशाला विकासपथावर नेण्यासाठी पवित्र मंत्र दिला आहे.
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
ज्ञानवापीचे प्रकरण लोकांच्या मनाला डाचत असतानाच मंदिर-मशिदीचे आणखी काही वाद समोर येऊ लागले आहेत. इतिहासाची विवाद्य पाने फडफडविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याच वेळी विचारी लोकांच्या डोक्यात स्वाभाविकपणे एक प्रश्न उभा राहिला, ‘कुठल्या दिशेने जातो आहे आपला देश आणि हा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जाईल?’ अशा वातावरणात सरसंघचालक मोहन भागवतजी यांचे हे विचार प्रकट झाले आहेत. त्यांच्या मते, ज्ञानवापी वादाचा निर्णय आपापसात समझोता करून किंवा न्यायालयीन निर्णयाचा आदर राखून झाला पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची प्रवृत्ती योग्य नाही. असे होता कामा नये.
इतिहासात गाडून टाकलेल्या जखमा नव्याने उकरून काढून वर्तमानकाळाचे पंख रक्तरंजित करण्याचे प्रयत्न सरसंघचालकांच्या या विचारांमुळे कदाचित थांबतील अशी आशा आहे. हिंदू पक्षात बहुसंख्य लोक सरसंघचालकांबद्दल आदरभाव बाळगतात. त्यांच्या विचारांनी प्रभावित होतात, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या विचारांचा एकेक कणसुद्धा या लोकांसाठी महत्त्वाचा असतो. त्यांच्या या विचारांची कदर प्रत्येक व्यक्ती करील आणि असे विवाद वाढणार नाहीत अशी आपण आशा केली पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने पाहू जाता उपासनास्थळ अधिनियम १९९१ नुसार आपल्या देशात सर्व धार्मिक स्थळांचे स्वरूप १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे होते तसेच राहील.
यावर कोणता वाद निर्माण होता कामा नये; परंतु काळानुसार समोर आलेले वास्तव असे आहे की हिंदू समाजामधला एक मोठा वर्ग इतिहासाने गाडून टाकलेल्या जुलमांच्या कहाण्या समोर घेऊन आक्रोश करीत आहे. सातव्या शतकात भारतावर खलिफांची सेना चाल करून आली यात शंका नाही. आठव्या शतकाच्या प्रारंभापासून त्यांना सफलता मिळू लागली. त्यानंतर अनेक जुलमी शासकांनी हिंदुस्थानच्या अनेक भागांवर कब्जा केला. धर्मस्थळे उद्ध्वस्त केली. त्यांनी केलेल्या जुलमांच्या असंख्य कहाण्या इतिहास सांगत असतो. त्यांनी केवळ
भारतातच नव्हे, तर जगाच्या अनेक भागांत असे जुलूम केले. हेच आठवून बहुसंख्य लोक आक्रोश करीत आहेत. तो स्वाभाविक असला तरी तसा तो करून आपल्याला काय मिळणार, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. विकासवादाच्या विचारधारेला जुलमाच्या दुनियेत आपण परत घेऊन जाऊ पाहत आहोत काय? भारताची फाळणी झाली तेव्हा आपण फार मोठे दुःख झेलले. आता आणखी नाही.
याच शंकांच्या संदर्भात सुप्रसिद्ध कवी आणि शायर अदम गोंडवी यांनी या जगातून निरोप घेण्याच्या आधी एक गझल लिहिली. ते म्हणतात..
हम मे कोई हूण, कोई शक, कोई मंगोल है
दफ़्न है जो बात, अब ऊस बात को मत छेडिये
गर गलतियां बाबर की थी,
जुम्मन का घर फिर क्यों जले
ऐसे नाजूक वक्त मे हालात को मत छेड़िए
है कहा हिटलर, हलाकू, जार या चंगेज खां
मिट गये सब, कौमकी औकात को मत छेड़िए
छेड़िए इक जंग, मिल जुल कर गरीबी के खिलाफ
दोस्त, मेरे मजहबी नग्मात को मत छेड़िए
जिंकण्याचा उन्माद असा असतो की जो हरलेला आहे त्या समाजाची बेइज्जती केली जाते. असे घडते याला इतिहास साक्षी आहे. कधी धार्मिक स्थळे तोडून तर कधी लेकी-सुनांवर अत्याचार करून ही बेइज्जती केली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात हे झाले आहे. आज युक्रेनमध्ये काय होते आहे, बलात्काराचे भयावह प्रसंग त्या देशातून समोर येत आहेत. युक्रेनमधून बाहेर पडू पाहणाऱ्या स्त्रियांवर तिथले लांडगे तुटून पडत आहेत.
सर्व जगात इस्लामिक खलिफा राजवट आणण्याचे स्वप्न पाहणारा इस्लामिक दहशतवादी अबू बकरने काय केले, जो प्रदेश जिंकला, तिथल्या मुलींना रानटी दहशतवाद्यांच्या समोर फेकले. लक्षावधी मुली त्यांचे आयुष्य सुरू होण्याच्या आधीच दफनल्या गेल्या. ज्या राहिल्या त्या जिवंतपणी प्रेतवत होऊन राहिल्या. अबू बकरला संपवणारी सेना असाच व्यवहार करील काय?... नाही. या सेनेला तर या जखमांवर मलमपट्टी करावी लागेल. या मलमपट्टीनेच इतिहासाची काळी पाने शुभ्र होत असतात. पान जोवर ती शुभ्र होत नाहीत तोवर त्याच्यावर नवा धडा लिहिता येत नाही.
दुर्दैवाने आपण ज्या कालखंडातून जात आहोत त्यात द्वेषाची हवा आता वादळाचे रूप घेऊ लागली आहे. आग दोन्हीकडून भडकते आहे. मी आपल्याला घाबरवत मुळीच नाही; पण काळाचा आरसा दाखवतो आहे. हे वादळ आपल्या सर्वांना घेऊन जाईल. इस्लामच्या नावाने आज दहशतवादाचे जे काळजाचा थरकाप उडवणारे दृश्य निर्माण झाले आहे त्यात जास्त करून मुस्लीमच मृत्युमुखी पडतात ना! कोणताही सच्चा मुसलमान दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहणार नाही, त्यांना सहानुभूती दाखवणार नाही हे मला माहीत आहे; परंतु त्यांच्याविरुद्ध त्यालाही आता आवाज बुलंद करावाच लागेल.
जाता जाता एक गोष्ट सांगतो.. मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत संपूर्ण जगतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या इमानदारीबद्दल शंका घेता येणार नाही. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याच्या प्रवृत्तीने हिंदुस्थानचे भले नक्कीच होणार नाही. आपली घटना सर्वांना एकसारखे मानते आणि आपले पूर्वजही तसेच मानत आले. मग एक दुसऱ्याबद्दल पुन्हा एकदा अतूट विश्वास निर्माण करूया. आपली सर्वांची एकजूट हीच हिंदुस्थानला जगाचा मुकुट करू शकते. जय हिंद!