मिताली राज : भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ दाखवणारी ‘राणी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:28 AM2022-06-10T09:28:52+5:302022-06-10T09:29:04+5:30
Mithali Raj : मितालीचे फलंदाजीचे तंत्र भक्कम होते आणि धावांची तिची भूकही मोठी होती. याच भांडवलावर ती मोठी झाली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तिने साम्राज्य गाजवले.
- संजीव पाध्ये, क्रीडा समीक्षक
भारताने महिला क्रिकेटला दिलेली अनोखी देणगी म्हणजे मिताली राज. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटप्रेमींसाठी सचिन तेंडुलकर हा देव, तशीच मिताली महिलांमधली देवीच ठरावी. तिची आकडेवारी भन्नाट आणि बोलकी आहे. ती तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तळपली आणि दहा हजारांहून अधिक धावा आपल्या नावे करत जगातली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा काढणारी फलंदाज ठरली. अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. त्यातले काही अबाधित राहतील, असे आहेत. तिने भारताचे नेतृत्व दीर्घ काळ केले. २०१७ मध्ये ९ धावा कमी पडल्याने विश्वचषक भारताकडून निसटला नसता, तर तिच्या कारकीर्दीला आणखी झळाळी मिळाली असती.
मिताली क्रिकेटमध्ये आली अगदी सहज. हैदराबादच्या सेंट जॉन अकॅडमी शाळेत ती जायची. भाऊ मिथुन स्कूटर चालवत असे आणि ही मागे बसायची. मिथुनला क्रिकेटची आवड होती. हैदराबादचा माजी गोलंदाज ज्योती प्रसाद शिकवायचा. तो सहज एकदा मितालीला म्हणाला, क्रिकेट खेळणार का? आणि ती हो म्हणाली. ती तेव्हा अवघी दहा वर्षांची होती. त्यानंतर क्रिकेटच्या शिड्या ती झपाट्यानं चढली. १४ वर्षांची असताना ती विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये होती, यातून तिचा झपाटा कळावा.
तिचे फलंदाजीचे तंत्र भक्कम होते आणि धावांची तिची भूकही मोठी होती. या भांडवलावर ती मोठी झाली. तिसऱ्या कसोटीत द्विशतक फटकावत आपण अवतरल्याचा इशारा तिने महिला क्रिकेटला दिला. पुढे तिला एकदिवसीय आणि वीस षटकांचे क्रिकेट अधिक खेळावे लागले. अगदी शेवटी तिने एकदिवसीय क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले. वयाच्या ३९ व्या वर्षीही ती फिट आणि फलंदाजीत तडफ ठेवून आहे, हे विशेष.
तिला भरतनाट्यमची आवड. क्रिकेटपटू झाली नसती, तर ती नर्तिका म्हणून गाजली असती. नृत्याचे धडे घेतल्याने तिचे फलंदाजीतील पदलालित्य अफलातून राहिले. ती तमिळ. वडील दोराई राज हवाई दलात होते. जोधपूरला मितालीचा जन्म झाला. तिच्या क्रिकेटला आईने प्रोत्साहन दिले. तिचा नुकता उदय झाला होता, तेव्हा गोरेगावात एक स्पर्धा ठेवली होती. भारतातील प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू त्यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मितालीशी गप्पा मारण्याचा योग आला. तेव्हा ती म्हणाली, मुळात मुलीला आपल्याकडे कुणी खेळू देत नाहीत. तिने घरकाम करावं आणि जमलं तर शिकावं, लग्न करावं एवढंच अपेक्षित असतं. असे असूनही आम्ही देशासाठी खेळतोय याचा मला अभिमान वाटतो. आम्हाला पुरस्कर्ते मिळत नाहीत, चांगले साहित्य नसते, सरावासाठी मैदाने नाहीत. मुलांबरोबर खेळायचे तर टिंगल होते, पण त्यांच्याबरोबर खेळून आमचे तंत्र भक्कम झाले आहे, हे मी अनुभवाने सांगते. पुरुष क्रिकेटइतका आमचा खेळ लोकप्रिय नाही, पण आम्हाला भारतीय क्रिकेट मंडळाने समजून घ्यावे, एवढीच इच्छा आहे.
सुमारे दहा-पंधरा वर्षांनी महिला क्रिकेटला चांगले दिवस आलेले पाहायला मिळाले. स्मृती मानधना, हरमन प्रीत, जेमिमा, पूनम राऊत, झुलन या स्टार आहेत. मितालीचे त्यात स्थान वरचे. ती व आधीच्या महिलांनी जी तपस्या केली, त्याची फळे आताची पिढी चाखत आहे. शांता रंगास्वामी, डायना एडुळजी, शोभा पंडित, संध्या अगरवाल अशा मोजक्या खेळाडू एक काळ गाजवून होत्या. मितालीने तोही काळ अनुभवला आणि आताचाही. तिला पुरुष प्रशिक्षक आणि त्यांचा अहंकार याचे बरे-वाईट अनुभव मिळाले, पण ती जिगरबाज. अनेक अडथळ्यांवर मात करत एखाद्या धावपटूने मॅरेथॉन संपवावी, तशी एक प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्द खेळून ती आता थांबते आहे. तिच्यावरचा बायोपिक तापसी पन्नू घेऊन येणार आहे. खेलरत्न, पद्मश्री लाभलेली मितालीसारखी क्रिकेटपटू होणे कठीणच आहे. ती कदाचित प्रशिक्षक म्हणूनही दिसू शकेल.