मिथुन, पागल पब्लिक आणि फाळके पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 09:14 AM2024-10-05T09:14:39+5:302024-10-05T09:15:26+5:30
केले असतील मिथुनने ‘बी ग्रेड’ सिनेमे; पण ‘पब्लिक’त्याच्यासाठी पागल होती. बुद्धिजीवींनी नाकं मुरडली, तरी ‘फाळके पुरस्कारा’वर त्याचाही हक्क आहेच!
- अमोल उदगीरकर, चित्रपट समीक्षक, अभ्यासक
मासेस आणि क्लासेस यांच्यातला अभिरुची वाद हा वर्गसंघर्षांइतकाच जुना. अभिरुची हा तसा फार किचकट प्रांत. एखाद्या कलाकारावर दर्जेदार असण्याची मोहोर उठवण्यासाठी जास्त आवश्यक काय असतं? ठरावीक तज्ज्ञ-समीक्षक लोकांची पसंती का बहुसंख्य जनतेचं प्रेम? - हे मोहोळ पुन्हा उठण्याचं कारण म्हणजे मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याला जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार. या पुरस्कारासाठी मिथुनच्या निवडीवर बुद्धिजीवी वर्तुळात नापसंतीची प्रतिक्रिया उमटली. मिथुनने केलेले अनेक बी ग्रेड सिनेमे, त्याची एका राजकीय पक्षाशी जवळीक; हे त्यामागे आहेच. डाव्या विचारांच्या मिथुनने आधी तृणमूल काँग्रेस आणि नंतर उजवे वळण घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला, राज्यसभेची खासदारकी मिळवली.. हे राजकीय लागेबांधे हाच त्याच्यासाठी फाळके पुरस्काराचा निकष आहे असे म्हटले जाते आहेच.. पण तो आपला विषय नाही!
त्याने काही ‘क्लासिक्स’मध्ये कामं केली असली, राष्ट्रीय पुरस्कार जिंकले असले तरी मिथुन हा नेहमीच मासेसचा नायक. त्याची बांधिलकी नेहमीच सिंगल स्क्रीन, व्हिडीओ पार्लर आणि जत्रा टॉकीजमध्ये सिनेमे बघणाऱ्या तळागाळातल्या माणसाशी होती. मिथुनचा पहिला सिनेमा मृणाल सेन यांचा ‘मृगया’. त्यासाठीच त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. नंतरही मणिरत्नमच्या ‘युवा’, रितूपर्णो घोषचा ‘तितली’, जि. वि. अय्यरचा ‘विवेकानंद’, मुकुल आनंदचा ‘अग्निपथ’ असे काही अपवाद त्याच्या वाट्याला आले; पण मिथुन जनतेमध्ये लोकप्रिय आहे त्याचे मारधाडपट आणि डान्सपटांमुळे.
अमिताभ बच्चन हा १९८४ साली लोकसभेवर निवडून गेल्यावर आणि नंतर बोफोर्स प्रकरणात अडकल्यावर त्याच्याभोवतीचं ‘अँग्री यंग मॅन’ वलय झपाट्याने विरायला लागलं होतं. व्यवस्थेवर रागावलेल्या बंडखोर नायकाची ती पोकळी भरून काढण्याचा यथाशक्ती प्रयत्न मिथुनने केला. अनेक सिनेमात त्याने साकारलेला श्रमिकवर्गातला नायक श्रीमंत, भांडवलदार अन्यायकारी खलनायकाविरुद्ध बंड करून त्यांचं काळं साम्राज्य एकहाती उद्ध्वस्त करायचा. मिथुनच्या सिनेमातली आई आणि बहीण यांच्यावर खलनायकाने केलेले अत्याचार हे नायकाच्या बंडासाठी उत्प्रेरक असे. आपल्या मनातला विझू पाहणारा विद्रोह पडद्यावर उतरवणाऱ्या नायकाच्या शोधात आणि प्रेमात असलेल्या पब्लिकला मिथुनचे सिनेमे प्रचंड आवडायचे. मिथुनने त्याकाळात अनेक ‘फॅमिली ड्रामा’ही केले. न्यूक्लियर कुटुंब पद्धतीला हळूहळू सामाजिक मान्यता मिळायला लागली होती आणि संयुक्त कुटुंब पद्धतीचा अस्तित्वासाठी झगडा चालू झाला होता. मिथुनच्या ‘प्यार का मंदिर’, ‘घर एक मंदिर’, ‘प्यारी बहेना’ आणि तत्सम कौटुंबिक सिनेमांमध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीची शेवटची घरघर दिसते. या सिनेमात मिथुन एक तर आपल्या बहिणींवर मायेची पखरण करणारा आणि त्यांच्यासाठी सर्वस्व त्याग करणारा भावाच्या भूमिकेत होता नाहीतर घरातून वेगळं होऊ पाहणाऱ्या स्वार्थी मोठ्या भावांना धडा शिकवणाऱ्या लहान भावाच्या भूमिकेत! भगवान दादा, शम्मी कपूर, जितेंद्रसारखे उत्तम नृत्य करणारे अभिनेते होऊन गेले तरी भारतीय सिनेमातला खऱ्या अर्थाने पहिला नृत्यकार अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती. ‘डिस्को डान्सर’मधून मिथुनने तंत्रशुद्ध पाश्चात्त्य नृत्य करणारा एक नवीन नायक जन्माला घातला. या सिनेमाला मिळालेल्या छप्परतोड यशामुळे हा डान्स मिथुनच्या पुढच्या सिनेमांचा अविभाज्य भाग बनला. या डान्सपटांनी मिथुनला रशियासारख्या देशातही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात मिथुनने एक आगळंवेगळं आर्थिक मॉडेल विकसित केलं होतं. तो निर्मात्यांना सलग तारखा द्यायचा. प्री -प्राॅडक्शन, शूटिंग आणि पोस्ट प्राॅडक्शन हे निर्मितीचे विविध टप्पे पार करून सिनेमा तीन ते चार महिन्यात हातावेगळा करायचा. ‘बाकीचे स्टार्स चित्रपट सुरू करण्याची डेट देतात. मी चित्रपट पूर्ण कधी होईल याची डेट देतो’ - असं मिथुन एका मुलाखतीमध्ये आत्मप्रौढीने म्हणाला, ते अगदीच खोटं नव्हतं. १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्ष तो देशामधला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमांनी ‘बी आणि सी क्लास सेंटर’वर उत्तम धंदा केला. सिंगल स्क्रीन थिएटरच नव्हे तर ओपन थिएटर आणि व्हिडीओ पार्लरमध्येही हे चित्रपट चांगले चालले.
कुठल्याही अभिनेत्याचं पॉप कल्चरमध्ये काय स्थान आहे हे बघणं फार रोचक असतं. भारतीय परिप्रेक्ष्यात या पॉप कल्चरचे साधेसुधे निकष आहेत. मिथुन तुम्हाला भेळपुरीच्या गाड्यावर लावलेल्या चित्रांमध्ये दिसतो. हेयर सलूनमधल्या पोस्टरवर दिसतो, रस्त्यावर तुम्हाला मिथुनची शारीरभाषा आणि केशरचना हुबेहूब साकारणाऱ्या श्रमिकांमध्ये तो अजूनही दिसतो. आजही इन्स्टाग्रामवर मिथुनचे अनेक डुप्लिकेट त्याचे संवाद म्हणताना आणि मिथुनच्या गाण्यांवर नाचताना दिसतील. उमेदीचे दिवस कधीच मागे पडलेला हा अभिनेता सोशल मीडियाचा हात धरून अजूनच तळागाळात झिरपत चालला आहे.
चेहरा आणि आवाज नसलेल्या एका वर्गामध्ये आजही मिथुनबद्दल प्रचंड प्रेम आहे. अजून कुणाला नसेल; पण व्हिडीओ पार्लरमध्ये, सिंगल स्क्रीनमध्ये, जत्रा टॉकीजमध्ये सिनेमे बघणाऱ्या लोकांना मिथुनला मिळालेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराचा प्रचंड आनंद होण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने मिथुनचा एकनिष्ठ प्रेक्षक असणाऱ्या रिक्षावाल्याला, शेतमजुराला, रद्दी विकणाऱ्याला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि त्याचं महत्त्व माहीत नसेलही.. पण या तळागाळातल्या माणसाचं मिथुनवरचं प्रेम हे कुठल्याही पुरस्काराचं मोहताज नाहीच आहे.
amoludgirkar@gmail.com