तळकोकणात डाव्या-उजव्यांच्या राजकारणाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:41 PM2019-10-02T15:41:10+5:302019-10-02T15:49:12+5:30

2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला मोठी कलाटणी

mla nitesh rane Created a new leader in konkan | तळकोकणात डाव्या-उजव्यांच्या राजकारणाला उधाण

तळकोकणात डाव्या-उजव्यांच्या राजकारणाला उधाण

googlenewsNext

- महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : नारायण राणे यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सोमवारी स्वाभिमान पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेले कित्येक दिवस जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडणार याबाबत उठलेले वादळ राजीनाम्याने काही प्रमाणात शमले आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटच्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यात शिवसेना आणि भाजपाची महायुती झाली असल्याने शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेचे विद्यमान आमदार असलेल्या कुडाळ आणि सावंतवाडी या दोन मतदारसंघांत विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊन आघाडी घेतली. तर भाजपाच्या वाट्याला असलेल्या कणकवली मतदारसंघात उमेदवारी अद्यापही निश्चित न झाल्याने राजकारणात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

सन 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत तत्कालीन विद्यमान खासदार निलेश राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून झालेला पराभव आणि त्यानंतर पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या कुडाळ मतदारसंघातून झालेल्या पराभवामुळे त्यापूर्वी राणेंची या जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली मजबूत पकड हलविणारा ठरला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सर्वप्रथम राणेंचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन तेली यांनी राणेंशी फारकत घेतली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने तेली यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने तेली यांनी भाजपात प्रवेश करीत सावंतवाडी मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूकही लढविली. यावेळी तेलींसोबत राणेंचे कट्टर समर्थक काका कुडाळकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला होता.

लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करताना आप्तस्वकीयांवर आरोप झाल्याने तेली, कुडाळकर या दोघांनी त्यावेळी राणेंपासून फारकत घेतली. यावेळीही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यावेळी राणेंपासून दूर जाताना या समर्थकांनी नीतेश राणेंना टार्गेट करीत बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबिला. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात राणेंचा पराभव झाला. त्यामुळे राणेंच्यासोबत असलेले डावे, उजवे म्हणून घेणारे नेते टार्गेट झाले. राणेंपासून त्यांच्या समर्थक नेतेमंडळींची फारकत घेण्याची मालिका पुढे सुरूच राहिली. त्यात दोन वर्षांपूर्वी कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या अगोदर संजय पडते यांनी राणेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नारायण राणे यांनी १९९०मध्ये या मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवून शिवसेनेचा भगवा फडकविल्यानंतर १९९५पासून त्यांच्यासमवेत सक्रिय राहून जिल्ह्यातील सर्व स्थानिक निवडणुका जिंकणारे त्यांचे मोहरे एकएक करून त्यांच्यापासून दूर जाऊ लागले. त्यात प्रामुख्याने राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते, नागेश मोरये आणि आता सतीश सावंत यांचा समावेश आहे.


या सर्व नेत्यांची जिल्ह्यातील कारकीर्द पाहता या सर्वांनी जिल्हा परिषदेमध्ये राणेंच्या नेतृत्वाखाली सर्व पदे मिळविली होती. तसेच पक्षीय विचार करता या सर्वांनी नारायण राणे शिवसेनेत असताना संघटनात्मक पदे म्हणजे तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी पदेदेखील भूषविली होती. राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले कट्टर समर्थक राजन तेली यांना विधान परिषदेवर आमदारदेखील केले होते. त्यावेळी त्यासाठी त्यांनी आपली सर्व प्रतिष्ठादेखील पणाला लावली होती. त्यामुळे राणे यांनी या स्थानिक नेत्यांना त्यांच्या कामगिरीप्रमाणे सर्व पदे दिली. शक्य होते त्यावेळी त्यातील तेलींसारख्या नेत्याला राणे यांच्या वरदहस्ताने आमदारकीची संधीही मिळाली. त्यामुळे राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना किंवा कट्टर समर्थक पदाधिकाऱ्यांना संधीप्रमाणे पदेही दिली.

काही जणांना तर त्यांनी राजकारणात आणून अनपेक्षित धक्के देत राज्यमंत्री दर्जाचे जिल्हा परिषद अध्यक्षपदही दिले. आता सतीश सावंत यांनी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात चांगले काम केले. त्यात ज्यावेळी त्यांच्याकडे जिल्हा बँकेची जबाबदारी मिळाली त्यावेळी त्यांनी विविध योजना राबवून निश्चितच चांगले काम केले. त्यामुळे सतीश सावंत हे आता आमदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राजकीय पलटावर होत होती. त्यातच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाकडून लढताना निलेश राणे यांचा दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. त्यामुळे राणे यांच्यासाठी सध्याचा काळ हा अतिशय संक्रमणाचा काळ म्हणावा लागेल.

त्यातच नारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार होता. मात्र, त्या प्रवेशात सत्ताधारी शिवसेनेने खोडा घातल्याने तोही अडकला. त्यामुळे राणेंना स्वाभिमान पक्ष स्थापन करावा लागला. या पक्षाने एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर राणेंना भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदारदेखील करण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे भाजपात प्रवेशास इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा प्रवेश आजमितीपर्यंत झालेला नाही. त्यामुळे राणेंसमोरील अडचणी आणखीनच वाढत गेल्या. नारायण राणेंचा विधानसभेतील पराभव होताना कणकवली मतदारसंघात नीतेश राणेंचा विजय झाला. त्यामुळे हळूहळू जिल्ह्यातील राजकीय गणिते नीतेश राणेंभोवती फिरायला लागली.

जसे नारायण राणे यांनी आपले समर्थक निर्माण केले तशीच काहीशी परिस्थिती गेल्या पाच वर्षांत पाहायला मिळाली. एकीकडे राणेंचे साथीदार सोडून दुसरीकडे जात होते. तर नीतेश राणेंच्या समर्थकांची एक फळीच जिल्ह्यात निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्या फळीचा विचार करता ते आता त्या त्या भागातील युवा नेतृत्व म्हणूनही पुढे येत होते. त्यामुळे नीतेश राणे यांनी कणकवली मतदारसंघाचा विचार करता कणकवली, देवगड आणि वैभवववाडी या तिन्ही नगरपंचायतीत आपल्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले.

यात देवगडमध्ये योगेश चांदोस्कर, कणकवलीमध्ये समीर नलावडे, संदेश उर्फ गोट्या सावंत, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, वैभववाडीचा विचार करता संजय चव्हाण, हुसेन लांजेकर, कुडाळमध्ये रणजित देसाई, विनायक राणे तर दोडामार्गमधून संतोष नानचे अशी नव्या नेत्यांची एक मोठी फौजच निर्माण केली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या सिंधुदुर्गच्या राजकारणातील एंट्रीच्या काळात जसे कार्यकर्ते निर्माण केले. त्यांच्या सुखदु:खात सामील होण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नीतेश राणे आता नव्याने तसे कार्यकर्ते निर्माण करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे युवा नेते त्या नेत्यांची जागा भरून काढण्यात यशस्वी होतात काय हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

नारायण राणे यांनी राजकारणात त्यांच्या दोन्ही मुलांना उतरविले आणि आपली संधी गेल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांचे कट्टर समर्थक एकएक करून त्यांच्यापासून दुरावत चालले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. जिल्हास्तरावर विविध पदे उपभोगल्यानंतर राज्याच्या राजकारणात संधी मिळण्यासाठी सर्वच जण धडपडत असतात. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे राजकीय नेत्यांचे राजीनामास्त्र आगामी काळात राजकारणाची दिशा बदलविणारे ठरणार आहे.

>राणेंपासून दुरावलेले : एकेकाळी होते समर्थक
आमदार नीतेश राणे यांच्यावर बोट दाखवून राणे यांच्यापासून दूर जाणा-या त्यांच्या काही प्रमुख समर्थकांमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचाही आता समावेश झाला आहे. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर माजी आमदार राजन तेलींपासून सुरुवात झालेली नेत्यांची यादी आता सतीश सावंत यांच्यापर्यंत आलेली आहे. यात कुडाळच्या संजय पडते आणि काका कुडाळकर यांचा समावेश आहे. तेही टाळून चालणार नाही. राणेंपासून फारकत घेताना या नेत्यांनी नीतेश राणेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
>नवे युवा नेतृत्व उभे करण्याकडे भर
एका बाजूला राणेंचे शिलेदार त्यांना सोडून जात असताना दुसºया बाजूने यादीतील दुसºया फळीचे नेतृत्व उभे राहताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात हे त्या शिलेदारांची जागा घेणार की नाही हे काळच ठरवेल. दत्ता सामंत, अशोक सावंत, रणजित देसाई यांच्यासारखे राणेंचे समर्थक आजही त्यांच्यासमवेत आहेत. त्यातच नवे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात राणेंचा हातखंडा आहे. त्यामुळे आता राजकारणात कसे बदल होतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: mla nitesh rane Created a new leader in konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.