‘तिसऱ्या’ सभागृहातला राडा; विधानभवनाची पायरी ही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:54 AM2022-08-25T06:54:29+5:302022-08-25T06:56:23+5:30
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की ही अत्यंत चिंतेची आणि सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करावी अशी घटना आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की ही अत्यंत चिंतेची आणि सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करावी अशी घटना आहे. हल्लीचे राजकारण राडेबाजीचे झाले असून आमदारांचे तारतम्य सुटत असल्याचे हे लक्षण आहे. अशी धक्काबुक्की, हाणामाऱ्या करण्यासाठी हा काही कुस्तीचा आखाडा नाही. लोकहिताचे कायदे करण्यासाठी आणि लोकाभिमुख निर्णय करण्यासाठीच लोकशाहीचे हे पवित्र मंदिर घटनाकारांनी उभारले आहे. विधानभवनाची पायरी ही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी नाही. आपली संसदीय जबाबदारी विसरत चाललेले आमदार आणि ते तसे भरकटत असताना त्यांना रोखण्यात अपयश येत असलेले नेते या दोघांनाही अशा प्रसंगांसाठी जबाबदार धरले पाहिजे.
विधानसभा वा विधान परिषदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी गेल्या काही वर्षांत एक तिसरे सभागृह भरलेले असते आणि ते म्हणजे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील सभागृह. रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर नारेबाजी करायची, एकमेकांना डिवचायचे असे प्रकार चाललेले असतात. मागे आदित्य ठाकरे तेथून जात असताना विचित्र आवाज काढले गेले. परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पायऱ्यांवरून जाताना त्यांना डिवचणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या.
आदित्य यांच्या विरोधातील घोषणेचे राजकीय उट्टे नितेश राणेंवर काढले गेले, परवा हा अनुभव माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आला. बाहेरच्या राजकारणाचे ‘हिशेब’ करण्यासाठी विधानभवनाचा वापर करण्याचे हे वाढते प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. सभागृहात कोंडी करण्याचे बुद्धिकौशल्य नाही म्हणून पायऱ्यांवर हुल्लडबाजी करायची हा नवीन पायंडा तातडीने मोडायला हवा. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून राजकारण अक्षरश: हातघाईवर आले आहे. राजकारणाच्या माध्यमातून चांगले बदल करण्याऐवजी एकमेकांचे बदले घेण्यातच धन्यता मानणारे उथळ नेते राज्याच्या राजकारणाचा संयमी चेहरा विद्रुप करायला निघाले आहेत.
विरोधकांवर कुरघोडी करीत असल्याचा आनंद त्यातून सध्याच्या नेत्यांना मिळत असेल; पण एकमेकांना पाहून घेण्याच्या नादात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने आजवर जपलेले शहाणपण आपण घालवत आहोत हे लक्षात आले तर बरे होईल. सध्या हमरीतुमरी, एकमेकांचा हिशेब करण्याच्या राडा संस्कृतीने महाराष्ट्रात डोके वर काढले आहे. ‘सगळ्यांचा कच्चा-चिठ्ठा माझ्याकडे आहे’ ही नाक्यावरची धमकी सभागृहात द्यावी याचे समर्थन कसे करणार? अर्थात, गेली अडीच वर्षे सत्तेत असलेल्यांनी पण विरोधकांना धमक्या देताना एखादाच अवयव सोडला असेल. केवळ राजकारण्यांचाच नाही तर आजच्या अवमूल्यनात माध्यमांचाही दोष आहेच. आम्ही सभागृहात तासभर बोललो तरी त्याची चार ओळींची बातमी येत नाही; पण गोंधळ घातला की लगेच बातमी येते अशी काही आमदारांची माध्यमांबद्दलची नाराजी आहे. माध्यमांनी या नाराजीवर आत्मचिंतन करत गोंधळी आमदारांऐवजी अभ्यासू आमदारांना प्रसिद्धी देण्याचे भान राखले तर चमकोगिरी करणाऱ्या आमदारांना चाप बसू शकेल. विधिमंडळाची अत्यंत आदर्श परंपरा निर्माण करण्यात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, रामभाऊ म्हाळगी, बाळासाहेब चौधरी, उत्तमराव पाटील, विठ्ठलराव हांडे अशा अनेक दिग्गजांचे अमूल्य योगदान राहिले आहे; मात्र आता त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्की आणि विधिमंडळातील चर्चेचा एकूणच घसरलेला दर्जा बघून ते स्वर्गात अश्रूच ढाळत असतील.
कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभागृह अनेकदा दणाणून सोडत सरकारला जाब विचारणारे आणि अनेक वर्षे आमदार राहिलेले केशवराव धोंडगे यांच्या वयाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्याच्या काही तास आधी आमदारांनी पायऱ्यांवर केलेले गैरवर्तन अधिकच व्यथित करणारे आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशाला अनेक योजना दिल्या, कायदे दिले. अनेक विषयांवरील अत्यंत दर्जेदार चर्चेचे हे विधिमंडळ साक्षीदार राहिले आहे. आपली ही आदर्श ओळख आपण आपल्याच बेताल वागण्याने घालवणार असू तर आपल्यासारखे नतद्रष्ट आणखी कोण असणार? आमदारांसाठी सभागृह व विधानभवन परिसरात आचारसंहिता असावी, तिचे कठोर पालन व्हावे अशी व्यवस्था तातडीने तयार करायला हवी. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात निकोप संसदीय लोकशाहीचे अवमूल्यन आमदार, राज्यकर्ते आणि विरोधकांकडून होऊ नये एवढी तरी बूज राखली जायला हवी.