आधुनिक ‘विज्ञान’ सामान्यांना तुच्छ मानते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 08:05 AM2023-12-28T08:05:51+5:302023-12-28T08:07:22+5:30

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले मत बदलू शकते, या वैज्ञानिक वृत्तीवर हल्ला करणारे तीन गट तयार झालेले आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे!

modern science despises the common man | आधुनिक ‘विज्ञान’ सामान्यांना तुच्छ मानते?

आधुनिक ‘विज्ञान’ सामान्यांना तुच्छ मानते?

डॉ. अतिश दाभोलकर, संचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स, इटली

शब्दांकन : राहुल विद्या माने

युरोपमधील प्रबोधन काळाने विज्ञानाच्या मार्गाने ज्ञान संपादन, ज्ञानाची उपासना आणि त्यामार्गाने आपण वैश्विक किंवा सार्वकालिक सत्य शोधू शकतो असा विश्वास दिला. धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे, पोथीनिष्ठपणा सोडून देणे, व्यक्तीचे स्वातंत्र्य व त्यावर आधारित लोकशाही व्यवस्थांची उभारणी  या सर्व गोष्टी युरोपमधील प्रबोधन काळात साध्य झाल्या. हे सारे बदल आपल्याकडे झाल्याशिवाय ही प्रबोधन मूल्ये आपण साध्य करू शकणार नाही.

विज्ञानाची तत्त्वे एवढी सोपी, स्वाभाविक आहेत की जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे; पण लोकांना याप्रमाणे वागणे अवघड जाते. याची उदाहरणे आपण कोविडकाळात पाहिली. प्रारंभी लसीबद्दल लोकांना खात्री नव्हती; पण जसजसे पुरावे उपलब्ध होत गेले, तसतसा औषधांवरचा विश्वास आणि वापर वाढत गेला.   

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले  मत बदलू शकते. या वैज्ञानिक वृत्तीवर (scientific temper) हल्ला करणारे तीन गट सध्या तयार झालेले आहेत. तुम्ही युरोप -अमेरिकेतील विद्यापीठात गेलात, तर उत्तर-आधुनिकतावाद विचारसरणी  असे मानते की विज्ञानाच्या संकल्पना  “सामाजिकदृष्ट्या निर्मित” आहेत. १९८० च्या काळात नवगांधीवादी विचारसरणीच्या लोकांनी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही संशोधकांनी Statement on Scientific Temper हे एक निवेदन प्रसिद्ध केले होते. भारताच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन  मानवतावादी असल्याचे सांगितले आहे; पण १९८० च्या दशकात आशिष नंदी यांच्यासारख्या काही तत्त्वज्ञ व्यक्तींनी मांडले की वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादी नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये सामान्य माणसाबद्दल एक अर्वाच्य असा तुच्छतेचा भाव असतो, असे या गटाचे म्हणणे असते. 

एका बाजूला उत्तर-आधुनिकतावाद हा पाश्चिमात्य विज्ञानाच्या विरुद्ध केला गेलेला आक्रोश आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विज्ञान हे भारताच्या परंपरेशी जोडलेले नाही, असे मानणाराही एक गट आहे. सामाजिक न्यायासाठी विवेकवाद वापरला जाणे आणि त्याचा नागरिकांमध्ये प्रसार करणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांचे काम आहे. या कामाबद्दलच शंका निर्माण करणारे अति-डावे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही पददलितांच्या बाजूने उभे आहोत असा अभिनिवेश असलेले पारंपरिक ज्ञानवादी विचारवंत सहभागी आहेत.

तिसरे आक्रमण विज्ञानावर होत आहे ते “स्वदेशी आणि हिंदुत्ववादी” लोकांकडून! काही वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी  सायन्स काँग्रेसमध्ये “गणपतीचे डोके व तोंड म्हणजे भारतात प्लास्टिक सर्जरी आधीपासून होती याचा पुरावा आहे” अशा प्रकारचे विधान केले होते. अशा प्रकारचे विधान सायन्स काँग्रेसमध्ये करण्यामागची भूमिका काय आहे? तसे पाहता आशिष नंदी यांच्यासारख्या अभ्यासकांचा गट आणि हिंदुत्ववादी यांच्यात वैचारिक अंतर आहे; पण ‘स्वदेशीवाद’ या नावाखाली त्यांच्यात अभद्र युती आहे. वसाहतवादी आक्रमणाला गांधींनी विरोध केला होता.  ‘आमच्याकडे  पूर्वी विज्ञान होते तेच खरे’  या अभिनिवेशाखाली आधुनिक विज्ञानाला नाकारण्याचे प्रयत्न सामान्य माणसांनी करणे हा पश्चिमी आक्रमणाला (गांधींप्रमाणेच) केलेला विरोध आहे ही आक्रमक भूमिका सध्या समोर येत आहे. आपण सर्वांनी यात तथ्य काय आहे आणि मिथ्य काय आहे ते समजावून घेतले पाहिजे. 

विज्ञानावर होणाऱ्या या तीन हल्ल्यांमागे  वसाहतवादाला विरोध ही एक समान प्रेरणा आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे.  युरोपकेंद्रित इतिहास लिहिला गेल्यामुळे विज्ञान ही केवळ युरोपची देणगी आहे असे मानणाऱ्या आणि भारत व इतर पौर्वात्य देशांच्या मान-सन्मानावर हल्ला करणाऱ्या भूमिकेचा आपण निषेधच केला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी  बिहारमध्ये भूकंप झाल्यावर गांधीजी म्हणाले होते, “आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात असल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली.” त्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घेतला होता, हे विसरता कामा नये!

विज्ञान हा सगळ्यांचा हक्क व वारसा आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत, अशी अंनिसची भूमिका आहे. त्यामुळे मी उत्तर-आधुनिकतावाद आणि आशिष नंदीसदृश्य तत्त्वज्ञांच्या विचारामागची प्रेरणा समजू शकलो तरी त्याच्यातील तथ्य एवढेच आहे की विज्ञानाची ओळख ही केवळ ‘अभिजन’ म्हणून नाही.  विज्ञानाची  सत्ये केवळ उच्चभ्रू आणि अभिजन वर्गासाठी/ वर्गासमान आहेत या विधानाला/आक्षेपाला आता आधार राहिलेला नाही.

“प्रत्यक्षात वैज्ञानिक सत्य अस्तित्वात नाही, ती केवळ एक सामाजिक संरचना आहे”, या विधानालाही आधार नाही. भारतीय विज्ञानाच्या इतिहासात ब्रह्मगुप्त आणि माधवाचार्य यांनी अतिशय मूलभूत योगदान दिले आहे. त्यासारख्या योगदानाबद्दल आपण जरूर बोलत राहिले पाहिजे; पण त्याचवेळी आपल्याकडच्या प्राचीन इतिहासात सर्वच क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती झालेली होती, या तर्कालाही आपण विरोध केला पाहिजे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांक प्रकाशनप्रसंगी केलेल्या भाषणाचा सारांश. 

 

Web Title: modern science despises the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.