खोडकर मोदी?

By admin | Published: August 20, 2015 10:46 PM2015-08-20T22:46:20+5:302015-08-20T22:46:20+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात जे आणि जसे झाले, तसेच बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचाराबाबतही बहुधा होईल अशी लक्षणे दिसू लागली आहेत

Modi? | खोडकर मोदी?

खोडकर मोदी?

Next

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात जे आणि जसे झाले, तसेच बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचाराबाबतही बहुधा होईल अशी लक्षणे दिसू लागली आहेत. नरेन्द्र मोदी यांनी एखादा वादग्रस्त मुद्दा मांडायचा आणि सर्व पक्षांनी त्याचीच चर्चा करीत राहायचे, असे तेव्हां घडले होते. त्यातून होत होते ते असे की, मोदी हे एकमात्र नाव सार्वजनिक चर्चेत गाजत राहिले. याच सप्ताहात मोदींनी बिहारात दोन जाहीर सभा घेऊन त्या राज्यातील भाजपाच्या प्रचाराचा आरंभ केला. पैकी एका सभेत त्यांनी अत्यंत नाटकी अभिनिवेश धारण करुन बिहारसाठी तब्बल सव्वा लाख हजार कोटी रुपयांचे घसघशीत संपुट (पॅकेज) जाहीर केले. ते करताना बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांना उद्धट असे विशेषण बहाल केले व त्यांनी संपुआ सरकारकडे बिहारसाठी अवघे बारा हजार कोटी रुपयांचे संपुट मागितले होते असे सांगून त्यांची खिल्ली उडवली. बिमारु राज्यांच्या संकल्पनेत आघाडीवर असलेल्या त्या राज्यातील किती जनतेपर्यंत मोदींचे ठसठशीत संपुट पोहोचले असेल याची शंकाच आहे. पण ते आता पोहोचते करण्याचे काम नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रामाणिकपणे करीत आहेत. या तिघांचा स्वर आणि सूर मोदींच्या विरोधातला असला आणि मोदी खोटी आश्वासने देण्यात पटाईत असल्याचा आरोप हे तिघेही करीत असले तरी त्यांनी सव्वालाख हजार कोटींचे संपुट जाहीर केल्याचे अनायासे बिहारी जनतेपुढे मांडले जात आहे. अशी संपुटे जाहीर करण्याची अलीकडच्या काळात टूमच निघाली आहे. त्याला कोणताही पक्ष, कोणताही नेता आणि कोणतेही राज्य अपवाद नाही. बऱ्याचदा एखाद्या राज्यासाठी अगोदरच जाहीर झालेल्या वा आधीच तरतूद केल्या गेलेल्या योजनांचा कालाकित्ता करुन त्याला पॅकेज असे गोंडस नाव दिले जाते. त्यातून मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजसाठी बहुधा काही व्यापारी संस्थांच्या जाहिरातींप्रमाणे ‘अटी लागू’ असा प्रकार असणारच. म्हणजे मोदींच्या पक्षाला बिहारी जनतेने सत्ता प्रदान केली तरच पॅकेज दिले जाईल, अशी काहीतरी अट असणारच. मोदींनी तिचा उच्चार केला नाही कारण त्यांनी लोक आपल्या मागेच येतील असे गृहीत धरले असणार. आता ते काम वरील नेते करीत असल्याने त्यांना कामाला लावणारे मोदी खोडकर नव्हेत तर काय?

Web Title: Modi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.