मोदी म्हणतात, ‘आता २०२२ नाही, थेट २०२९!’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 02:29 AM2020-12-03T02:29:10+5:302020-12-03T07:36:16+5:30

२०२९ सालापर्यंत मोदी सत्तेच्या आसपासच असतील हे स्पष्ट आहे. २०२४ची निवडणूक जिंकण्यासाठीही त्यांनी आत्तापासूनच परिश्रम घेणे सुरू केले आहे.

Modi says, ‘Not 2022 now, live 2029!’ | मोदी म्हणतात, ‘आता २०२२ नाही, थेट २०२९!’

मोदी म्हणतात, ‘आता २०२२ नाही, थेट २०२९!’

Next

हरीष गुप्ता

नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाले की निवृत्त होतील, दुसऱ्या कोणाकडे सूत्रे देतील असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ येऊ शकते.  त्यांनी आपल्या उद्दिष्टपूर्तीची कालमर्यादा हलकेच पुढे ढकलली आहे.. २०२२वरून ती २०२९वर गेली आहे. गतसप्ताहात एका  व्हर्च्युअल कार्यक्रमात मोदी यांनी आपल्या स्वप्नपूर्तीची तारीख पुढे ढकलण्याचे सूचन दिले. या कार्यक्रमाची बातमी मात्र फार कुठे ठळक झळकली नाही. या कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘गेल्या ५-६ वर्षात काम खूप झाले. पण भारताची प्रगती आणि विकासासाठी पुढची ९ वर्षे महत्त्वाची आहेत!’

भारत २०२२ साली स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले असेल, सर्वांना पक्के घर मिळालेले असेल, शिक्षणपण मिळेल, अशी खूप मोठी गगनचुंबी आश्वासने मोदी वारंवार देत आले... २०१४ साली सत्तेवर आले तेव्हा मोदींनी पुढच्या 
५ वर्षांचा वादा केला होता. म्हणजे ही सगळी आश्वासने 

५ वर्षात प्रत्यक्षात उतरतील असे ते म्हणत. पुढे त्यांनी ही स्वप्नपूर्ती २०२२ पर्यंत पुढे ढकलली. आता ते पुढच्या ९ वर्षांची गोष्ट करत आहेत. ‘पुढची ९ वर्षे महत्त्वाची’ याचा हा अर्थ घ्यायचा. मोदींच्या विधानातून दोन गोष्टी स्पष्ट होतात : एक म्हणजे २०२९ सालापर्यंत मोदी सत्ता सोपानाच्या आसपासच असतील. आणि दुसरे- २०२४ची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच परिश्रम घेणे सुरू केले आहे. त्यांचे सोबती अमित शाह यांच्यासारखे लोक ‘पुढची ५० वर्षे भाजपच सत्तेवर राहील’, असे सांगत असतात. मोदी असे काही बोलत नाहीत. पण ‘पुढची ९ वर्षे आपण लक्षात ठेवायची’, हे मात्र त्यांनी आता सांगितले आहे!

चिरागकडे बंगला राहील की जाईल? 
लोकशक्ती जनता पक्षाच्या वाटेची राज्यसभेतील जागा रामविलास पासवान यांच्या पत्नी आणि चिरागच्या मातोश्री रीना यांच्याकडे गेल्याने चिरागला जनपथावरील बंगला राहावा म्हणून धडपड करावी लागत आहे. १२ जनपथवरील हा बंगला रामविलास, व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाले तेव्हा देण्यात आला होता. तेव्हापासून तो त्यांच्याचकडे आहे. हा मंत्र्यासाठीच्या राखीव गटातला बंगला असून, चिराग आता तो स्वत:कडे ठेवू शकत नाही. तो दोन वेळा लोकसभेवर निवडून गेला; पण मंत्रिपदाने त्याला हुलकावणीच दिली. रामविलास यांच्या मृत्यूनंतर हा बंगला सर्वसाधारण संवर्गात गेला. सध्या चिरागला मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे निवास व्यवस्थेविषयी मंत्रिमंडळ समिती काय निर्णय घेते यावर हा बंगला चिरागकडे राहतो की नाही ते ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ‘हनुमाना’चे काय होते याकडे  राजधानीत सर्वांचे लक्ष आहे. ‘चिराग पासवान  हे एनडीएचा भाग आहेत की नाहीत’, असे विचारले गेले तेव्हा भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते,‘केंद्रात समीकरणे वेगळी आहेत आणि बिहारमध्ये जे आहे ते आहे’- नड्डा यांच्या उत्तरातल्या या संदिग्धतेवरच आता चिरागच्या आशा टिकून आहेत, म्हणतात !

पदावनतीवर बढती
नवे मुख्य आयुक्त म्हणून यशवर्धन कुमार सिन्हा यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांची एक प्रकारे पदावनती ठरली  हे जरा आश्चर्यकारक होते. माहिती आयुक्त म्हणून त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा दर्जा होता. परंतु ज्या क्षणी त्यांची ‘मुख्य माहिती आयुक्त’ या पदावर नियुक्ती झाली त्याक्षणी  ते मंत्रिमंडळ सचिवाच्या श्रेणीत अवनत झाले. त्यांना पगार, निवृत्तिवेतनाचे लाभ मिळणार नाहीत. गंमत म्हणजे त्यांचे चार जुने सहकारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा दर्जा मिळवतील, आणि तीन नवे सहकारी सचिवपदाचा. २०१८च्या माहिती कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे हे सारे घडले आहे.

अहमद पटेलांच्या बाबतीत काय चुकले?....
अहमद पटेल अचानकच गेले. काँग्रेस पक्षाला नेमकी आता त्यांची सर्वाधिक गरज होती. ही गरज असतानाच त्यांचे जाणे काँग्रेससाठी मोठे धक्कादायक ठरले आहे. राजकारणातले चढउतार त्यांनी पाहिले नव्हते अशातला भाग नाही. याउलट अनेक अडचणीच्य प्रसंगी त्यांनी काँग्रेसला बाहेर काढले होते. त्यांच्या जागी अंबिका सोनी सोनिया गांधी यांच्या राजकीय सचिव झाल्या तेव्हा पटेल यांना झटका बसला. लवकरच ते पुन्हा केंद्रस्थानी आले ही गोष्ट वेगळी ! राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा पटेल यांना हळूच बाजूला केले गेले. गांधी घराण्याच्या या वारसाला त्याची स्वत:ची  टीम हवी होती. परंतु राजकीय समीकरणे उत्तम जाणणाऱ्या सोनिया गांधींनी पटेल यांना आपले मुख्य राजकीय सल्लागार केले. शेवटपर्यंत ते या पदावर होते. नंतर राहुल गांधी यांनाही त्यांच्यात काही गुण दिसले ही बाब वेगळी. अहमद पटेल मग पुन्हा राजकीय रिंगणात आले. पहिल्यांदा ‘कोविड’चे निदान झाल्यावर त्यांना फरिदाबादच्या मेट्रो इस्पितळात मेट्रोने प्रवास करून का जावे लागत होते, हे मात्र शेवटपर्यंत कोडेच राहिले. जेव्हा जेव्हा अहमद पटेल यांची प्रकृती बिघडे, तेव्हा ते मेट्रोत दिसत. 
पुढे त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि अगदी शेवटी गुरुग्रामच्या  मेदान्तात दाखल करण्यात आले. दोन महिन्यात तीन इस्पितळातली ही हलवाहलव त्यांना काही मानवली नाही.

(लेखक लोकमत नवी दिल्लीचे नॅशनल एडिटर आहेत)

Web Title: Modi says, ‘Not 2022 now, live 2029!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.