मोदींचा द्रविडी प्राणायाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 04:00 AM2017-11-07T04:00:43+5:302017-11-07T04:01:01+5:30
तामिळनाडूमधील लोकांना आपल्या द्रविडी संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे. तेथील द्रविडी चळवळीमुळे तिथे राष्ट्रीय पक्ष फारसे रुजलेच नाहीत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यातच कायम तामिळनाडूतील राजकारण सुरू राहिले
तामिळनाडूमधील लोकांना आपल्या द्रविडी संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे. तेथील द्रविडी चळवळीमुळे तिथे राष्ट्रीय पक्ष फारसे रुजलेच नाहीत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यातच कायम तामिळनाडूतील राजकारण सुरू राहिले. काही काळ तिथे काँग्रेसची सत्ता होती, हे खरे. पण तेव्हा काँग्रेसचे तेथील नेतृत्व द्रविडी चळवळीला प्रोत्साहन देणारेच होते. नंतर मात्र द्रमुकच्या कधी या तर कधी त्या गटाशी समझोता करूनच काँग्रेसने वाढण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी वा त्याआधी जनसंघ यांना तिथे कधीच पाय रोवता आलेले नाहीत. गेल्या काही वर्षांत भाजपाने तामिळनाडूमध्ये सारी ताकद लावली खरी. पण त्याची फळे पक्षाला निवडणुकीत कधीच मिळाली नाहीत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची जी भेट घेतली, त्याकडे पाहायला हवे. करुणानिधी यांनी नव्वदी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला पंतप्रधान गेले होते, असे सांगितले जाईल. पण मोदी सहजपणे कोणती कृती करतील, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकच्या एका गटाला ते सतत जवळ करीत राहिले. या दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा मोदी यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यानंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोघांनी मोदी यांच्या वारंवार भेटी घेऊन, मान तुकवण्याचे संकेत दिले. त्यासाठी त्यांनी शशिकला यांनाही पक्षातून दूर केले. म्हणजे तामिळनाडूतील सत्ताधारी पक्षाने मोदी व पर्यायाने भाजपाच्या विरोधात न जाण्याचाच पवित्रा घेतला. तरीही मोदी यांनी चेन्नईमध्ये करुणानिधी यांची भेट घेण्याचे एकमेव कारण म्हणजे तामिळनाडूतील राजकारण बदलत आहे, अण्णा द्रमुकविरोधात वातावरण तयार होत आहे, हे त्यांच्या लक्षात आले असावे. अशा स्थितीत द्रमुकने काँग्रेससमवेत जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही तामिळी पक्ष आपल्यासमवेत असावेत आणि जो फायदेशीर ठरेल, त्याचा उपयोग करून द्रविडी राज्यात पक्षाला पाय रोवता यावेत, असे मोदी यांचेही द्रविडी राजकारण दिसत आहे. कमल हासन अण्णा द्रमुकच्या विरोधात आहेत. पण ते भाजपाच्याही विरोधात आहेत. अण्णा द्रमुकबद्दल नाराजी असलेल्या रजनीकांत यांनाही भाजपाने खूप चुचकारले. पण द्रविडी संस्कृतीच्या भाषेखेरीज काहीच न चालणाºया राज्यात भाजपाला उघड पाठिंबा द्यायला तेही बिचकत आहेत. अशावेळी अण्णा द्रमुकला विरोध होत असेल, तर भाजपला द्रमुकसारखा पर्याय हाताशी हवा असणार. द्रमुकच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणाºया नेत्यांवर कारवाई न करण्याचे आश्वासन मिळाल्यास करुणानिधी आणि त्यांचे पुत्र स्टॅलिन सहजच मोदींना मैत्रीचा हात देऊ शकतात. निवडणुकांना बराच वेळ असला तरी पाळेमुळे न रुजलेल्या भाजपाला आतापासूनच तयारीची गरज आहे. प्रत्यक्षात निवडणुकांच्या वेळी वातावरण पाहूनच भाजपा निर्णय घेईल. त्यात काही चुकीचेही नाही. दुसरीकडे अनेक वर्षे काँग्रेसला साथ देणाºया व केंद्रात मंत्रिपदे मिळवणाºया द्रमुकलाही आता काँग्रेसकडून फारसा लाभ होणार नाही, हे कळून चुकले आहे. प्रादेशिक पक्ष नेहमीच केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेत असतात. अण्णा द्रमुकऐवजी भाजपा आपल्याशी मैत्री करणार असेल, तर करुणानिधी यांच्या पक्षाला ते हवेच आहे. द्रविडी चळवळीची भाषा करणारे दोन्ही द्रमुकचे नेते प्रत्यक्षात ती चळवळ विसरून गेले आहेत आणि ते विधिनिषेधशून्य राजकारण करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला या द्राविडी प्राणायामाचा प्रत्यक्षात किती उपयोग होतो, हे भविष्यात स्पष्ट होईल.