मोदींची चीन भेट : चिनी चष्म्यातून
By admin | Published: May 15, 2015 10:35 PM2015-05-15T22:35:46+5:302015-05-15T22:35:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याकडे चिनी प्रसारमाध्यमे नेमक्या कोणत्या प्रकारे पाहत आहेत याची चर्चा दौऱ्यापूर्वी आपल्याकडे प्रसिद्ध झालेल्या
प्रा. दिलीप फडके -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याकडे चिनी प्रसारमाध्यमे नेमक्या कोणत्या प्रकारे पाहत आहेत याची चर्चा दौऱ्यापूर्वी आपल्याकडे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून वाचायला मिळाली होती. त्यावरून चिनी प्रसारमाध्यमे मोदींवर सडकून टीका करीत असावीत असे वाटायला लागले होते. मग ही टीका समजून घेण्यासाठी तेथील वृत्तपत्रांचा धांडोळा घेतला, पण त्यात मोदींवर टीका करण्यात आलेली आहे, असे काही जाणवले नाही. हु झियोंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्राच्या स्तंभात मांडलेल्या मतांच्या आधारे आपल्याकडच्या बहुतेक वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या आहेत.
भारत आणि चीन यांच्यातले संबंध अतिशय प्राचीन काळापासूनचे असले तरी बासष्टच्या चिनी आक्रमणानंतर त्यांच्यात तणाव निर्माण झाला, हे सत्य आहे. नेहरूंनी चीनशी निकटचे संबंध निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करूनही त्यांना चीनचा जो अनुभव आला त्यामुळे आपल्याकडे चीनकडे अविश्वासाच्या नजरेने पाहिले जाते, हेही नाकारता येणार नाही. अगदी परवापरवा चीनचे राष्ट्रपती मोदींच्या बरोबर झोपाळ्यावर झुलत असतानाच तिकडे सीमेवर चिनी सैनिकांनी घुसखोरी केलीच होती. त्यामुळे चीनबद्दल कायमच अविश्वास वाटत आलेला आहे. भारतीयांच्या मनातली ही भावना हू यांच्या लेखात मांडली गेली आहे इतकेच. मात्र यामुळे चिनी माध्यमे मोदींच्या चीन भेटीकडे नकारात्मक नजरेने पाहत नाहीत असे चिनी माध्यमांमधली चर्चा वाचल्यावर लक्षात येते. नव्या दृष्टिकोनातून विचार करतानाही मोदी सावध आहेत आणि जुन्या नेत्यांप्रमाणे स्वप्नरंजनात अडकलेले नाहीत हीच हु यांची खंत आहे असे दिसते.
‘चायना डेली’मध्ये प्रकाशित अहवालानुसार, सागरी पृष्ठभागाचे खोदकाम आणि त्याच्या विकासासाठी स्थापन अधिकृत संघटना ‘चीन ओशन मिनरल रिसोर्स असोसिएशन’चे उपसंचालक ही जोंग्यू यांनी सांगितले की, चीन आणि भारत दोघेही ‘इंटरनॅशनल सीबेड अॅथॉरिटी’चे (आयएसए) नोंदणी कंत्राटदार आहेत. चीनने हिंद महासागराच्या तळाचे खोदकाम दोन्ही देशांनी एकत्र करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्यासमोर परस्पर सहकार्याच्या चांगल्या संधी आहेत. चीनच्या प्रादेशिक सागरी प्रशासनाचे उपसंचालक चेन लियान जेंग यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि चीनने समुद्राच्या खोदकामात समान पद्धतीने विकास केला आहे. त्यामुळे ते आदर्श भागीदार होऊ शकतात, असे मतही चायना डेलीने व्यक्त केले आहे. नुकतेच मोदींनी वाईबो या चीनच्या सोशल नेटवर्किंग प्रणालीमध्ये आपले खाते उघडले आहे. अल्पावधीत त्यांना जवळपास पंचेचाळीस हजार फॉलोअर्स लाभले आहेत. पीपल्स डेलीने या गोष्टीची विशेष नोंद घेतली आहे आणि मोदींच्या या उपक्रमाचे स्वागतही केले असल्याचे पाहायला मिळते. मोदी भेटीच्या निमित्ताने पीपल्स डेलीने गेल्या साठ वर्षांमधील चीन-भारत संबंधांवर एक चित्रवृत्त प्रकाशित केले आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याची एक मुलाखत पीपल्स डेलीने प्रकाशित केली असून, भारत-चीनमधले संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेबद्दल मोदींच्याच मताचा पुनरुच्चार त्या मुलाखतीत करण्यात आल्याचे दिसते.
‘शिन्गहुवा’ या इंटरनेटवरच्या चिनी वार्तापत्राने मोदींचा व्यापक परिचय प्रकाशित केला आहे. ज्या ग्लोबल टाइम्समधल्या हु झियोंग यांच्या लेखाचा बागुलबुवा उभा केला गेला, त्याच ग्लोबल टाइम्सने मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर संजय नाझरथ या भारतीय पत्रकाराचा एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात आपल्या पक्षाच्या मध्ययुगीन पद्धतीने विचार करणाऱ्या सहकाऱ्यांना बाजूला सारून मोदी आधुनिक भारताचा विचार मांडत आहेत, यावर नाझरथ यांनी भर दिला आहे. याच वृत्तपत्राने जयराम रमेश यांची ‘ड्रॅगन-एलिफंट रायव्हलरी शूड बी रिजेक्टेड’ या शीर्षकाची एक मुलाखतही प्रकाशित केली आहे. त्यात भारत आणि चीन यांनी जुने मतभेद बाजूला ठेवत नव्या संबंधांना सुरुवात केली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आहे. व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सोयींचा विकास या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टींसाठी चीन- भारत संबंध विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत, असा विश्वास त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे. ‘इफेंग.कॉम’ या चिनी भाषिक आॅनलाइन वृत्तसंकेत स्थळावर मोदींच्या चीन भेटीच्या संदर्भात डूपिंग या चिनी पत्रकाराने त्याच्या वार्तापत्रातही हेच मुद्दे मांडलेले आहेत. विशेषत: सर्व राजनैतिक संकेत बाजूला सारून मोदींच्या प्रमाणेच चेअरमन म्हणजे तिथले (राष्ट्रप्रमुख) शी जिनपिंग यांच्या गृहराज्य शियानला मोदींचे स्वत: जातीने स्वागत केले, याचीही त्या वार्तापत्रात विशेष चर्चा केलेली दिसते. मोदींच्या चीन भेटीकडे चिनी माध्यमे कशी पाहतात हे ग्लोबल टाइम्समधल्या एका कार्टूनमधून सहज लक्षात येऊ शकेल.