क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता?

By विजय दर्डा | Published: November 1, 2021 09:32 AM2021-11-01T09:32:13+5:302021-11-01T09:32:40+5:30

पाकिस्तानचे बेजबाबदार गृहमंत्री शेख रशीद आणि धर्माच्या आधारावर आपल्याच खेळाडूचे ट्रोलिंग करणारे भारतीय; दोन्हीही शरमेच्या गोष्टी!

Mohammad Shami, Pakistan: Why do you drag cricket into the arena of religion? | क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता?

क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता?

Next

-  विजय दर्डा 
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होतो तेव्हा त्याकडे दोन शत्रूमधले युद्ध म्हणून का पाहिले जाते; हे मला आजवर समजू शकलेले नाही. दोन्ही देशातले खेळाडू उत्तम दर्जाचे आहेत आणि त्यांच्यातला खेळ गुणवत्तेतली स्पर्धा म्हणूनच पाहिला पाहिजे. ऐनवेळी जो चांगले खेळेल तो सामना जिंकेल; हे अगदी सोपे गणित आहे; पण दुर्दैवाची गोष्ट अशी की शेख रशीद यांच्यासारखे मंत्री आणि आपल्याकडचे काही धर्मांध लोक या खेळाला धर्माच्या धुरात लपेटू पाहतात. हरेक गोष्टीला धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची वाईट खोडच हल्ली लोकांना लागली आहे. यातून खेळांचीही सुटका नाही!

पाकिस्तानच्या दिमाखदार विजयानंतर त्या देशात विजयोत्सव साजरा होणे स्वाभाविक होते; पण मंत्री शेख रशीद यांनी तो विजय चिखलात बरबटवला. बेजबाबदार, मूर्खासारखे बोलण्यासाठी रशीद प्रसिद्धच आहेत. टी- २० जागतिक करंडकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला गेलेला सामना पाकने जिंकल्यावर या महाशयांनी ट्वीट केले, ‘जगभरातल्या मुस्लिमांसह भारतातले मुसलमानही पाकिस्तानबरोबर आहेत. इस्लामला फते मुबारक. पाकिस्तान जिंदाबाद!’

- अहो जनाब, क्रिकेटमध्ये धर्म कोठून आणलात? एका सामन्यात मिळालेला विजय धर्माशी कसा जोडता येईल? तुमचा देश इस्लामिक आहे; पण खेळाचे मैदान धर्माची लढाई खेळण्यासाठी आहे का? 
आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे या शेख महाशयांनी भारतीय मुस्लिमांना काय वाटते याविषयी बोलण्याचे काय कारण? भारतात वैमनस्याचे बी पेरण्याचा त्यांचा इरादा आहे, हे उघडच होय. जनाब रशीद, आमचा देश कोणत्या एका धर्मावर चालत नाही. हा देश एखाद्या बगीचासारखा आहे जिथे विविध रंगांची फुले फुलतात. प्रत्येक फूल आम्हाला आवडते. पुरातन काळापासून सर्वधर्म समभावाचे ब्रीद मानणाऱ्या हिंदुस्तानचे आम्ही रहिवासी आहोत. रशीद साहेब, एके काळी आपणही या बगीचाचा हिस्सा होतात; पण आपल्यासारख्या काही मूर्ख लोकांमुळे पाकिस्तानचा नरक झाला आहे. धर्माची अफू चारून आपण देशाला बेहोशीत ठेवले आहे. जरा सांभाळा जनाब, बरबाद तर आपण होत आहातच; आपल्यावर संपून जाण्याची वेळ न येवो; हीच  अल्लाहच्या दरबारात प्रार्थना! कारण देश कोणताही असो, तो अखेर या जगाचाच एक हिस्सा आहे!  आणि सगळ्या जगातल्या मुस्लिमांचे प्रतिनिधी आपण कसे होऊ शकता? तसे पाहाता, तुमच्या देशातल्या लोकांचेतरी तुम्ही कुठे प्रतिनिधित्व करता? सामान्य पाकिस्तानी नागरिक तुमच्या एवढा विखारी नाही, जनाब! आणि जगातले साडेबारा टक्के मुस्लीम इंडोनेशियात राहतात हे आपणास ठाऊक आहे का? ११ टक्क्यांपेक्षा थोडे अधिक पाकिस्तानात आणि त्यापेक्षा थोडे कमी भारतात राहतात आणि भ्रमात राहू नका, जनाब! भारतीय मुस्लीम या देशाशी एकनिष्ठ आहेत. रशीद साहेब, आपण अब्दुल हमीद आणि अब्दुल कलाम यांचे नाव ऐकले असेल. आम्ही त्यांची आजही पूजा करतो. आता आपले अणुशास्त्रज्ञ कादीर खान यांना आठवा, ते तर चोरलेल्या बॉम्बची सूत्रे जगाला विकत फिरत होते. पाकिस्तानी नेता असद उमर यांनीही संतापजनक ट्वीट केलेय. ते म्हणतात, ‘आम्ही आधी त्यांना हरवतो, मग जमिनीवर पडले की त्यांना चहा देतो.’- अशा प्रकारची टिप्पणी हा मूर्खपणा नाही तर दुसरे काय आहे?

पाकिस्तानकडून असा खोडसाळपणा पूर्वीही झाला आहे. २००७ साली विश्वचषकात भारताने पाकिस्तानला हरवले तेव्हा कप्तान शोएब मलिकने मुस्लीम जगताची माफी मागितली होती. अरे भावा, सगळ्या मुस्लिमांचा प्रतिनिधी पाकिस्तान आहे का? आणि पाकिस्तानला हरवण्यात इरफान पठाणचे योगदान मोठे होते, याची आठवण द्यावी का? तो सामनावीर ठरला. इतकेच नव्हे, तर शोएबला त्यानेच तंबूत पाठवले होते. भारत हा लोकशाही देश असल्याने संघाची निवड धर्माच्या आधारावर होत नाही. पाकिस्तानने अझरुद्दीन आठवावा; ज्याने कप्तान असताना पाकिस्तानच्या संघाला कित्येकदा धूळ चारली  होती. पण प्रत्येकच पाकिस्तानी असा नाही हेही मला माहीत आहे. रशीद यांच्या विधानावर पाकिस्तानातही भरपूर टीका झाली. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्याची आठवण मला होते आहे. त्यात भारत जिंकला होता आणि माझे मित्र हमीद रहमान ऊर्फ सादिया यांनी पाकिस्तानी असूनही भारतीय संघाला पाठिंबा देत तिरंगा फडकवला होता, अशी असते खिलाडूवृत्ती!! अशाच खिलाडू वृत्तीचे दर्शन विराट कोहलीनेही मैदानावर घडवले; परंतु जेव्हा मूठभर धर्मांध लोक  भारतीय खेळाडू मोहम्मद शमीला ट्रोल करू लागतात तेव्हा मात्र या अख्ख्या देशाची मान लाजेने खाली जाते. म्हणून तर ट्रोल करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक क्रिकेटप्रेमी उभा राहिला.

सर्वांनी एकमुखाने म्हटले ‘हे बंद झाले पाहिजे.’ शमीचा काय अपराध? भारताची बॅटिंग लाइन कोसळली, त्याला शमी काय करणार? अशा घटनांमुळे देशातल्या अल्पसंख्य समुदायात  उगीचच भीतीची भावना तयार होते.
विचारस्वातंत्र्याच्या नावाने समाजमाध्यमांमध्ये कोणी विष ओकत असेल, तर त्याला परवानगी कशी देता येईल? सगळ्या जगाला वसुधैव कुटुंबकमचे सूत्र देणाऱ्या भूमीची आपण लेकरे आहोत. द्वेषाला आपल्या जीवनात स्थान असता कामा नये. प्रत्येक धर्म आदरणीय आहे. धर्म त्याच्या ठिकाणी आहे आणि खेळ त्याच्या ठिकाणी!! खेळ खेळच आहे, तो खेळासारखाच खेळला गेला पाहिजे!

Web Title: Mohammad Shami, Pakistan: Why do you drag cricket into the arena of religion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.