मोहित्यांचं कमळ !
By सचिन जवळकोटे | Published: March 19, 2019 03:58 PM2019-03-19T15:58:39+5:302019-03-19T15:59:56+5:30
माढ्यात ठरलं...‘रणजितदादा V/S संजयमामा’
- सचिन जवळकोटे
‘मोहित्यांची मंजुळा’ हा मराठी चित्रपट एकेकाळी तुफान चाललेला, परंतु ‘मोहित्यांचं कमळ’ नावाची नवी राजकीय कहाणी भीमा-सीना नदीच्या खोºयात रंगू लागलीय. आयुष्यभर ‘हातात घड्याळ’ घेऊन राजकारण करणारं मोहिते-पाटील घराणं आजपासून ‘कमळ’ बाळगू लागलं. ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्या ‘तोडमोड के जोड’ या राजनीतीवर ‘रणजितदादां’नी शेवटचा एकच घाव घातला. शंभू महादेवाच्या साक्षीनं शिंगणापूर घाटाच्या परिसरात बंडाचा झेंडा फडकाविला; परंतु ‘बारामतीकर’ही काही कमी नाहीत. त्यांनी तातडीनं आपला शेवटचा हुकमी पत्ता ओपन करण्याची तयारी सुरू केली. माढ्याच्या ‘संजयमामां’नाच ‘रणजितदादां’च्या विरोधात उभं करण्याचा निर्णय घेतला. ‘दादा विरुद्ध मामा’... होऊन जाऊ दे आता..
माढ्यातील माघारीनंतर ‘थोरले काका बारामतीकर’ हे म्हणे ‘विजयदादां’च्या नावाची घोषणा करण्यासाठी तयार होते. मात्र ‘अकलूजकरांचं पुत्र प्रेम’ बारामतीकरांच्या निर्णयाआड आलं. त्यात पुन्हा ‘धाकटे पुतणे बारामतीकर’ही आडवे आले. ’अजितदादां’नी बोलता-बोलता सांगून टाकलं की, ‘माढ्यात सर्वसमावेशक उमेदवारच असेल,’.. याचा अर्थ ‘रणजितदादां’च्या नावावर मोठ्ठीच्या मोठ्ठी फुली. त्यामुळे ‘विजयदादा’ आपल्या स्वभावानुसार नेहमीप्रमाणं गप्प. मात्र ‘रणजितदादां’चं बंडखोर रक्त थोडंच गप्प बसणार? त्यांनी ‘सुजय नगरकर’ यांच्यासोबत गिरीषरावांची भेट घेतली. निमित्त साखर कारखान्याच्या ‘पाणीपट्टी’चं होतं. मात्र चर्चा ‘उमेदवारीची पट्टी’ फाडण्याचीच होती. परंतु असल्या दबावतंत्राला ‘थोरले काका बारामतीकर’ म्हणे कधीच गिनत नव्हते. त्यांनी थेट ‘धवलसिंहां’शी चर्चा केली.. कारण ‘भावकीच्या एकी’पेक्षा ‘भाऊबंदकीची बेकी’ नेहमीच काकांसाठी फायदेशीर ठरलेली.. मग तो सातारा असो, परळी असो की अकलूज.
‘घड्याळ’वाल्यांचे इन-मीन चार खासदार. त्यापैकी तिघेही कामाला लागलेले. कोल्हापुरात मुन्ना, साताºयात राजे अन् बारामतीत तार्र्इंचा प्रचारही सुरू झालेला. बिच्चारे अकलूजकर पिता-पुत्र मात्र बारामतीकरांच्या घोषणेची वाट पाहत तब्बल सात दिवस वेटींगवर राहिले... परंतु, एवढ्या वेळेत ‘देवेंद्र पंतां’नी मुंबईतून तर ‘चंद्रकांत दादां’नी कोल्हापुरातून माढ्याची जोरदार बांधणी केली. पंतांचे अनेकांना फोन गेले. ‘कामाला लागा’चे आदेश सुटले. त्याचाच परिपाक म्हणून की काय आज मंगळवारी ‘रणजितदादां’नी अकलूजमध्ये बंडाचं निशाण फुंकलं. ‘बारामतीकरांना ओपन चॅलेंज’ देण्याची द्वाही अवघ्या महाराष्टÑभर फिरविली. बारामतीच्या राजानं माढ्यात तलवार म्यान केली. मात्र त्यांच्याच सरदारांनं त्यांच्या विरोधात तलवार उपसली. भलेही माढ्याची बारामती झाली नसेल परंतु अकलूजमुळे बारामतीकरांची मती गुंग झाली.
खरं तर, अकलूजला कमळ तसं नवीन नाही. ‘पप्पां’ना खासदार करताना याच अकलूजकरांनी सोलापुरात येऊन कमळं वाटली होती. त्यावेळीही ‘विजयदादा’ नरो वा कुंजरोवाची भूमिका घेत तटस्थ राहिले होते. मात्र आज भलेही त्यांनी हातात ‘कमळ’ धरलं नसलं तरी पुत्रासाठी उघड भूमिका घ्यावीच लागणार आहे. माढ्यात खासदारकीच्या उमेदवारीचा शब्द दिला नाही, असे भलेही ‘कमळ’वाले नेते म्हणत असले तरी शेवटच्या क्षणी ‘रणजितदादा’च अर्ज भरतील, असं खाजगीतच सांगितलं गेलंय. असो, इकडं अकलूजमध्ये बंडाची घोषणा होत असताना दुसरीकडं माढ्यातील शिंदेंच्या गढीतही बºयाच काही धक्कादायक घडामोडी घडू लागल्या. अकलूजकरांनी ‘कमळ ’धरल्यानंतर ‘संजयमामां‘च्या हातात ‘लोकसभेचं घड्याळ’ बांधण्याची तयारी जोरात सुरू झाली. ‘रणजितदादा विरुद्ध संजयमामा’ अशी लढत झाली तर ट्रेंड काय राहील, याची चाचपणीही दिवसभर झाली. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या फेसबुक अकाऊंटवरही लढण्याची तीव्र इच्छा दिसून आलेली. ‘सांगा कस जगायचं.. असंच सहन करत राहायचं की पेटून उठायचं.. तुमचा निर्णय हाच माझा निर्णय असेल,’ अशी पोस्ट ‘रणजितदादां’नी टाकलीय. दुसरीकडं ‘संजयमामां’नीही आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘घेतलेला कोणताच निर्णय चुकीचा नसतो. फक्त तो निर्णय योग्य आहे, हे सिद्ध करण्याची धमक अंगी हवी.’...आता या दोघांमध्येही ही धमक असली तरीही शेवटी निर्णय मतदारांच्याच हाती; कारण तेही उत्सुक बनलेत ‘मोहिते-पाटील V/S शिंदे’ लढत अनुभवायला. खरं तर, या दोन नावांमधला राजकीय संघर्ष सोलापूर जिल्ह्यात अनेक दशकांपासून चालत आलेलाच . फक्त यंदाचं हे शिंदे घराणं ‘सोलापूर’ऐवजी ‘निमगाव’चं... एवढाच फरक !
- सचिन जवळकोटे
(लेखक ‘सोलापूर लोकमत’चे निवासी संपादक आहेत.)