जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही

By विजय दर्डा | Published: October 16, 2017 12:30 AM2017-10-16T00:30:21+5:302017-10-16T00:33:28+5:30

उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल.

 Money is not important for life | जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही

जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही

googlenewsNext

उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल. ही परंपरा नक्कीच चांगली आहे. घरात काही नवी वस्तू आली की त्याने आनंद होणे स्वाभाविक आहे. धनत्रयोदशीनंतर आपण दिवाळी साजरी करू. घरे झगमगून जातील. फुलबाज्या आणि अनार अमावस्येच्या रात्रीचा अंधार दूर करतील. आबाल-वृद्ध फटाके वाजवतील व सर्वत्र आनंदसोहळा असेल.
परंतु या निमित्ताने मला एक गंभीर विषय तुमच्यापुढे मांडावासा वाटतो. ऐहिक सुख म्हणजे सर्वस्व आहे का? भरपूर पैसा-अडका, दागदागिने, ऐटबाज टीव्ही, आरामदायी मोटार, आलिशान बंगला इत्यादी भौतिक गोष्टींनी माणसाचे आयुष्य खरंच आनंदी व समाधानी होते का? जीवन सुगम होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच गरज आहे, पण एवढ्यावरच भागत नाही. तुम्ही ऐश्वर्यात लोळत असाल, पण तुमचे आरोग्य चांगले नसेल तर असे आयुष्य आनंदी, समाधानी म्हणावे का? नक्कीच नाही. आरोग्य चांगले असेल, शरीर साथ देत असेल तरच तुम्ही स्वस्थ आयुष्य जगू शकाल. सध्या समाजाचे आणि देशाचे स्वास्थ्य कसे आहे, याचा आपण कधी विचार केला आहे? देशाची तरुण पिढी झपाट्याने मधुमेहाच्या विळख्यात ओढली जात आहे. मुलींमधील कुपोषण वाढत आहे. तरुण पिढीच सशक्त व आरोग्यसंपन्न नसेल तर त्या देशाचे आरोग्य तरी कसे ठीक असेल? त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आपण किती वेळ देता व मुला-बाळांच्या आरोग्याची किती काळजी घेता याचा या दिवाळीच्या निमित्ताने गांभीर्याने विचार करा.
मला असे वाटते की, सुसंस्कार व विचाररूपी धन यादृष्टीनेही समाज झपाट्याने कंगाल होत चालला आहे. आपल्या मोहल्ल्यात व गावात जरा पाहा किती तरुण आपल्या वडीलधाºयांना आदराने वागवतात. गावातील कोणीही वृद्ध समोरून येताना दिसला की त्याची आदराने विचारपूस करायची, प्रणाम करायचा असा काळही मी पाहिला आहे. पण हल्लीचे तरुण वडीलधारी व्यक्ती जात असली तरी खुश्शाल सिगारेट ओढत तिच्या समोरून जातात. समाजातील व बाहेरच्यांची गोष्ट सोडा. अनेक घरांमध्ये घरातील वृद्धांनाही वाईट वागणूक दिली जाते. जे आपल्या माता-पित्यांना बेसहारा सोडून देतात त्यांची तर गोष्टच करायला नको. समाजात वैचारिक मलिनता आश्चर्यकारक वेगाने फोफावत आहे. तुमच्या घराशेजारी कोणी दु:खी व्यक्ती राहात असेल तर तुम्हीसुद्धा सुखी राहू शकत नाही, असे पूर्वी वडीलधारी मंडळी सांगायची. परंतु आज नेमकी उलटी स्थिती आहे. आपल्या शेजारी कोण राहते आणि तो कोणत्या परिस्थितीत आहे याच्याशी हल्ली कोणाला सोयर-सूतक राहिलेले नाही. श्रीमंतांच्या डोक्यात पैशाची अशी काही हवा जाते की आपल्याहून कमी पैसेवाल्याशी दोस्ती हा त्यांना कमीपणा वाटतो. संपूर्ण समाज जणू पैशाभोवती फिरत असावा, असे वाटते. अनेक श्रीमंत आपले हित साधण्यासाठी कायदा आणि न्याय विकत घेऊन संपूर्ण व्यवस्थाच खिशात कशी घालता येईल, याच्याच सदोदित फिकिरीत असतात.
माझे असे मत आहे की, जगण्यासाठी पैसा लागतो व प्रत्येकाने धनवान होण्याचे प्रयत्न जरूर करावे. पण धनवान व्हायचेच असेल तर टाटा. बिर्ला, बिल गेट््स, अझीम प्रेमजी, नारायण मूर्ती यांच्यासारखे धनवान व्हा. अझीम प्रेमजी एवढे धनाढ्य पण त्यांचा साधेपणा एवढा की विमानात ते ‘इकॉनॉमी क्लास’ने प्रवास करतात. पैसा जरूर कमवावा , पण पैशाचा अहंकार येऊ देऊ नये. पैसा हे केवळ बायप्रॉडक्ट’ आहे अशी वृत्ती ठेवलीत तर तुमचे जीवन कितीतरी अधिक आनंदी व समाधानी होईल. बिल गेट््स यांचे उदाहरण आपल्या समोर आहे. मायक्रोसॉफ्टच्या रूपाने त्यांनी संगणकांच्या जगात क्रांती घडविली. त्यातून जो अमाप पैसा मिळाला त्याचा उपयोगही त्यांनी समाजाच्या भल्यासाठी केला! अशा गर्भश्रीमंतांचे वागणे खरं तर गांधीजींच्या ‘ट्रस्टीशिप’च्या सिद्धांतानुसार असते. आपल्या वैभवाने मुलाला वैभवशाली बनविणे यात मोठेपण नाही. आपल्या वैभवाचा उपयोग जो इतरांना सक्षम करण्यासाठी करतो त्याची समाज शतपटीने इज्जत करतो. टाटांच्या घराण्याने रग्गड पैसा मिळविला, पण त्या पैशाने त्यांनी समाजाला समृद्ध केले. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आज भारत नवनवीन भराºया घेत आहे. पण फार थोड्या लोकांना हे माहीत असेल की, सुरुवातीच्या काळात यासाठी जमशेदजी टाटा यांनी बराच पैसा खर्च केला. प्रत्येकाने याचा विचार करायला हवा की आपण जे धन म्हणून कमावतो आहोत त्याखेरीज वेगळ््या स्वरूपाचे धन आहे व जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी त्याची नितांत गरज असते. जणू हे दुसरे धन जगण्यासाठी लागणारा आॅक्सिजन आहे. मला गोपालदास नीरज यांच्या दोन ओळी आठवतात. पाहा किती सार्थ आहेत त्या...
तुम दिवाली बनकर जग का तम दूर करो,
मै होली बनकर बिछडे हृदय मिलाऊंगा!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
फटाक्यांवरून सध्या बरेच रणकंदन सुरू आहे. काही लोक फटाक्यांचा संबंध प्रदूषणाशी जोडत आहेत. पण मला वाटते की, आपल्या परंपरा व संस्कृती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फटाके वाजले नाहीत, फुलबाज्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला नाही तर दिवाळीची मजा ती काय? जगातील इतर संस्कृतींमध्येही आतषबाजीची परंपरा आहे. परंपरांमध्ये ढवळाढवळ होता कामा नये.

Web Title:  Money is not important for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.