पैसा बोलता है; बीसीसीआयने अक्षरश: खोऱ्यासारखा पैसा कमविला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:22 AM2021-11-11T08:22:43+5:302021-11-11T08:22:55+5:30

भारतीयांच्या क्रिकेटवेडाचे पैशात कसे रूपांतर करून घ्यायचे, याची पुरेपूर कल्पना भारतीय क्रिकेट नियामक मंडळास ( बीसीसीआय ) आहे. कुठलीही ...

Money speaks; The BCCI Earn money | पैसा बोलता है; बीसीसीआयने अक्षरश: खोऱ्यासारखा पैसा कमविला

पैसा बोलता है; बीसीसीआयने अक्षरश: खोऱ्यासारखा पैसा कमविला

Next

भारतीयांच्या क्रिकेटवेडाचे पैशात कसे रूपांतर करून घ्यायचे, याची पुरेपूर कल्पना भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) आहे. कुठलीही शासकीय बंधन नसलेल्या या मंडळाने अक्षरश: खोऱ्यासारखा पैसा कमविला आहे आणि कमवीत आहे. आयपीएलच्या माध्यमातून खेळाडूंचीही चांदी होत आहे. त्यामुळे या ‘यशस्वी मॉडेल’ने जगभरातील खेळाडूंनाही आकर्षित केले आहे. भारतीयांचे क्रिकेटप्रेम पाहता या खेळाला टीव्ही माध्यमातूनही उत्तम पैसा मिळतो आहे. जोपर्यंत भारतीय संघ मैदानावर असतो, त्या सामन्याची तिकिटे हातोहात विकली जातात. अगदी अलीकडेच झालेला भारत-पाकिस्तान टी-२० सामना जगभरातील सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेला सामना ठरला.

भारत हरल्यानंतर ‘टीआरपी’ धाडकन कोसळला, ही गोष्ट वेगळी. मुळात क्रिकेटविश्वात सध्या ‘पैसा बोलता है’, अशीच परिस्थिती आहे. पराभवानंतरच्या कारणांमध्ये ‘अतिक्रिकेट’ हा मुद्दा चर्चेत आला. खरेतर, बीसीसीआय जेव्हा आपल्या संघाचे वेळापत्रक तयार करते तेव्हा सर्व नियोजनांची कल्पना खेळाडू आणि प्रशिक्षकांनाही असतेच. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक यांना अतिक्रिकेटचा ‘दृष्टांत’ तेव्हाच का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. कोरोनामुळे यंदाची आयपीएल दोन सत्रांमध्ये खेळविण्यात आली. पहिले सत्र भारतात झाल्यानंतर दुसरे सत्र यूएईमध्ये खेळविण्यात आले. कोरोनामुळे गेले वर्षभरापासून प्रत्येक मालिकेदरम्यान संघांना बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. अशा निर्बंधांमध्ये सातत्याने राहणे अत्यंत आव्हानात्मक ठरते. फक्त हॉटेल रूम ते मैदान असाच प्रवास होत असल्याने निश्चितच याचा खेळावर आणि मनावर परिणाम होतो.

यूएईतील आयपीएल संपल्यानंतर दोन-तीन दिवसांनीच टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याचे सर्वांनाच ठावूक होते. केवळ भारतीयच नाही, तर विदेशी खेळाडूंनाही याची कल्पना होती. मात्र तरीही कोणीही याविरुद्ध आक्षेप घेतला नाही किंवा आपली अडचण सांगितली नाही. कारण, ‘पैसा बोलता है.’ हीच पैशांची भाषा बीसीसीआयसह आयसीसीलाही हळूहळू उमगू लागली आहे. भारतीय संघ आणि खेळाडूंची असलेली प्रचंड लोकप्रियता कॅश करण्यासाठी भारताचे सर्व सामने संध्याकाळी खेळविण्याचा घाट घालण्यात आला. प्रत्येक आघाडीचा संघ किमान एक सामना दिवसा खेळला, पण भारतीयांना सर्व सामने रात्री खेळावे लागले. अशा सामन्यांमध्ये दवाचा मोठा परिणाम होत असल्याने नाणेफेक अत्यंत महत्त्वाची ठरते. नेमकी पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध हीच बाब भारताच्या विरोधात गेली आणि जे संभाव्य विजेते म्हणून स्पर्धेत नावाजले गेले होते, त्यांचे आव्हान एका झटक्यात संपुष्टात आले.

कोहलीनंतर टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे आली असून, भारताच्या प्रशिक्षकपदी ‘दी वॉल’ राहुल द्रविड यांची निवड झाली. कोहलीने आपल्या आक्रमक वृत्तीने कर्णधार म्हणून वेगळी छाप पाडली. त्याने  नेतृत्व सोडल्याने क्रिकेटप्रेमींना दु:ख झाले असले, तरी रोहित आणि द्रविड यांच्यामुळे तितकाच आनंदही झाला आहे. आयपीएलमध्ये विक्रमी ५ जेतेपद जिंकणारा कर्णधार आणि नवोदित खेळाडूंना एखाद्या जवाहिराप्रमाणे चमकवणारा प्रशिक्षक भारतीय संघाला लाभल्याने आता आपली वाटचाल शानदार ठरणार, याची क्रिकेटप्रेमींना खात्री वाटते. अर्थात येत्या काही दिवसांत ते समजेलही.  आज क्रिकेटमध्ये जो पैसा आहे, त्या तुलनेत इतर खेळांमध्ये हा पैसा खूपच कमी आहे.

‘क्रिकेट म्हणजे सोन्याची खाण आहे’, यामागे अर्थातच बीसीसीआयचे अचूक नियोजन आणि सक्षम प्रणालीचेही यश आहे. पण आता देशी खेळांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना उर्जितावस्था मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडूही पुढे येतील. आपण भारतीयदेखील घराघरांत सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांचीच उदाहरणे देतो. त्याऐवजी आज नीरज चोप्रा, मीराबाई चानू, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू यांची उदाहरणे दिल्यास नक्कीच इतर खेळांनाही सुगीचे दिवस येतील. इतर खेळांनाही ग्लॅमर आणि पैसा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कबड्डीने ‘प्रो कबड्डी लीग’द्वारे हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. त्यावरुन क्रीडा मंत्रालयाने इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्याची हीच वेळ आहे. अर्थात सध्या क्रिकेटवेडाने पछाडलेल्या वातावरणात वेगळा विचार कितपत रुचेल, सांगणे तूर्त कठीण आहे. तरीही वेगळा विचार करायला हवा, हे नक्की.

Web Title: Money speaks; The BCCI Earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.