पैसा ‘सुख’ देईल, पण ‘समृद्धी’ कमवावी लागेल! मुलांना फक्त पैसे कमवण्यासाठी शिकवावे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 07:46 IST2025-03-28T07:45:22+5:302025-03-28T07:46:28+5:30

आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे; परंतु संस्कृती, मूल्ये आणि भावनिक बुद्धिमत्ता अर्थपूर्ण जीवन घडवतात

Money will bring 'happiness', but 'prosperity' has to be earned! Should children be taught only to earn money? | पैसा ‘सुख’ देईल, पण ‘समृद्धी’ कमवावी लागेल! मुलांना फक्त पैसे कमवण्यासाठी शिकवावे का?

पैसा ‘सुख’ देईल, पण ‘समृद्धी’ कमवावी लागेल! मुलांना फक्त पैसे कमवण्यासाठी शिकवावे का?

डॉ. के. पी. वासनिक, निवृत्त अतिरिक्त आयुक्त, भारत सरकार, नवी दिल्ली

अलीकडेच मी राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एका उद्योजकीय संघटनेच्या अध्यक्षांना भेटलो. देशभरात त्यांचे व्यावसायिकांचे एक मजबूत नेटवर्क आहे. ते सांगत होते, ‘आमच्या संघटनेचे सदस्य भरपूर पैसे कमवत आहेत आणि आम्ही त्यांना नवश्रीमंतांपासून अधिक श्रीमंत बनवत आहोत.’ मी  त्यांना विचारले, सदस्यांच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तुमच्या संघटनेने काही विचार केला आहे का? ‘माझ्या चेहेऱ्याकडे आश्चर्याने पाहात त्यांनी हसून विचारले, ‘सांस्कृतिक समृद्धी म्हणजे काय?’

आर्थिक प्रगती ही प्रत्येक व्यक्तीसाठी, समाजासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाची आहेे; परंतु त्यासोबतच आपला सांस्कृतिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे.  सांस्कृतिक विकास म्हणजे श्रद्धा, मूल्ये, परंपरा, रीतिरिवाज, कला, भाषा आणि सामाजिक नियमांच्या बाबतीत आधुनिक विचारसरणी प्रमाणे विकासाची प्रक्रिया होय. 

कलात्मक अभिव्यक्ती,  भाषा आणि संवादाच्या साधनांचा विकास, सामाजिक समजुतींमध्ये कालानुरूप सुधारणा, तत्त्वज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास, नैतिक श्रद्धा, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाबद्दलच्या दृष्टिकोनात बदल, विविध संस्कृतींमधील कल्पनांचे स्वागत आणि स्वीकार हे सारे आत्मसात करण्याचा प्रयत्न सांस्कृतिक समृद्धीच्या दिशेने नेतो.

श्रीमंत समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या विकसित असावा, असा समज असू शकतोे; परंतु केवळ संपत्ती सांस्कृतिक विकासाची हमी देत नाही. पण पैसा सांस्कृतिक विकासात योगदान मात्र देऊ शकतो. कला आणि शिक्षणात पैसे गुंतवल्याने समाजाला संग्रहालये, विद्यापीठे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना निधी देणे शक्य होते. पुरेसे धन भौतिक सुखसोयी आणि संसाधने प्रदान करते, तर सांस्कृतिक विकास मानवी चारित्र्य समृद्ध करतो, सर्जनशीलता वाढवतो आणि सामाजिक बंध मजबूत करतो. संपत्तीचे असमान वाटप  सांस्कृतिक संधी केवळ उच्चभ्रू लोकांपुरत्या मर्यादित करते, ज्यामुळे एकूण सांस्कृतिक प्रगतीला अडथळा येऊ शकतो. सांस्कृतिकदृष्ट्या प्रगतिशील समाज म्हणजे कला, परंपरा आणि सामाजिक रीतिरिवाजांमध्ये सांस्कृतिक अभिव्यक्ती, विविधता आणि नवोपक्रमांना सक्रियपणे प्रोत्साहन देणे होय. सांस्कृतिकदृष्ट्या विकसित समाज  आर्थिक समृद्धीपलीकडे जाऊन आपला वारसा, सर्जनशीलता आणि नैतिकता यांना महत्त्व देतो. 

आपण मुलांना फक्त पैसे कमवण्यासाठी शिकवावे का? - हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. मुलांना दोन्ही गोष्टी  शिकवल्या पाहिजेत - पैसे कसे कमवायचे आणि सांस्कृतिकदृष्ट्या कसे पुढे जायचे. जगण्यासाठी आणि यशासाठी आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे; परंतु संस्कृती, मूल्ये आणि भावनिक बुद्धिमत्ता अर्थपूर्ण जीवन घडवतात.

जर आपण मुलांना फक्त पैसे कमवायला शिकवले तर ते भौतिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतात; परंतु त्यांच्यात भावनिक खोली, मानवी मूल्ये, नैतिकता किंवा आंतरिक समाधानाचा अभाव असेल. दुसरीकडे, जर ते केवळ सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झाले; परंतु आर्थिक कौशल्ये शिकले नाहीत, तर त्यांना आधुनिक जगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागेल.

फक्त आर्थिक प्रगती हेच ध्येय असेल आणि शरीराचा वरचा मजला (मेंदू ) रिकामा असेल तर जीवन हे पशुपेक्षाही नीच स्तरावर आहे असेच म्हणावे लागेल. कोणतीही व्यक्ती किंवा संघटना, जिला समाजाला आधुनिक, वैज्ञानिक विचारसरणीच्या मार्गावर घेऊन जायचे आहे, ती समाजात सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी निर्णायक आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतो. आपण स्वतःमध्ये सांस्कृतिक बदल घडवून आणला आणि स्वतःला, आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि समाजातील एका तरी व्यक्तीला सामाजिक दुष्कर्मांपासून आणि अंधश्रद्धांपासून मुक्त केले तर  तुमचे मानवी जीवन अर्थपूर्ण झाले असे खात्रीने म्हणता येईल.

Kpwasnik2002@gmail.com

Web Title: Money will bring 'happiness', but 'prosperity' has to be earned! Should children be taught only to earn money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.