माकडाच्या पिलाची झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:35 AM2017-11-30T00:35:42+5:302017-11-30T00:35:59+5:30
प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकरांनी म्हटले आहे की, ‘‘साहित्यावर प्रेम करण्यासाठी निसर्गाला गुरूकरा, वृक्षाला गुरू करा, आईला गुरू करा.’’ या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ज्यातून जीवनाचा बोध घडतो. ते सारे गुरुत्वातच असते.
- डॉ. रामचंद्र देखणे
प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकरांनी म्हटले आहे की, ‘‘साहित्यावर प्रेम करण्यासाठी निसर्गाला गुरूकरा, वृक्षाला गुरू करा, आईला गुरू करा.’’ या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ज्यातून जीवनाचा बोध घडतो. ते सारे गुरुत्वातच असते. निसर्गाकडे, निसर्ग घटकांकडे आणि विशेषत: प्राणीजीवनाकडे जरा बारकाईने पाहा, कितीतरी गोष्टी आपल्याला शिकता येतील.
ज्ञानदेवांनीही वृक्षाला सद्गुरू म्हटले आहे. एके ठिकाणी सुंदर रूपक मांडले आहे. एक प्रवासी रखरखीत उन्हात पायी प्रवास करतो आहे. चालताना एक छानसे झाड दिसते आणि त्याच्या दाट सावलीखाली तो विसावतो. ज्ञानदेव म्हणतात, ‘‘अशा वृक्षाची सावली, वाटे जाता मीनली’’ ती सावली कितीही सुसह्य असली तरी घरी घेऊन जाता येत नही. तिला आसक्तीने बळेच ओढून घरी नेता येत नाही. सावली हवी असेल तर वृक्षाखालीच विसावा घ्यायला हवा. अवास्तव आसक्ती काय कामाची? नुकताच मी एका गावी व्याख्यानाला गेलो होतो. एका अतिथीगृहात माझी निवासाची व्यवस्था केली होती. अतिथीगृहाच्या पाठीमागे काही कौलारु आणि पत्र्याची घरे होती आणि काही अंतरावर दाट झाडी होती. मी खिडकीतून पाहत होतो. एक माकडाचे टोळके त्या पत्र्याच्या घरावर बसले होते आणि शेजारी उभ्या असलेल्या झाडाची काही पाने, फळे ओढून खात होते. त्यामध्ये एक माकडीण होती आणि तिच्या पोटाला लहान पिल्लू बिलगून बसले होते. माकडाचे या घराच्या छपरावरून त्या घराच्या कौलांवर तिथून पुन्हा झाडावर उड्या मारणे चालले होते. पण ते बिलगलेले पिल्लू काही माकडीणीला सोडेना. तिने त्याला पोटाशी धरूनच प्रथम उडी मारली आणि क्षणभर थांबून पुन्हा पहिल्याच पलीकडच्या छपरावर जाऊन थांबली. पिलाला पोटापासून वेगळे केले आणि त्याला तिथेच ठेवून त्या छतावरून पुन्हा पलीकडच्या छतावर उडी मारली. पिलाने ते पाहिले. तो एकटाच राहिला. थोडा घाबरला. सगळी माकडे अलीकडच्या छतावर तो एकटाच तिकडे. माकडीणीने पिलाकडे पाहिले आणि त्या पिलाने मोठ्या धैर्याने पलीकडच्या छतावर झेप घेत उडी मारली. ते आईजवळ पोचले आणि मी खिडकीतून टाळ्या वाजवल्या. आपल्या पिलाच्या अंगात बळ द्यायच असतं. हे देखील कळलं आणि केव्हा द्यायचं हे देखील. जगण्याच्या सामर्थ्याचे यापेक्षा मोठे शिक्षण कोणते?