एकाधिकारशाहीकडून सामूहिक नेतृत्वाकडे!
By admin | Published: February 4, 2017 04:32 AM2017-02-04T04:32:00+5:302017-02-04T04:32:00+5:30
पक्षाला खिशात ठेऊन नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांबद्दल जनमानसात होणाऱ्या चर्चा लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्व व निर्णयाचे धोरण स्विकारले गेले असेल
- किरण अग्रवाल
पक्षाला खिशात ठेऊन नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांबद्दल जनमानसात होणाऱ्या चर्चा लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्व व निर्णयाचे धोरण स्विकारले गेले असेल, तर ते पक्षांतर्गत स्वच्छताकरणाच्या दिशेने उचललेले पाऊलच म्हणायचे!
एकाच व्यक्तीकडे अधिकार एकवटले की एकाधिकारशाही आकारास आल्यावाचून राहात नाही, त्यातून नुकसानच संभवते; हे उशिराने का होईना अजित पवार यांच्या लक्षात आले हे बरेच झाले म्हणायचे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामूहिक नेतृत्व व जबाबदारीचे धोरण अंगीकारत असल्याचे त्यांनी सांगितले; पण त्याला अंमळ उशीरच झाला आहे.
नाशकात ढासळलेल्या पक्ष-संघटनात्मक स्थितीला सावरण्यासाठी नुकताच अजित पवार यांचा जो दौरा झाला तो खऱ्या अर्थाने अनेक संकेत देणारा किंवा काही बाबींची स्पष्टता करणाराच ठरला आहे. तसा त्यांच्यापूर्वी मोठ्या साहेबांचा म्हणजे खुद्द शरद पवार यांचाही याच कारणासाठी नाशिक दौरा होऊन गेला; पण त्यांनी त्यांना साजेशे मोठेपण दर्शवित भुजबळांच्या मुद्द्यावर फारसे बोलणे टाळले होते. शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेल्या फलकांवरून छगन भुजबळ यांचे छायाचित्र गायब झाल्यामुळे भुजबळ समर्थकांनी धुसफूस केली होती. त्यावर भाष्य न करता, न्यायव्यवस्थेवर विश्वास प्रदर्शित ‘भुजबळ आजही आमचे नेते आहेत’, असे जुजबी वक्तव्य करून शरद पवार यांनी वेळ मारून नेली. पण फटकळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या अजितदादांनी मात्र ‘आपण भुजबळ समर्थक असलो तरी लोक वेगळा विचार करतात’ असे म्हणत फलकावरील भुजबळांची प्रतिमा हटविल्याप्रकरणाचे समर्थन केले. भुजबळांना अपसंपदेच्या कारणातून गजाआड व्हावे लागल्याने, त्यांच्याबाबत लोकांमध्ये केल्या जाणाऱ्या वेगळ्या विचाराची अजित पवार यांनी दखल घेणे व तितकेच नव्हे तर पक्ष कुणावाचून थांबत नाही असेही सांगणे म्हणजे, पक्षातील स्वच्छताकरणाचा सुस्पष्ट संकेतच ठरावा.
तथापि, शरद पवार यांनी भुजबळ यांना सांभाळून घ्यायचे आणि अजित पवार यांनी उर्वरिताना गोंजारायचे, ही नाशिकच्या बाबतीतली आजवरची परिपाठी राहिली असली तरी, सद्यस्थितीत लोकमानसाचा विचार करता भुजबळांपासून अलिप्तता प्रदर्शिण्याची स्पष्टता झाल्याने बदलत्या राजकारणाची चाहूल मिळून गेली आहे. विशेषत: महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा काळ सुरू असल्याच्या व ‘भुजबळ म्हणजे पक्ष’ अशी नाशकातील परिस्थिती करून ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर तर त्याचे महत्त्व काहीसे अधिकच आहे. आजवर आपल्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या व आघाडी-अंतर्गत काँग्रेसला वाकवू पाहणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा महापालीका निवडणुकीसाठी काही प्रभागात उमेदवार शोधण्याची वेळ आली. आतापर्यंत राहिलेला नेतृत्वाचा एकछत्री अंमल व याच नेतृत्वावर लागलेले लांछन, यामुळेच या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ पक्षावर आली. अजित पवार यांनी नेमके याच मर्मावर बोट ठेवले व भुजबळांच्या मुठीतून पक्षाची सोडवणूक करताना ‘सामूहिक नेतृत्वाचा व निर्णयाचा’ राग आळवला. अर्थात, नाशकातील भुजबळच नव्हे तर, राज्यातील जागोजागचे या पक्षाचे असे अनेक नेते आहेत की जणू त्यांच्या दावणीलाच पक्ष बांधला गेला आहे. परंतु ‘जब चिङीया चुग गई खेत’ या हिंदीतील म्हणीसारख्या स्थितीत सामूहिक नेतृत्वाचा अवलंब केला गेल्याने त्यातून कितीसे पक्षहित साधले जाणार हादेखील प्रश्नच ठरावा.
राहता राहिला प्रश्न, अजित पवार यांनी चिंतीलेल्या समाजभानाचा, तर ते खुद्द त्यांच्या पक्षासाठीच नव्हे तर एकूणच राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरावे. शिवसेना व भाजपात सध्या सुरू असलेल्या औकातीच्या राजकारणामुळे टीकेच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या असून, समाजमनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून ‘महाराष्ट्राच्या वैचारिक संस्कृतीला मुख्यमंत्री हरताळ फासत आहेत’ अशी टीका अजितदादांनी केली हेही बरेच झालेच म्हणायचे कारण, ‘करंगळी’ दाखवित धरणे भरण्याची भाषा करणारे जर राज्याच्या संस्कृतीची चिंता वाहताना दिसणार असतील तर खरेच किती बदलतोय महाराष्ट्र माझा, याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीही समाधानच मानावे.