मान्सूनचा इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2023 07:34 AM2023-06-07T07:34:51+5:302023-06-07T07:35:30+5:30
अलीकडच्या काळात भारतीय हवामान विभागाने केलेल्या सुधारणांनी बहुतांश अंदाज खरे ठरत आहेत.
जाता जाता इशारा केला जातो, तसा मान्सूनचा पाऊस येता येता इशारा कोणता देत आहे, या चर्चेने चिंतेत पडावे, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. १ जून ते ३० सप्टेंबर हे भारतीय उपखंडातील पावसाळ्याचे मुख्य दिवस आहेत. त्यानुसार नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराने १ जून रोजी केरळ प्रांतात पावसाला सुरुवात होते. चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा ठरेल की नाही, माहीत नाही.
मात्र, अलीकडच्या काळात भारतीय हवामान विभागाने केलेल्या सुधारणांनी बहुतांश अंदाज खरे ठरत आहेत. २०१९ आणि २०२० मध्ये शंभर टक्क्याहून अधिक पाऊस होईल, हा अंदाज खरा ठरला आणि अनुक्रमे ११० टक्के व १०९ टक्के पाऊस झाला. या हंगामात तो सरासरी शंभरपेक्षा कमी असेल, असा अंदाज आहे. याशिवाय काही कमी दिवसांत अधिक पाऊस होईल आणि महापुराचा धोका जाणवेल, असेही म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि हवामान व्यवस्थापनेच्या दृष्टीने मान्सूनचा पाऊस फार महत्त्वाचा आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेवर शेतीच्या उत्पादनाचा मोठा परिणाम होत असतो. गेल्या चार-पाच वर्षांत सरासरी पाऊसमान चांगले होत असल्याने आपला देश तांदूळ उत्पादनात आघाडीवर पोहोचला आणि जगातील प्रथम क्रमांकाची निर्यातदार बनला. साखर उत्पादन, नारळ, तेलबिया, गहू, मका आदी पिकांसाठीदेखील मान्सूनचा पाऊस उत्तम होणे आवश्यक आहे.
अलीकडेच आपल्या देशाने लोकसंख्येत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ही लोकसंख्या १४० कोटी पार करून गेली आहे. या महाकाय लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी आवश्यक शेतीमालाचे उत्पादन होणे अत्यावश्यक आहे. मान्सूनचा पाऊस कमी झाला, तर पाणीटंचाई, दुष्काळसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अन्नधान्याच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. देशातील पंचेचाळीस टक्के शेती ओलिताखाली आली आहे. उर्वरित पंचावन्न टक्के शेती थेट पावसावर अवलंबून आहे. ओलिताखालील शेतीसाठीही धरणे भरणे आवश्यक आहे. आपल्याला धरणांद्वारे उपलब्ध होणारे पाणी त्या-त्या वर्षात रब्बी तसेच उन्हाळी हंगामात वापरून संपते. भारतीय शेती आणि मान्सूनचा पाऊस याचे नाते शरीरातील रक्तपुरवठा आणि शरीराचा जिवंतपणा याच्यासारखा आहे. त्यामुळेच दरसालाप्रमाणे सर्वात गोड बातमी घेऊन १ जून रोजी केरळ या देवभूमीत प्रवेश करणारा मान्सून मध्येच थांबला, या बातमीने काळजाचे ठोके वाढावेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. १ जूनऐवजी ८ दिवस उशिरा मान्सून यावर्षी भारतात पोहोचेल, हा अंदाज खरा ठरेल.
एकूण पावसाचे १२२ दिवस असले आणि त्यातील ८ दिवस वाया गेले, तरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. मात्र यावर्षी पाऊसच कमी होणार, या इशाऱ्यामुळे मान्सूनचा इशारा तरी काय आहे, असा भीतीयुक्त सवाल मनात येतोच. तुलनेने तापमान वाढले नसेल, तरी घामेघूम व्हावे, अशी उष्णता जाणवत होती. त्या पार्श्वभूमीवर कधीचा एकदा पाऊस पडतो आणि हवामानात बदल होतो, याची उत्सुकता लागून राहिली आहे. केरळच्या एक-दोन दिवस आधी लक्षद्वीप बेटांवर पाऊस कोसळतोच, पण तेथेही त्याचे आगमन झालेले नाही. गेल्या दशकापासून पावसाची सरासरी गाठली जात असली, तरी जून किंवा जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या होण्यासाठी आवश्यक पाऊस पडेलच, अशी शक्यता नसते. जुलैमध्ये अतिरिक्त पाऊस होऊन दुबार पेरणीची वेळ येतेय. गेल्यावर्षी परतीच्या मान्सूनने एक महिना तळ ठोकला होता. परिणामी रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही भागात खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. काढणीच्यावेळी अतिरिक्त पाऊस होऊन नुकसान झाले. अवकाळी पावसाने रब्बीवर घाला घातला गेला.
दरवेळी सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. वर्षातून दोन-तीनवेळा पंचनामे करावे लागले. कोणती नुकसानभरपाई द्यायची आहे, यात सरकारचा गोंधळ उडत होता आणि कोणती नुकसान भरपाई मिळायची होती, याचा हिशेब मांडणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीत आणले होते. मान्सूनच्या या लहरीपणाचा सर्वात मोठा फटका तेलबियांच्या उत्पादनावर झाला आणि सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करावे लागले. मान्सूनचे महत्त्व यासाठी आहे. त्याचा खूप मोठा फटका परकीय चलनापासून ते सरकार तसेच शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होतो. आपण आता ८ जूनची वाट पाहणे एवढेच हातात आहे. मान्सूनचा इशारा उत्साह वाढविणारा नक्कीच नाही.