सर्वांत शुद्ध, स्वस्त सोन्याच्या ‘दुबई’चं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 08:52 AM2021-06-26T08:52:44+5:302021-06-26T08:52:54+5:30
दुबईतील तब्बल ८३० मीटर उंचीचा ‘बुर्ज खलिफा’ हा टॉवर कित्येक वर्षांपासून जगभरातील लोकांचे आकर्षणाचे ठिकाण बनले आहे.
संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे. मसाले, मोती आणि सोन्यासाठी या शहराची ओळख जवळपास शतकापासून आहे. जगाच्या अनेक देशांतील लोक, व्यापारी यासाठी वर्षानुवर्षांपासून दुबईला भेट देतात. याशिवाय आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इथल्या गगनचुंबी इमारती, लक्झरी शॉपिंग, अल्ट्रामॉडर्न आर्किटेक्चर आणि नाइट लाइफ इत्यादी कारणांसाठीही दुबई अलीकडच्या काळात पर्यटकांची पहिली पसंती ठरले आहे.
दुबईतील तब्बल ८३० मीटर उंचीचा ‘बुर्ज खलिफा’ हा टॉवर कित्येक वर्षांपासून जगभरातील लोकांचे आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. दुबईची ही सारी वैशिष्ट्ये आहेतच, पण त्यांना मागे टाकत अलीकडच्या काळात दुबईनं जगभरात ‘सिटी ऑफ गोल्ड’ अशी आपली ओळख निर्माण केली आहे. चोख, स्वस्त आणि पिवळ्याधमक सोन्यामुळे जगातील सोन्याचा बहुतेक व्यापार दुबईतून चालतो.
सर्वसामान्य लोकही सोनं आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुबईला पहिली पसंती देतात. अनेक पर्यटक तर खास सोनं खरेदी करण्यासाठी म्हणूनही दुबईची ट्रिप करतात. पर्यटन हा तर त्यांचा हेतू असतोच, पण त्याचबरोबर सोन्याची आणि दागिन्यांची खरेदी असं दुहेरी उद्दिष्ट ठेवून ते दुबईला जातात. जगात सर्वांत शुद्ध आणि स्वस्त सोनं दुबईला मिळतं, भेसळ होत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत ग्राहकांची फसवणूकही होत नाही अशी दुबईची ख्याती आहे. गेल्या अनेक वर्षांत दुबईनं प्रयत्नपूर्वक आपली अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी सोन्याबाबत आपली करनीती आणि धोरणच संपूर्णत: बदलून टाकलं.
दुबई कस्टम्सच्या माहितीनुसार, २०२०च्या पहिल्या केवळ नऊ महिन्यांतच सोन्याचा इथला व्यापार तब्बल ४१ बिलियन युरो इतका होता. तेलानंतरची ही सर्वांत आकर्षक निर्यात मानली जाते. दुबईच्या अर्थव्यवस्थेत सोन्याचं योगदान ३० टक्के आहे. दरवर्षी जगातील तब्बल ४० टक्के सोन्याची वाटचाल दुबईतून होते. इथल्या प्राइम गोल्ड मार्केटमधून जगातल्या सर्व देशांशी सोन्याचा व्यापार चालतो. सातशेपेक्षा जास्त सोन्याचे व्यापारी इथे आपला व्यवसाय करतात. अमेरिका आणि हाँगकाँग हे सोन्याचा व्यापार करणारे आणखी काही प्रमुख देश. पण, या देशांपेक्षाही एकट्या दुबईचा सोन्याचा व्यापार जास्त आहे.
दुबईमध्ये सोन्याच्या अनेक रिफायनरीज आहेत. जगभरातल्या खाणींमधून आलेलं सोनं इथे शुद्ध केलं जातं. सोन्याच्या निर्यातीसाठी आपल्या भौगोलिक स्थितीचाही दुबईनं मोठ्या खुबीनं उपयोग करून घेतला आहे. पहाटे सहा वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत इथल्या गोल्ड मार्केटमधून जगभरात सोन्याचा व्यवहार सुरू असतो. आपल्या टाइम झोनचा त्यांनी मोठ्या चतुराईने उपयोग करून घेतला आहे. दुबई हे जगातील मोजक्या एक्सचेंज सेंटरपैकी एक आहे, जिथे ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतचा टाइम झोन कव्हर केला जातो. त्यामुळे जगातील सोन्याच्या ट्रेंडचा येथे दररोज मागोवा घेतला जातो.
दुबईतील सोन्याचा व्यवहार वाढवण्यासाठी तिथल्या सरकारनं पर्यटकांसाठी सोन्यावरचा करही माफ केला आहे. सोन्याच्या व्यापाराबाबतचं धोरणही उदार असल्यामुळे दुबईतील अधिकाधिक लोक कुठल्या ना कुठल्या मार्गानं सोन्याच्या व्यवहाराशी निगडित आहेत. कमीतकमी नफ्यावर आणि सचोटीनं व्यवहार होत असल्यानं इथल्या मार्केटवर जगाचा विश्वास आहे. त्यामुळे दुबईला येणारा पर्यटक सोनं घेऊन गेला नाही, असं सहसा होत नाही.
भविष्यकालीन गुंतवणूक म्हणूनही लोक इथल्या सोन्याकडे पाहतात. याच सोन्याचा आणि दागिन्यांचा उपयोग नंतर लग्नकार्यात केला जातो. त्यासाठी आधीच इथून खरेदी करून ठेवली जाते. दुबईला लोकांच्या असलेल्या पसंतीचं आणखी एक कारण म्हणजे इथली डिझाइन्स. आधुनिक डिझाइनचे नवनवीन दागिने इथे सतत तयार होत असतात. दागिन्याच्या डिझायनर्सची संख्याही इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जगातल्या त्या त्या देशांच्या चालीरिती आणि संस्कृतीप्रमाणे जवळपास सर्वच देशांत प्रचलित असणारी सोन्याची डिझाइन्स इथे मिळू शकतात.
दुबई ज्वेलरी ग्रुपचे चेअरमन आणि ‘जवाहरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तवहिद अब्दुल्ला म्हणतात, इथली सोन्याची इंडस्ट्री दिवसेंदिवस वाढतेच आहे. इथल्या घाऊक आणि किरकोळ बाजारात कुठल्याही क्षणी किमान चाळीस ते पन्नास टन सोनं उपलब्ध होऊ शकतं. जगातल्या कुठल्याही देशापेक्षा इथल्या सोन्याच्या किमतीही स्पर्धात्मक असल्यामुळे दुबईच्या सोन्याकडे अनेकांचा ओढा असतो.
अस्सल सोनं, आकर्षक दाम!
दुबई ‘गोल्ड ॲण्ड ज्वेलरी ग्रुप’चे कोषाध्यक्ष अब्दुल सलाम के. पी. यांच्या मते दुबईचं सोनं तीन कारणांनी जगात प्रसिद्ध आहे. १- जगातल्या कोणत्याही देशापेक्षा इथल्या सोन्याच्या किमती कायम दहा ते बारा टक्क्यांनी कमी असतात. २- जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातलं आणि जगातलं कोणतंही डिझाइन इथे एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. ३- सोन्याची गुणवत्ता. यासंदर्भात दुबईतले कायदे अतिशय कडक आणि कठोर आहेत. सोन्यात भेसळ करण्याची कल्पनाही त्यामुळे कोणी करू शकत नाही.