आई आणि व्यसन
By admin | Published: January 17, 2015 12:46 AM2015-01-17T00:46:35+5:302015-01-17T00:46:35+5:30
आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे,
विजयराज बोधनकर -
आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे, हे कळायला शुद्धीवर असणे गरजेचे आहे. फुकट मिळालेल्या हृदयाला जेव्हा झटका येतो, तो बरा करायला पाच-सहा लाखांचा झटका पुन्हा मिळतो. तेव्हा घर रडतं. यातून वाचावं म्हणून पूर्ण घर तणावाच्या निवडुंगावर लटकतं... तेव्हा कळते आरोग्याची किमया. शरीर हे गुणतेचे मंदिर आहे. पण व्यसनापायी त्या शरीराचे स्मशान बनविले जाते. गुणतेचा गुंता होतो आणि आत्मा अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यातून वाचला की मग तो योगा, अध्यात्म, प्राणायामाचा स्वीकार करतो.
संकटातून माणसाला शहाणपण सुचतं. याची ही प्रत्यक्ष घटना. माझ्या एका जवळच्या नातेवाइकाला गुटख्याचं प्रचंड व्यसन होतं. दिवसाला कित्येक पुड्या तो तोंडात उलट्या करायचा. खूपदा समजविण्याचा प्रयत्न केला. तर त्याचं उत्तर एकच, ‘‘आगे की आगे, एक दिन तो जानाही है!’’ असे पाच-सहा वर्ष निघून गेले. एक दिवस अचानक त्याची छाती भरून आली. हृदयाच्या तीव्र धक्क्याने साहेब कोसळले. हॉस्पिटलमध्ये •भरती केलं. पाच-सहा लाख रुपये डॉक्टरांना कमविण्याची संधी या व्यसनाने प्राप्त करून दिली. कष्टाची पुंजी एका झटक्यात गेली. घर उघड्यावर पडलं. पण हळूहळू तब्येत सुधारत गेली. आता हा नातेवाईक ‘गुटखा सोडा, आयुष्य जोडा!’ असा प्रचार करतोय. आता तो नित्यनेमाने योगा, प्राणायम करतो.. वेळेत जेवतो, झोपतो... सकाळी चालायला जातो... हेच शहाणपण त्याला अगोदरच सुचलं असतं तर? अनेकांना वाटतं जन्म-मरण हे देवाच्या हाती असतं. त्याचं बोलावणं आलं की जावं लागतं. असा विचारच मूर्खपणाचा आहे. स्वत:च्या आरोग्याचं विधिलिखित स्वत:ला लिहिता येऊ शकतं. केव्हा? जेव्हा तो अशी प्रतिज्ञा करेल की, ‘‘हे शरीर आईने दिलेली देणगी असून, या देणगीरूपी शरीराला मी व्यसनाच्या विळख्यात जाऊ न देता काळजीने त्याचे संगोपन करेन व आरोग्यदायी जगण्याचा प्रयत्न करेन!’’ अशा प्रतिज्ञेमुळे आपण सारेच आनंदी होऊन जगू.
ज्याला मनाचा गुंता, संकट येण्याअगोदरच सोडविता येतं, त्याला स्वत:चं आयुष्य सुंदरतेने विणता येतं. शरीर हेच खरं मंदिर आहे. योगा, प्राणायाम, चिंंतन, ध्यान आणि समाधान हीच मनाची खरी पूजा व आंघोळही आहे. या सर्व गोष्टींना धन लागत नसून केवळ मन लागतं. म्हणून तुकोबाराया म्हणतात,
फजितखोर मना किती तुज सांगो
नको लागो कुणा मागे मागे।