भारतीय सिनेसृष्टीची ‘मदर ऑफ डान्स’; पुढच्या जन्मी सरोज खानच व्हायला आवडेल

By अजय परचुरे | Published: July 4, 2020 05:49 AM2020-07-04T05:49:54+5:302020-07-04T05:50:35+5:30

सरोज खान यांचं खरं नाव निर्मला नागपाल. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातील पंजाबमधून सरोज यांचे कुटुंबीय थेट मुंबईला आले. वडील किशनसिंग साधू सिंग हे एकेकाळचे मोठे व्यापारी;

‘Mother of Dance’ of Indian cinema; I would like to be the next born Saroj Khan | भारतीय सिनेसृष्टीची ‘मदर ऑफ डान्स’; पुढच्या जन्मी सरोज खानच व्हायला आवडेल

भारतीय सिनेसृष्टीची ‘मदर ऑफ डान्स’; पुढच्या जन्मी सरोज खानच व्हायला आवडेल

Next

अजय परचुरे

जवळपास साठ वर्षे त्या भारतीय चित्रपटाचा चालता-बोलता इतिहास होत्या. वेगाने बदलणाऱ्या चित्रपटसृष्टीत अजूनही सरोज खान यांनी आपली ओळख टिकवून ठेवली. गेल्यावर्षी आलेल्या ‘कलंक’ चित्रपटात त्यांनी माधुरीच्या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. त्यांचा मुलगा राजू खान हाही नृत्यदिग्दर्शक आहे. त्यांनी अनेक चढ-उतार पचविले. दुसरा कोणी असता तर तेव्हाच उन्मळून पडला असता. या खडतर प्रवासाबद्दल त्यांना कोणी विचारलं तर त्या म्हणायच्या, ‘हे आयुष्य अनुभवायला मिळालं याचा मला अभिमान आहे. मला पुढच्या जन्मात पुन्हा संधी मिळाली तर पुन्हा सरोज खानच व्हायलाच आवडेल!’

सरोज खान यांचं खरं नाव निर्मला नागपाल. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातील पंजाबमधून सरोज यांचे कुटुंबीय थेट मुंबईला आले. वडील किशनसिंग साधू सिंग हे एकेकाळचे मोठे व्यापारी; पण त्यांना आपला सर्व बाडबिस्तरा पाकिस्तानात सोडून यावा लागला होता. मुंबईत त्यांच्या दोनवेळच्या जेवणाचीही भ्रांत होती म्हणून त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्या सरोजला चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करायला लावलं. त्यामुळेच अगदी चालायला लागल्यापासून ठेक्यात नृत्याविष्कार करणारी सरोजनंतर चित्रपटात चंद्रावर बसून गाणं गाताना दिसली.

त्याकाळी चित्रपटात काम करणे निषिद्ध मानलं जायचं; पण कोणाला आपली मुलगी चित्रपटात काम करते हे कळू नये म्हणून किशनसिंग यांनी निर्मलाचं नाव बदललं. मोठ्या पडद्यासाठी ती ‘बेबी सरोज’ झाली. बेबी सरोज बालकलाकाराचं काम करता-करता बॅकग्राऊंड डान्सर झाली. ‘हावडा ब्रिज’ चित्रपटात ‘आईये मेहरबान’ गाण्यात मधुबालाच्या मागे नाचणारी दहा वर्षांची बेबी सरोज ही आता सिनेसृष्टीत नावारूपाला येऊ लागली होती. पुढे हेलनने चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं त्या दिशेने सरोजचा प्रवास सुरू होता. सरोजचं नाचण्यातील कौशल्य पाहून तेव्हाचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांनी तिला असिस्टंट बनविलं. त्यांनीच सरोजला नृत्यातली बाराखडी शिकविली. कथ्थक, भरतनाट्यम् वगैरे सगळं काही तिच्याकडून अगदी घोेटून घेतलं.

एकीकडे शाळा, होमवर्क सुरू असतानाच सोहनलाल यांच्यासोबत त्यांची असिस्टंट म्हणून सरोज चांगले पैसे कमावू लागली. सोहनलाल हे तिचे गुरू होते. त्यांचं नृत्य तिला भारावून टाकत होतं. शाळकरी बेबी सरोज हळूहळू ४१ वर्षांच्या सोहनलाल यांच्या प्रेमात पडली होती. सोहनलाल यांचे यापूर्वी लग्न झालं होतं. दोन मुले होती तरी त्यांनी या १३ वर्षांच्या सरोजशी लग्न केलं; पण तिला त्यांच्या आधीच्या लग्नाबद्दल कल्पना नव्हती. पुढच्याच वर्षी तिने आपल्या पहिल्या मुलाला म्हणजेच राजूला जन्म दिला. वयाच्या १५ वर्षी ती परत गरोदर राहिली; पण यावेळी तिचं बाळ वाचलं नाही.

हे सगळं इतक्या वेगाने घडत होतं आणि सरोजचं हे पचविण्याचं वय नव्हतं. मग सोहनलाल यांच्याशी वाद सुरू झाले; पण आयुष्यात किती काहीही जरी टेन्शन असले तरी ती जेव्हा डान्स शिकविण्यासाठी सेटवर उतरायची, तेव्हा बेभान होऊन नाचायची. तिचा विजेसारखा वेग, तिची अदा पाहून स्पॉटबॉयपासून चित्रपटाची हिरॉईन दंग होऊन जायचे. पुढे दोन-तीन वर्षांतच सरोजने सोहनलाल यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांनी तिच्या मुलांना आपलं नाव देण्यास इन्कार केला होता. कशीबशी कामे मिळवून घर चालवायचा तिने प्रयत्न चालू ठेवला. अखेर सोहनलाल यांनीच तिला परत असिस्टंट म्हणून नोकरी दिली, त्यांनाही तिची गरज होतीच. त्यातूनच त्यांच्या दुसºया मुलीचा म्हणजे कुकुचा जन्म झाला; पण १९६९ मध्ये सोहनलाल यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला व मद्रासला निघून गेले. त्यांनी पुन्हा सरोजशी संपर्क केला नाही. सरोजने मात्र खंबीरपणे आपल्या मुलांना मोठं करायचं ठरविलं.

आयुष्यातील फरफट थांबली दिवस-रात्र सरोज मेहनत करू लागली. त्याकाळच्या सुपरस्टार अभिनेत्री साधना, वैजयंतीमाला, हेलन, शर्मिला टागोर, वहिदा रहेमान यांच्यासोबत तिने काम केलं. त्यांना तिचे कष्ट माहीत होते. ते साल होतं १९७४. नृत्यदिग्दर्शिका म्हणून सरोजची कारकीर्द सुरू झाली. त्याच काळात तिची ओळख एका पठाण व्यापाºयाशी झाली. सरदार रोशन खान. त्यांचंही लग्न झालेलं; पण तो सरोजच्या मुलांना आपलं नाव देण्यास तयार होता. सरोज त्याच्याशी लग्न करून सरोज खान बनली. तिच्या मुलांना राजू व कुकु यांनाही खान आडनाव मिळालं. सुभाष घईंच्या ‘हिरो’च्या यशामुळे तिला प्रथम मोठं यश अनुभवता आलं.

‘नागीन’मधील ‘मैं तेरी दुष्मन’ गाण्यामुळे सरोज खान हे नाव इंडस्ट्रीमध्ये मानाने घेतलं जाऊ लागलं; ‘तेजाब’ चित्रपटातल्या ‘एक दोन तीन’ या गाण्याच्या ‘न भूतो, न भविष्यती’ अशा सुपरहिट यशामुळे माधुरी दीक्षित तर ‘नंबर वन अभिनेत्री’ बनलीच; शिवाय सरोज खान हे नावसुद्धा त्यामुळे घराघरांत पोहोचलं. या गाण्यामुळं फक्त तिचं आणि माधुरीचं आयुष्य बदलून टाकलं असं नाही, तर चित्रपटातील कोरिओग्राफरचं महत्त्वसुद्धा वाढलं. त्यांना मानसन्मान मिळू लागला. शास्त्रशुद्ध नाच न शिकलेल्या सरोजने भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘डान्स युग’ आणलं. पुढे फराह खान, रेमो, शामक दावर, अहमद खान, वैभवी मर्चंट यांनी जे यश व ग्लॅमर अनुभवलं त्याला सरोजने केलेले कष्ट कारणीभूत आहेत. त्यांनी त्याकाळी सर्व अभिनेत्रींसोबत काम केलं. मात्र, माधुरीशी त्यांचे विशेष सूर जुळले. ‘धक-धक करने लगा’ सारखी सुपरहिट गाणी त्यांनी दिली. ‘देवदास’मधील ‘डोला रे डोला’मध्येही दोघींची जादू अनुभवायला मिळाली. त्यासाठी सरोज खान यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

(लेखक मुंबईतील सिनेपत्रकार आहेत)

Web Title: ‘Mother of Dance’ of Indian cinema; I would like to be the next born Saroj Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.