मातृदेवो भव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:25 AM2018-05-13T05:25:45+5:302018-05-13T05:25:45+5:30
विजया वाड
‘आई’ हा शब्दच आत्मा आणि ईश्वराशी नातं सांगणारा आहे. हृदयातला हळवा कोपरा आहे. मायेचा पदर आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस आईबद्दल बोलताना हळवा नि हळुवार होऊन जातो.
माझी आई माझे सर्वस्व होती. आज लोकांची आवडती लेखिका झाले, याचे श्रेय केवळ आणि केवळ आईला आहे. ती माझी बेस्ट जज्ज होती. माझे नाक नकटे, म्हणून बारा वर्षांची होते, तेव्हा आईच्या सूचनेवरून मी ते आरशात बघून ओढत असे. आईने ते पाहिले, ती म्हणाली, ‘असे ओढून ते फक्त लाल होईल बरं. मोठे नाही होणार. विजू, तुझ्याकडे काय नाही, त्याचा विचार करू नकोस. दु:खी होशील. तुझ्याकडे काय आहे, त्याचा विचार कर. सुखी होशील.’ बाराव्या वर्षी कुठे कळत होते? काय आहे माझ्याकडे? मीच म्हणाली मग... आपल्या इयत्ता सातवीतल्या मुलीला, ‘तूच म्हणतेस ना विजू? तुझे निबंध सर्व तुकड्यात वाचून दाखविले जातात म्हणून? अगं, सरस्वती तुझ्यावर प्रसन्न आहे. तू लिही. रोज लिही. भविष्यात त्याची पुस्तके होतील. त्यातून ज्या वाचकांना प्रेम, संजीवन आणि दिलासा मिळेल, त्या सर्वांसाठी तू सुंदरच असशील बरं बाळ. नेहमी लक्षात ठेव. सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबक तो.’
आणि माझ्या प्रिय वाचकांना वयाच्या चोविसाव्या वर्षी माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली. ‘वजाबाकी’ ती आईला दाखविली, तेव्हा कोण आनंदली ती! आज ती या जगात नाही, पण तिचे आशीर्वाद अक्षय्य पाठीशी आहेत. आता १२४ पुस्तके नावावर असलेली ही लेखिका केवळ आईच्या प्रोत्साहनाचे फळ आहे.
शाळेत नोकरीला लागले, तेव्हा तिचा आशीर्वाद घेऊन वाटचालीस सुरुवात केली, तर काय शुभाशीष दिले तिने? ‘आपल्या विद्यार्थ्यांची नुसती बाई होऊ नकोस, आई हो!’... प्रिय वाचकांनो, ते साधेसे शब्द मला आयुष्यभराची श्रीमंती देऊन गेले. माझे प्रियत्तम विद्यार्थी हे माझे ‘नोबेल’ प्राइझ आहेत आणि ते केवळ आईमुळे.
डॉ. अनिल काकोडकर हे अगदी मातृभक्त. वडील, मुले नि बायको यांना सोडून गेलेले. घरात अन्न मिळविण्यासाठी धडपड करावी लागत असतानाही, त्यांच्या आईने अनिलच्या वडिलांबद्दल कधीही अनुदार उद्गार काढले नाहीत. पुढे सर्वोच्च गुण मिळवून अनिल व्हीजेटीआयचे इंजिनीअर झाले. भाभा अणुशक्ती नगरात मोठ्या पदावर पोहोचले. फार मोठे शास्त्रज्ञ झाले. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले, पण वडील निवर्तल्यावर आई म्हणाली, ‘जा, त्यांचे अंत्यसंस्कार कर.’
तुझ्या वाढीत त्यांचा वाटा नसेलही, पण तू त्यांच्यामुळे या जगात आहेस, हे कधी विसरता येईल का? आणि डॉ. अनिल काकोडकर पंतप्रधान वाजपेयी यांची परवानगी घेऊन तो अंत्यसंस्कार पार पाडून पोखरणला गेले. केवढे उदारतम मन त्या आईचे! माता- पुत्र जोडीचा हा उच्चतम आदर्श आहे.
प्रवीण दवणे यांच्या लहानपणी घरची परिस्थिती बिकट होती. छोटा प्रवीण आईबरोबर एका लग्नसमारंभाला गेला. आईच्या अंगावर सुवर्णालंकार नव्हते. एक पोक्त वयाचे नातेवाईक बाई प्रवीणच्या आईला म्हणाली, ‘अशी काय आलीस उघड्या गळ्याने? एकही गळेसर नाही! मी देते घाल गळ्यात. नंतर जाताना परत दे हो अगदी आठवणीने.’ त्यावर प्रवीणचा हात घट्ट धरून ती म्हणाली, ‘मुळात मला तुमचा गळेसर नको आहे. त्यामुळे तो परत करायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि माझा सर्वात मोठा दागिना मजजवळ आहे ना! माझा प्रवीण!’ मित्रांनो, प्रवीण तेव्हा केवळ १० वर्षांचा होता, पण आईने त्याची ताकद ओळखली होती भविष्यातील! खरे ना?
अशी आई! तिला नमन करायचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस. एक नऊ वर्षांची बालिका एका फुलवाल्याजवळ शुभ्र फुलांचा एक गेंद मागत होती, पण तिच्याकडे कमी डॉलर होते. एक माणूस त्या दुकानातून मातृदिनासाठी एक गुच्छ आपल्या आईसाठी कुरियर करणार होता. त्याची आई केवळ तीस मैलांवर तर होती, पण... हा ‘पण’च मोठा वाईट असतो ना!
त्या गोड मुलीचे नि फुलवाल्याचे संभाषण त्याने ऐकले नि तिचे सर्वच पैसे त्याने दिले. ‘थँक्यू अंकल. माझी आई फार खूश होईल,’ ती छोनुकली आभार मानत म्हणाली. इतकी गोड गोडुली परी कोणत्या बरं आईने पैदा केली? त्याला उत्सुकता! तो तिज सोबत गेला. त्या परीने त्याला सिमेट्रीत नेले. आईच्या थडग्यावर फुले नि आसवे वाहिली. त्या थडग्यावर त्याचीही आसवे पडली... नि तडक निघाला... आपल्या तीस मैलांवरल्या आपल्या प्रिय आईला प्रत्यक्ष भेटायला.
प्रिय वाचकांनो, हा प्रसंग तुम्हाला सांगतानाही माझे मन भरून आले आहे. आई फोटोत जाईपर्र्यंत वाट बघू नका. तिला हवे ते खायला, प्यायला, ल्यायला तिच्या जिवंतपणी द्या. तुमच्याजवळ पूर्ण दिवसाची १,४४0 मिनिटे आहेत. त्यातील केवळ २० मिनिटे त्या थकल्या जिवाला द्या. तुमचा स्पर्श, तुमचे दोन गोड शब्द, तुमची मायेची ऊब हे तिचे जगण्याचे इंधन आहे. सुखाचे जिणे अन् सौख्यमरण तिच्या वाटेला येवो. मातृदिनी तिच्या आवडीचा खाऊ तिला खायला घाला नि सांगा, ‘तू माझे सर्वात आवडते माणूस आहेस,’ बस कराल एवढे?