मदर तेरेसांच्या महत्तेला संतपदाचे कोंदण
By admin | Published: March 20, 2016 11:39 PM2016-03-20T23:39:45+5:302016-03-20T23:39:45+5:30
आपण जेव्हा मदर तेरेसा यांच्याविषयी विचार करतो तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याला प्रिन्सेस डायनाचीही आठवण येते. खरे तर या दोघींमध्ये शारीरिकदृष्ट्या काहीच साम्य नव्हते
विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
आपण जेव्हा मदर तेरेसा यांच्याविषयी विचार करतो तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याला प्रिन्सेस डायनाचीही आठवण येते. खरे तर या दोघींमध्ये शारीरिकदृष्ट्या काहीच साम्य नव्हते. प्रिन्सेस डायना उंच, रुबाबदार आणि लोभस होत्या. मदर तेरेसा बुटक्या, पाठीत वाकलेल्या व बहुधा जन्मत:च वृद्ध असल्यासारख्या दिसायच्या. तरीही आपल्या स्मृतिपटलावर मदर तेरेसांचे प्रार्थनेसाठी जोडलेले सुरकुतले हात व प्रिन्सेस डायना यांचा हसरा चेहरा कायमचा कोरला गेला आहे. या दोघींच्या जीवनात जरी साम्य नसले तरी मरणाने मात्र त्यांच्यात एक दुवा सांधला गेला. १९९७ मध्ये एका मोटार अपघातात प्रिन्सेस डायना यांचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाले तेव्हा मदर तेरेसा म्हणाल्या होत्या, ‘गरिबांविषयी त्यांना खूप कणव होती. त्यांच्यासाठी काहीतरी करण्यास त्या नेहमीच उत्सुक असायच्या. म्हणूनच त्या मला जवळच्या आहेत.’ मदर तेरेसांची प्रिन्सेस डायनाशी ही भावनिक जवळीक एवढी घट्ट होती की बहुधा त्यामुळेच प्रिन्सेस डायना यांच्या पाठोपाठ सहा दिवसांनी मदर तेरेसाही हे जग सोडून गेल्या. या दोघींच्याही अंत्ययात्रा आज २० वर्षांनंतरही आपल्या मनात ताज्या आहेत.
मृत्यूने तर जवळीक साधलीच, पण त्याखेरीज या दोन्ही थोर महिलांनी ज्या प्रकारच्या आयुष्यांची निवड केली त्यानेही त्या एकमेकींशी जोडल्या गेल्या. प्रिन्सेस डायना राजघराण्यातील होती व मनात आणले असते तर चैन व ऐशारामाचे आयुष्य जगू शकली असती. तिने तसे केले असते तरी कोणास ते वावगेही वाटले नसते. तरीही राजघराण्याची सदस्य या नात्याने असलेल्या जबाबदाऱ्या व विवाहानंतर मिळालेला मानमरातब मागे ठेवून डायना आपल्या दातृत्वाने ज्यांना लाभ होईल अशी भयावह ठिकाणे व विपन्नावस्थेतील लोक शोधत राहिल्या. भूसुरुंग पेरलेल्या भागातही जाऊन गरजूंना मदतीचा हात देताना त्यांनी केवळ धैर्यच नव्हे तर कोमलहृदयी ममताही दाखविली. त्यांच्याप्रमाणेच मदर तेरेसा यांनीही आपले आयुष्य निवडले. त्यांनी केवळ इतरांना देण्यातच धन्यता मानली आणि हे देताना त्यांनी धर्म-पंथाचे रिंगणही आखून घेतले नाही. प्रिन्सेस डायना यांनी त्यांच्याकडे होते त्यापैकी काही इतरांना दिले, तर मदर तेरेसांनी स्वत:चा विचार न करता इतरांना सर्वस्व दिले. या दोघींनी भरभरून दिले आणि त्यांचे हे देणे त्यांना कोणी सांगितले म्हणून दिलेले नव्हते.
अर्थात मनात आणले तर तुम्हाला या दोघींमध्येही नावे ठेवायला जागा सापडू शकतील. इतरांमधील दोष पाहणे हा तर मनुष्याचा स्वभावधर्मच आहे. पण खरा मुद्दा असा आहे की, या दोघींचे काम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर त्यातील ममत्व आणि चांगुलपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. मदर तेरेसांना मरणोत्तर ‘संतपद’ बहाल केले जाण्यावरूही नाके मुरडणे हे अगदीच थिल्लरपणाचे होत नाही का? पण काही लोकांच्या सवयी जात नाहीत, हेच खरं. बरं अशा लोकांच्या या प्रयत्नांनी त्या व्यक्तीचे माहात्म्य तीळभरही कमी होत नाही. मदर तेरेसांच्या सेवेतील मानवता जाणवण्यासाठी त्यांच्याप्रमाणे आपणही ख्रिश्चन असण्याची गरज नाही. ज्यांना या पृथ्वीतलावर दुसरीकडे कुठेही जायला जागा नाही अशा सर्वांना त्यांच्या ‘मिशनरीज आॅफ चॅरिटिज’चे दरवाजे सदैव उघडे राहिले ही एकच गोष्ट मदर तेरेसांना महानतेच्या उच्चासनावर पोहोचण्यासाठी पुरेशी आहे. हे करीत असताना त्यांनी कधीही जात, धर्म अथवा भाषा याआधारे कोणताही भेदभाव केला नाही. याला संतत्व म्हणायचे नाही तर मग कशाला म्हणायचे ते परमेश्वरालाच ठाऊक! मदर तेरेसा यांनी केलेल्या या मानवतेच्या सेवेची पोचपावती म्हणून पोप त्यांना संतपद बहाल करणार आहेत. पुढारलेल्या देशात जन्माला येऊनही तेथील सुखी-संपन्न आयुष्य सोडून भारतासारख्या तृतीय विश्वातील जगात येऊन एका जोगिणीचे आयुष्य जगूनही त्याचे सोने करणाऱ्या अन्य कोणत्याही स्त्रीचे चरित्र विरळच असेल. याचाच १९८० मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन भारत सरकारनेही यथोचित गौरव केला. पण कशाहीवरून निष्कारण वाद निर्माण करणे हा जणू आपल्या रिकामपणाचा राष्ट्रीय उद्योग झाला आहे. आता ‘भारत माता की जय’ घोषणा देणे किंवा न देण्यावरून घातला जात असलेला वाद पाहा ना. ज्याचे डोके ताळ्यावर आहे असा कोणीही भारतात याला आक्षेप घेऊ शकेल का? आणि तेही राज्यघटनेचा हवाला देऊन? या वादाचा बुरखा दूर करून खोलात शिरून पाहिले तर आपल्याला दिसेल की धर्माच्या आधारावर समाजवर्गांचे ध्रुवीकरण करण्याचे ‘व्होट बँके’चे राजकारण याही मागे आहे. या लोकांना असे विचारावेसे वाटते की, मतांसाठी आपण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहोत? या मतांच्या हव्यासात आपण आपल्या प्रिय मातृभूमीसही सोडणार नाही की काय? इस्लामला लक्ष्य करून असा वाद निर्माण करणे हे तर सूतावरून स्वर्ग गाठणे आहे. ‘सारे जहाँ से अच्छा...’ अशा ओजस्वी शब्दात हिंदुस्तानचे गुणगान करणाऱ्या कवी अल्लामा इक्बाल यांनी म्हटले होते, ‘पत्थर की मूर्तियोंमे समझा हे तू खुदा है, खाके वतन का मुझको हर झरा देवता है’ (तुम्ही दगडाच्या मूर्तीला देव समजता, पण माझ्यासाठी या देशाच्या मातीचा प्रत्येक कण देव आहे.) मग, असाउद्दीन ओवेसी आणि त्यांच्या आमदारास ‘भारत माता की जय’ म्हणण्यात अडचण काय आहे? थोर इक्बाल यांच्याविषयी त्यांचे काय म्हणणे आहे? यातून आपला राजकीय फायदा होईल, असे ओवेसींना वाटत असेल. पण प्रत्यक्षात यामुळे त्यांनी इतर वादग्रस्त विषयांवरून लक्ष विचलित करण्यास भाजपा/रा. स्व. संघाला मदत केली आहे. हे सर्व कटुता वाढवणारे आहे. म्हणूनच या वादात खरी प्रगल्भता दाखविल्याबद्दल जावेद अख्तर यांचे आभार मानायला हवेत. राज्यसभेत ते म्हणाले, ‘शेरवानी आणि टोपी घाला असे ही राज्यघटना त्यांना सांगत नाही. (तरीही ते ती घालतात.)..‘भारत माता की जय’ म्हणणे हे माझे कर्तव्य आहे की नाही हे जाणून घेण्यात मला रस नाही. तो माझा हक्क आहे म्हणून मी तसे म्हणणार’.
गेल्या मंगळवारी व्हॅटिकनमधील बैठकीत संतपदासाठी ज्या पाच नावांचा विचार झाला त्यात मदर तेरेसा यांचे नाव सर्वात जास्त ‘हाय प्रोफाईल’ होते. ४ सप्टेंबरला त्यांना संतपद बहाल केले जाईल, असे जाहीर झाले आहे. यातना भोगणाऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम मदर तेरेसांच्या पश्चात सुरू ठेवणाऱ्यांसाठी हे संतपद अत्यानंदाचे आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
पूर्व विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांमधील ६,१४७ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. जे सरकारने स्वत:हून करायला हवे होते ते करण्यासाठीही न्यायालयास हस्तक्षेप करावा लागावा, हे दुर्दैवी आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांविषयी निष्ठुर आणि भेदभावपूर्ण दृष्टिकोनाबद्दलही न्यायालयाने सरकारचे कान टोचले हेही चांगलेच झाले.