वाचनीय लेख - मातृभाषा प्रथम; पण इंग्रजीला पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 06:58 AM2023-09-29T06:58:06+5:302023-09-29T06:58:36+5:30

सृजनशील लेखकांना इंग्रजीचेही वाचन पाहिजे, कारण इंग्रजी ही एक मोठी खिडकी आहे; जागतिक साहित्य जाणून घेण्याची

mother tongue first; But there is no substitute for English | वाचनीय लेख - मातृभाषा प्रथम; पण इंग्रजीला पर्याय नाही

वाचनीय लेख - मातृभाषा प्रथम; पण इंग्रजीला पर्याय नाही

googlenewsNext

मुकेश थळी, साहित्यिक, कोषकार

कोकणीत एक म्हण आहे. ‘तेंपाप्रमाणे माथ्याक कुरपणे’ म्हणजे जशी बाह्य परिस्थिती आहे, त्याप्रमाणे आपणही तडजोड करून जुळवून घेतले पाहिजे. आज इंग्रजीचे प्रस्थ इतके वाढले आहे की हे कुरपणे डोक्यावर घट्ट चढवल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी स्थिती आहे. एक तर कंपन्या, आस्थापने फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या उमेदवारांच्या शोधात असतात. पदवी हवीच पण इंग्रजी बोलण्याचे, संपर्काचे कौशल्यही हवे. त्याला पर्याय नाही.
हल्लीच एका शाळासमूहाने मुलांसाठी निबंध स्पर्धा घेतली. त्यांंचे पेपर मूल्यांकनासाठी दिले. ते वाचून मी गुण घालून दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीस निबंधांपैकी ३ मराठी आणि २ कोकणी होते. बाकी सर्व इंग्रजी. यावरून मुलांचा कल इंग्रजीकडे किती आहे, हे वास्तव मी अनुभवले. वयाला अनुसरून या मुलांची इंग्रजी भाषा बरी आहे. ती इंग्रजी वाचतात. ऐकतात. बोलतात. आपले भवितव्य त्यांना दिसते. समजते.

सृजनशील लेखकांना इंग्रजीचेही वाचन पाहिजे, कारण इंग्रजी ही एक मोठी खिडकी आहे; जागतिक साहित्य जाणून घेण्याची. इतर भारतीय भाषांंतील साहित्य हिंदी व इंग्रजीत अनुवादीत करण्याचे बहुमुल्य कार्य साहित्य अकादेमी करते. पुस्तके प्रकाशित करते. साहित्य अकादेमीच्या हिंदी व इंग्रजी भाषांंतील द्वैमासिकातून सर्व भारतीय भाषांंतील साहित्याचे अनुवाद आमच्यापर्यंत पोहोचतात. प्रथम मातृभाषा. मातृभाषेचे ज्ञान व प्रभुत्व पाहिजेच. परंतु आपल्याला जगाला जोडणारी जागतिक भाषा इंग्रजीदेखील आवश्यक आहे. शेकडो कारणे आहेत. काही अनुभव सांगतो. फारच ज्वलंत. आमची कोकणी कथा अनुवादकांची टीम जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला गेली. आठ दिवसांचा दौरा. दल सरोवरातील हाउस बोटीत आम्ही राहिलो. उणे आठ अंश सेल्सिअस तापमान होते. एके दिवशी आमचा ग्रुप श्रीनगर विद्यापीठात गेला. तिथे त्यांच्या सभागृहात कोकणी भाषा आणि साहित्य या विषयावर माझे सादरीकरण होते. सर्व विभागप्रमुख, पीएचडी विद्यार्थी, संशोधक यांच्यासमोर मी व्याख्यान दिले. बाहेर पाऊस आणि बर्फ एकत्र पडत होता. सभागृहातील सर्व खांबांवर हिटर लावण्यात आले होते. थंडीने माझे दात कडकडत होते. हुडहुडी भरत होती. दोन कोट आणि कानटोपी बांधून काही उपयोग झाला नाही. या परिस्थितीत मी माझे व्याख्यान दिले. प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. त्या हुशार मुलांनी आणि विद्वान प्राध्यापकांनी प्रश्न विचारले. त्यांना मी समर्पक उत्तरे दिली. अनेक विद्यार्थी पाकिस्तानी होते. हा संवाद फक्त इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळेच शक्य झाला.

इंग्रजी जाणण्याचे बरेच फायदे मी अनुभवले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर नेमले जातात. हुशार विद्यार्थी कठीण परीक्षा उत्तीर्ण होतात आणि बँकांमध्ये अधिकारी म्हणून भरती होतात. गोव्यातील बँकेत भरती झालेल्या या अधिकाऱ्यांना मूलभूत कोकणी ज्ञान असावे हे बँकेचे उद्दिष्ट आहे. ग्राहकाने अधिकाऱ्यांना कोकणीत प्रश्न विचारल्यास कोकणी भाषेत थोडक्यात उत्तरे कशी द्यायची याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. काही बँकांनी मला असे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले होते. तेव्हा मला चांगला अनुभव आला. युवा अधिकारी हुशार असतात आणि त्यांची आकलनशक्ती तीव्र असते. मी तुला तुझे पासबुक उद्या देईन. मला ते उद्या मिळेल का? तुला किती कर्ज घ्यावे लागेल? अशी काही वाक्ये त्यांना शिकवली. ग्राहकांशी बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढला. पण हे सर्व शिकवण्यासाठी- शिकण्यासाठी इंग्रजी हा पूल होता. मी त्यांना कोकणी शिकण्यासाठी पुस्तकांबद्दल सांगितले. जेव्हा तुम्ही इंग्रजी नीट समजून बोलता तेव्हा एक छाप कायम राहते. फक्त इंग्रजी संभाषण चातुर्य नव्हे तर भाषेतील व साहित्यातील बारकावे, उच्चार, व्याकरण, साहित्यिक सौंदर्य हे सुद्धा समजून घ्यायला हवे. हे वाचनाने साध्य होते. त्यातून आत्मविश्वास वाढतो. 

महाविद्यालयात मी गणित विषयात पदवी मिळवली. पण इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर लेखक म्हणून डोलारा डळमळीत राहणार हे उमजून मी इंग्रजीचे वाचन वाढवले. न्यायाधीश, वकील यांची काही पुस्तके इंग्रजी भाषेच्या लालित्याच्या सौंदर्याने भरलेली आहेत. ती वाचली. इंग्रजी भाषेतही शब्दसंपदा अफाट आहे. साहित्य अफाट. वाचकच पाहिजे. वाचनानंद विरळा. प्रादेशिक भाषेतील लेखक आपला वाचकवर्ग मर्यादीत आहे या चिंतेत असतो. त्याचा आवाज इतर भाषेत जाण्यासाठी इंग्रजी हा अनुवादाचा एकमेव पूल आहे. १९९२ साली मी इंग्रजी दैनिकासाठी कोकणी कथांचे अनुवाद केले. गोव्यातील हजारो लोकांपर्यंत कोकणी साहित्यिक काय लिहितात, हा संदेश गेला. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. कालांतराने फ्रंटलाइन, साहित्य अकादेमीचं इंडियन लिटरेचर मासिक व इतर नियतकालिकांंत कोकणी कथांचे इंग्रजीत केलेले माझे अनुवाद झळकले. तात्पर्य : इंग्रजीविना भाषेची, साहित्याची सेवा करणे शक्य नव्हते.     

विदेशात इंग्रजीच मदतीला आली. एखादी व्यक्ती फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, जर्मन किंवा इतर भाषा बोलत असली तरी किमान १०० वाक्ये इंग्रजीत बोलू शकते. अशा वेळी आपण सुखरूप असतो. भामट्यांच्या या जगात जितके चांगले इंग्रजी समजाल, तितके सुरक्षित राहाल. इंग्रजी ही ज्ञानभाषा, व्यवहार आणि व्यापाराची भाषा आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर विज्ञान इंग्रजीत शिकवले जाते. आयएएस, आयपीएस, आयएफएस व इतर सरकारी सेवांसाठी युपीएससी म्हणजे संघ लोक सेवा आयोगाद्वारे दरवर्षी परीक्षा घेतली जाते. प्राथमिक म्हणजे प्रिलीमिनरी परीक्षा झाल्यावर लेखी मेन्स परीक्षा होते. त्यात इंग्रजी सक्तीचा पेपर असतो. गुण ३००., वेळ- तीन तास. पात्रता ठरवण्यासाठी या गुणांचीही बेरीज केली जाते. इंग्रजी किती महत्त्वाची आहे, हे यावरून समजते.

Web Title: mother tongue first; But there is no substitute for English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.