मातृभूमी
By Admin | Published: July 2, 2016 05:43 AM2016-07-02T05:43:14+5:302016-07-02T05:43:14+5:30
मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे.
मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे. आपला देश, तेथील संस्कृती, वेशभूषा, भाषा, परंपरा याची ओढ, याचा अभिमान रामायणापासून तर सावरकर साहित्यापर्यंत अक्षुण्णपणे व्यक्त होत आला आहे. अठ्ठावीस युरोपियन देशांच्या युनियनशी नाते तोडण्याचा जो निर्णय ब्रिटनने घेतला त्यामागे हे एक कारण असू शकते. मातृभूमीच्या प्रेमाची भावना तेथे प्रबळ झाली असावी. आज विज्ञान-तंत्र-यंत्र युगात जे सर्व विशेषांचे सपाटीकरण होते आहे त्याच्यापेक्षा ह्या घडामोडी वेगळ्या आहेत.
भूमाता, मातृभूमी, ‘मदर अर्थ’ ही माणसाला प्राणाहून प्रिय असते. ‘भूमि: पुत्रोहं पृथिव्य:’ भूमी ही माझी माता आहे आणि मी पृथ्वीचा पुत्र, पृथ्वीचा अंश आहे असे ऋग्वेद सांगतो. या भूमातेशी आतड्याचे नाते असल्याने शेतीसाठी जमीन खोदणे, नांगरणे म्हणजे तिला जखमी करणे असे अनेक आदीम जाती मानतात.
जॉन स्टाइनबेकच्या ‘दि ग्रेप्स आॅफ रॅथ’मध्ये ओक्लेहोमाचे रहिवासी आजोबा, वडील आणि नातू जगण्याच्या शोधात दुसरीकडे जायला निघतात. पण ‘हा प्रदेश कसाही असला तरी तो माझा प्रदेश आहे’ ही भावना त्यांच्या मनातून कधीही जात नाही. जी.ए. कुळकर्णींच्या ‘ठिपका’ कथेतील धनगर कुटुंबातला रामण्णाही असाच आहे. दुष्काळाने उद्ध्वस्त, उजाड झालेला तो प्रदेश सोडून सारे जातात. मात्र रामण्णा दुसरीकडे रुजायला जाण्याचे साफ नाकारतो. पर्ल बकच्या ‘गुड अर्थ’ मधील वँग लुंगची कथा अशीच मनाच्या घालमेलीची आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘काळी आई’ कथेतील अप्पा याला अपवाद नाहीत.
हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राने वलयांकित, आसेतू हिमाचल आणि जगन्नाथपुरी ते द्वारका असणारी सुजला, सुफला असणारी आमची मातृभू श्यामल शेतजमिनीतून सोने निपजवते. गंगा-यमुना ते तापी-भीमा नद्यांच्या तीरावर या समृद्ध संस्कृतीचे जतन-वर्धन झाले. परकी आक्रमणांना, परकी साम्राज्याला परतवून लावण्यासाठी किती देशभक्त हसत फासावर चढले. ‘तुजसाठी मरण ते जनन’ या उदात्त विचाराने एका पिढीचे जीवन उजळून निघाले होते.
मातृभूमीविषयीचा हा अभिमान कवी सुरेश भट यांनी फार वेगळ्या संदर्भात व्यक्त केला. हे मायभू! तुझे मी पांग फेडीन. मात्र माझी व्यक्तिगत व्यथा सांगून मी कधीही केविलवाणेपणा स्वीकारणार नाही. आज मातृभूमीसाठी स्वत:चे कर्तव्य चोखपणे पार पाडणाऱ्या व्यक्तींची देशाला गरज आहे. धनदौलतीच्या हव्यासाने परदेशात धाव घेणाऱ्यांपेक्षा देशात राहून स्वाभिमानाने श्रम करणाऱ्यांची गरज आहे. संवेदनशीलतेने मातृभूमीवर प्रेम करणाऱ्यांची राष्ट्राला आस आहे.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे