मातृत्वाचे आऊटसोर्सिंग!

By Admin | Published: July 3, 2016 02:49 AM2016-07-03T02:49:50+5:302016-07-03T02:49:50+5:30

शाहरूख खान, तुषार कपूर यासारखे लोकप्रिय अभिनेते ‘सरोगेट फादर’ होतात तेव्हा त्यांना त्यांच्या चाहत्यांची वाहवा मिळत असेलही, परंतु यानिमित्ताने भारतासारख्या विकसनशील

Mothers Outsourcing! | मातृत्वाचे आऊटसोर्सिंग!

मातृत्वाचे आऊटसोर्सिंग!

googlenewsNext

- डॉ. सुजाता गोखले

शाहरूख खान, तुषार कपूर यासारखे लोकप्रिय अभिनेते ‘सरोगेट फादर’ होतात तेव्हा त्यांना त्यांच्या चाहत्यांची वाहवा मिळत असेलही, परंतु यानिमित्ताने भारतासारख्या विकसनशील व प्रचंड लोकसंख्येच्या देशात ‘सरोगसी’ किंवा ‘भाडोत्री मातृत्व’ या मुद्द्यांची समाजशास्त्रीय विचार करण्याची आवश्यकता भासते आहे.

‘सरोगसी’ हा सहज पैसा मिळवून देणारा मार्ग असल्याने भविष्यात सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या स्त्रियाही झटपट पैसा मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबू शकतात.

‘सरोगसी’ स्वीकारणारी स्त्री आणि तिचे कुटुंब, जन्माला घातलेले मूल ज्याचे त्याला दिले असे सांगण्यापेक्षा बालकाचा मृत्यू झाला असेच सांगणे पसंत करतात. भाडोत्री मातेच्या मानसिकतेबरोबरच जन्माला येणारे अपत्य कितीही सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबात जन्माला आलेले असले तरीही स्वत:च्या जन्माचे रहस्य, मूळ मातेविषयीचे कुतूहल यातून अनेक कौटुंबिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांची निर्मिती होते.

सरोगसीचे दोन प्रकार
‘सरोगसी’ या संकल्पनेचा विचार करता ही एक अशी प्रक्रिया किंवा करार असून तो अपत्य उत्सुक मातापिता आणि गर्भ पोटात वाढविण्यास तयार असणारी स्त्री यांच्यामध्ये झालेला असतो. याचे विशेषत: ‘संपूर्ण सरोगसी’ आणि पारंपारिक सरोगसी असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात मूल हे भाडोत्री मातेशी जॅनेटिकली संबंधित असते. संपूर्ण सरोगसी हा प्रकार पारंपरिक सरोगसीच्या तुलनेने युनायटेड स्टेटसमध्ये अधिक प्रचलित आहे. संपूर्ण सरोगसी हा प्रकार प्रथम एप्रिल 1986 मध्ये प्रथम उपयोगात आणला गेला.

औद्योगिकीकरणाने झालेले आधुनिकीकरण मागे सारून, जागतिकीकरण, उच्च तंत्रज्ञानाचा भारतीय समाजावरील प्रभाव वाढत चालला आणि आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय बदल घडून आले. औद्योगिकीकरणाने कुटुंबासारख्या मूलभूत संस्थेवर दीर्घ परिणाम केले. संयुक्त कुटुंबाचे विघटन होऊन विभक्त आणि आकाराने कमी असलेली कुटुंबे अधिक प्रमाणात निर्माण झाली. याचबरोबर त्याची कार्ये आणि नाती यामध्येही आमूलाग्र बदल झाला. पण जागतिकीकरणाने तर ‘कुटुंब’ ज्या मातृत्वातून
आकार घेते त्या संकल्पनेतदेखील परिवर्तन घडवून आणले, अर्थात ‘सरोगसी’ हा याच परिवर्तनाचा एक भाग आहे.
अर्थातच ‘सरोगसी’ किंवा भाडोत्री मातृत्व हे काही वेळा पैशाच्या रूपात मोबदला घेऊन तर काही वेळा मोबदला न घेताही स्वीकारलेले दिसून येते. खरे पाहता, मानवी शरीरातील अवयव भाड्याने देणे किंवा विकणे ही गोष्ट मानवतेच्या विरुद्ध आहे. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता भारत हे तर सरोगसीसाठीचे मोठे मार्केटच ठरू शकेल. कारण भारतातील स्त्रियांची जननक्षमता कमीत कमी तीन अपत्ये अशी असल्याने आणि लोकसंख्या १,२४१,४९१,९६0 इतकी प्रचंड असल्याने भारतासारख्या देशात सरोगसीच्या प्रचाराची आणि प्रसाराची आवश्यकताच उरत नाही. भारतातील वंध्यत्वाची कारणे जैविक नसून आरोग्य सुविधांचा अभाव हे मुख्यत्वेकरून कारण आहे.
भारतामध्ये ‘सरोगसी’ पद्धतीला विरोध असण्याची अनेक कारणे आहेत. ‘सरोगसी’मुळे स्त्रियांना स्वातंत्र्य उपभोगता येईल आणि लिंगभाव समानतेला उत्तेजन मिळेल असे स्त्रीवादी विचारवंतांचे मत असले तरीही भारतीय समाजात मुळातच दुय्यम असणारा स्त्रीचा दर्जा अधिकच खालावेल ही शक्यता नाकारता येत नाही. नवीन प्रजनन पद्धतींमुळे समाजाला अशक्य वाटणारी गोष्ट आता शक्य झाली आहे. परंतु सरोगसीच्या व्यापारीकरणामुळे काही सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होत असली तरी कित्येक नवीन समस्या निर्माण होऊ शकतात.
काही वेळा आर्थिक लाभासाठी कुटुंबाकडून स्त्रीवर दबाव आणला जाऊ शकतो. यासाठी गर्भाशय भाड्याने देणाऱ्या स्त्रिया या विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल निरक्षर अशाच असू शकतात त्यामुळे अपत्य इच्छुक माता-पित्याकडून अशा स्त्रियांचे आर्थिक शोषण अत्यंत सहजपणे होऊ शकते. कुटुंबाची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी स्त्रीने हा मार्ग अवलंबिलेला असला तरी समाजाकडून या निर्णयाचे तितकेसे स्वागत होत नाही. एकंदरीत पाहता वंध्यत्वावरील एक अतिशय प्रभावी उपाय, अपत्यहीन मातापित्यांच्या जीवनात फुलणारा आनंद या जरी जमेच्या बाजू असल्या तरीही ‘सरोगसी’ हा सहज पैसा मिळवून देणारा मार्ग असल्याने भविष्यात सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या स्त्रियाही झटपट पैसा मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबू शकतात. पण ही पद्धती कितीही अल्पश्रमी आणि विपुल पैसा मिळवून देणारी असली तरीही व्यावसायिक सरोगसीला कधीही कायद्याची मान्यता मिळू नये अन्यथा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मातांचा वापर करून बालक निर्मितीचे कारखाने निर्माण होणे ही गोष्ट अशक्य नाही.

(लेखिका मुंबईच्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात समाजशास्त्र विभागप्रमुख आहेत)

Web Title: Mothers Outsourcing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.