ममतांचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:26 AM2017-08-19T00:26:58+5:302017-08-19T00:27:00+5:30
पश्चिम बंगाल राज्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत त्याचे प्रतिबिंब उमटत राहते.
पश्चिम बंगाल राज्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत त्याचे प्रतिबिंब उमटत राहते. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे स्वातंत्र्य लढ्यातही बंगालने वेगळा ठसा उमटवला होता. आतासुद्धा बंगालचे राजकारण वेगळ्याच वाटेने चालत आहे. गेली चार दशके या राज्याने डाव्या पक्षांच्या आघाडीला सत्तेवर बसविले होते. या राज्यातून काँग्रेस पक्ष १९७७ पासून ४० वर्षे सत्तेपासून दूर आहे. आता याच पक्षातून तयार झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. २०११ मध्ये २९४ सदस्यीय विधानसभेत १७६ जागा जिंकून ३४ वर्षांची डाव्या आघाडीची भक्कम ताकद भेदली होती. जे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला जमले नव्हते ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने केले होते. गतवर्षी (२०१६) या पक्षाने परत एकदा २११ जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला लढत देणारी कोणतीही शक्ती नसल्याचेच स्पष्ट केले होते. चार दिवसांपूर्वी राज्यातील सात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये १४८ प्रभाग होते. त्यापैकी तब्बल १४० प्रभाग एकट्या तृणमूल काँग्रेसने जिंकत पश्चिम बंगालमध्ये त्याला शह देणारी दुसरी शक्तीच नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. भाजपला सहा प्रभागात, डाव्या आघाडीला आणि अपक्षाला केवळ एका प्रभागात यश मिळाले. पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी डावी आघाडी विरुद्ध काँग्रेस असा सामना होत होता. त्या डाव्या आघाडीच्या प्रभावाला काँग्रेस पक्षाने यशस्वी टक्कर कधी दिलीच नाही. डाव्या आघाडीला तृणमूल काँग्रेसने आव्हान दिले. डाव्या आघाडीची मुख्य विरोधी पक्षाची भूमिकाही संपते आणि भारतीय जनता पक्ष या राज्याला एक स्पर्धक ठरू शकतो का? असे वातावरण तयार होते आहे ! भाजपला या मोठ्या राज्यात शिरकाव करायचा आहे. डाव्या आघाडीला पुन्हा उभारी मिळेल, असे वातावरण नाही. काँग्रेसचीसुद्धा हीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत भाजपने जोर लावायचा असे ठरविले आहे, पण सध्या तरी तृणमूल काँग्रेसचा दबदबा कमी होताना दिसत नाही.