मोर्णा की बात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:50 AM2018-01-31T00:50:08+5:302018-01-31T00:50:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे. त्यामुळेच नद्यांना जीवनदायिनी म्हणून संबोधले जाते. भारतीय संस्कृतीत तर नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे; पण दुर्दैवाने तो केवळ संबोधनापुरताच उरला आहे. प्रत्यक्षात आम्ही नद्यांची एवढी अवहेलना केली आहे, की त्यांना अक्षरश: गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे गंगेसारख्या नदीची आम्ही पुरती वासलात लावली आहे, तिथे मोर्णेचा काय पाड? काही वर्षांपूर्वीपर्यंत मोर्णा बारमाही होती. तत्कालीन ब्रिटिश अधिकाºयांनी अकोल्यात मोर्णेवर बंधारा बांधून जलतरण आणि नौकानयनाची सुविधा करून घेतली होती. याचा अर्थ त्या काळी मोर्णा नक्कीच एवढी स्वच्छ होती, की ती ब्रिटिशांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण बनली होती. त्याच मोर्णेच्या काठी आज नाकाला रुमाल लावल्याशिवाय उभे राहता येत नाही, एवढी ती घाणेरडी झाली आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने आता लोकसहभागातून मोर्णेच्या स्वच्छतेसाठी अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात नदीत बोकाळलेली जलकुंभी हटविण्याचे काम सुरू आहे. पुढे नदीत वाहत येणाºया शहरातील गटारांना प्रतिबंध घालून, दोन्ही तिरांचे सौंदर्यीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मनोदय निश्चितपणे चांगला आहे; पण तो शेवटावर जाणार का, हा खरा प्रश्न आहे. आम्ही भारतीय आरंभशूर आहोत. कोणत्याही कामास हिरीरीने प्रारंभ करायचा आणि ते शेवटास मात्र न्यायचे नाही, हे आमचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मोर्णा स्वच्छता अभियानाचे तसे होऊ नये, ही प्रत्येक जागरूक अकोलेकराची इच्छा आहे. वस्तुत: शहराच्या मधोमध वाहणारी नदी ही शहराचे वैभव असते. युरोपातील कोणत्याही शहरातून वाहणाºया नदीकडे बघितल्यास त्याची प्रचिती येते; पण त्यासाठी नदीला नदीच ठेवावे लागते, तिचे गटार होऊ देऊन चालत नाही. दुर्दैवाने आमच्या दृष्टीने शहरातून वाहणारी नदी ही घाण, कचरा वाहून नेण्यासाठी निसर्गाने बहाल केलेली सोय आहे. जोपर्यंत ही मानसिकता बदलण्यात यश येणार नाही, तोपर्यंत कितीही स्वच्छता अभियाने राबविली तरी नद्या स्वच्छ होऊ शकणार नाहीत. जर नद्यांमध्ये गटारे सोडून देणे आणि कचरा टाकणे बंद केले, तर कोणतीही नदी तिच्या स्वच्छतेची काळजी स्वत:च घेते. प्रत्येक नागरिकाने हे ध्यानी घेतले, तर नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांची गरजच भासणार नाही.