माणसाच्या श्वासासाठीची चळवळ

By गजानन दिवाण | Published: February 13, 2020 05:03 AM2020-02-13T05:03:02+5:302020-02-13T08:12:13+5:30

जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली.

Movement for a man's breath | माणसाच्या श्वासासाठीची चळवळ

माणसाच्या श्वासासाठीची चळवळ

Next

झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, हे प्राथमिक धडे सर्वांनीच गिरवले. जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली. रुग्णालयात आॅक्सिजन लावल्यानंतर क्षणाक्षणाला वाढणारे बिल प्रत्येकाला माहीत असले तरी ‘ऑक्सिजन’ची खरी किंमत आम्ही ओळखलेलीच नाही. तसे नसते तर खुलेआम झाडांची कत्तल केली गेली नसती. यावर बोलण्याचीही सोय नाही. विकास हवा की पर्यावरण म्हणत हे विकासवादी पर्यावरणवाद्यांची तोंडे बंद करण्यासाठी सरसावतात. एकीकडे ३३ हजार कोटी झाडे लावण्याचा इव्हेंट साजरा करायचा आणि त्याच वेळी रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी पूर्णवाढ झालेली हजारो झाडे तोडायची, हा कुठला न्याय? अशा इव्हेंटप्रिय जगात मराठवाड्यासारख्या कायम दुष्काळ सहन करणाऱ्या भागात आशेचा एक किरण दिसत आहे. सह्याद्री देवराईचे निर्माते अभिनेते सयाजी शिंदे १३ आणि १४ फेब्रुवारी असे दोन दिवस वृक्षसंवर्धनाचा जागर करणार आहेत.


वृक्षसंवर्धनाचा जागर करण्यासाठी राज्यात मराठवाड्यासारखे दुसरे ठिकाण नसावे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका याच परिसराने सहन केला. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला आहे. म्हणूनच सयाजी शिंदे यांनी बीडजवळील पालवनच्या उजाड माळरानावर हे वृक्षसंमेलन आयोजित केले आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली पालवन येथे अगदी बोडका असलेला डोंगर सयाजी शिंदे यांनी निवडला. प्रारंभी ३५ एकरांवरच वृक्ष लागवड केली. आज २०७ एकरांवर एक लाख ६७ हजार झाडे लावली असून अगदी बोडका असलेला हा डोंगर आता हिरवा शालू नेसून नटला आहे. बोडक्या डोंगराचे नटलेले हे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी सयाजी शिंदे यांनी बीडजवळील याच डोंगरावर हे वृक्षसंमेलन आयोजित केले आहे. ‘३३ कोटी’ वृक्षारोपणाच्या इव्हेंटनंतर असे ठिकठिकाणी जंगल दाखवता आले तर त्याचे यश समजू शकले असते; पण मागच्याच वर्षीच्या खड्ड्यात पुन्हा-पुन्हा झाड लावले तर केवळ कागदांवरील झाडांची संख्या वाढते. म्हणूनच सयाजी यांनी केलेले हे काम वृक्षारोपणाचे इव्हेंट करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.


भारतीय वनांची सद्य:स्थिती दर्शविणारा ‘इंडियाज स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ अलीकडेच समोर आला. त्यात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानाहून ११व्या स्थानावर फेकले गेले आहे. २०१७च्या अहवालानुसार राज्यात ८,७३६ चौ.कि.मी. घनदाट २०,६५२ चौ.कि.मी. मध्यम दाट व २१,२९१ चौ.कि.मी. विरळ जंगल होते. या तिन्ही प्रकारांत आता घट झाली. राज्यात केवळ विरळ जंगल वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये जे ‘अत्यंत घनदाट’ व ‘सर्वसाधारण दाट’ जंगल ७ डोंगराळ जिल्हे व १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आहे. या आदिवासी जिल्ह्यांमध्येच घनदाट, मध्यम दाट व विरळ या तिन्ही जंगल प्रकारात घट नोंदविण्यात आली आहे. मग राज्यात २०१९ साली ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. ही झाडे गेली कुठे? यातली किती झाडे जगली? राज्य शासनाच्या वृक्षलागवडीच्या या इव्हेंटवर सयाजी यांनी टीका करताच मोठा गोंधळ उडाला. एका खड्ड्यात किती झाडे लावणार, हा त्यांचा सवाल चर्चेत खूप राहिला. तो गांभीर्याने कोणीच घेतला नाही. आम्हाला वृक्षारोपण करण्याची मोठी हौस जडली आहे. वेगवेगळ्या निमित्ताने ही हौस आम्ही भागवतो आणि सोशल मीडियातून व्हायरल करतो. लावलेली ही झाडे जगवायची कोणी? वृक्षारोपण महत्त्वाचे आहेच, त्याचे संवर्धनही तेवढेच महत्त्वाचे आहे.


जगाची लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. एवढ्या संख्येने असलेल्या लोकांचे पोट भरण्यासाठी आम्ही निसर्ग अक्षरश: ओरबाडून खात आहोत. परिणामी, हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात झालेल्या वाढीपैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डायआॅक्साइडमुळे झाली आहे. अधिकाधिक वाहनांचा आणि विजेचा वापर हे यामागचे मूळ कारण. यातून कार्बन डायआॅक्साईडची निर्मिती करीत आम्ही तापमानवाढीला हातभार लावत असतो. ही तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. वृक्षलागवडीचे इव्हेंट वाढले असले तरी गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली, हे भयंकर वास्तव नाकारून कसे चालेल?


भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरित झालेल्या वनजमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत. हा देशाचा विकास समजायचा, की पर्यावरणाचा ºहास? अशा चिंताजनक स्थितीतून आम्ही जात असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेले हे काम असामान्य आहे. हा सयाजी यांचा पडद्यावरचा अभिनय नाही. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी अभिनेत्याने हाती घेतलेली ही श्वासासाठीची लढाई आहे. या लढाईत त्यांना साथ कोण देणार?

- गजानन दिवाण उपवृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद

Web Title: Movement for a man's breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.