सिनेमे आणि वेबसिरीज? - त्यापेक्षा खेळ अधिक रोमहर्षक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 08:29 AM2024-09-02T08:29:47+5:302024-09-02T08:30:09+5:30

Sports: काळ वेगाने बदलतो आहे. देशाची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून खेळ पुढे येऊ शकतात. जागतिक मनोरंजनाच्या क्षेत्रात सिनेमा, वेबसिरीजना त्यातून स्पर्धा निर्माण होईल.

Movies and webseries? - The game is more exciting than that! | सिनेमे आणि वेबसिरीज? - त्यापेक्षा खेळ अधिक रोमहर्षक!

सिनेमे आणि वेबसिरीज? - त्यापेक्षा खेळ अधिक रोमहर्षक!

- साधना शंकर
(केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी)

ऑलिम्पिकचे गाजावाजा करत सूप वाजले. भारतात अनेक माध्यमांनी ऑलिम्पिकच्या मैदानावरचे रोमांचक  खेळ दाखवले. जगभरातील लोकांनी ते पाहिले. मात्र खेळाचा जागतिक प्रेक्षक हा एक नव्याने उदयाला येत असलेला वर्ग आहे. आजवर खेळ हा स्थानिक मानला जाणारा विषय होता. भारताच्या क्रिकेट प्रीमिअर लीगचे प्रसारणाचे हक्क खूपच मोठ्या रकमेला विकले जातात; परंतु त्याचा ९६ टक्के पैसा यजमान देशामधूनच येत असतो. त्याचप्रमाणे अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग सामन्यांच्या प्रसारण हक्कापोटीचे ९८ टक्के पैसे देशातच कमावते. मात्र अलीकडे सिनेमा किंवा करमणुकीच्या कार्यक्रमांप्रमाणे खेळसुद्धा जागतिक पटलावर आले आहेत.

हॉलिवुड तसेच बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांनी  स्वदेशापेक्षा परदेशातील मनोरंजनाच्या बाजारपेठेतच जास्त पैसे कमावून दिल्याची उदाहरणे गेली काही वर्षे आपण पाहत आलो. करमणूक करणाऱ्यांनीही जगभर जाऊन आपली कला सादर करत पैसा मिळवला. अमेरिकेतील ख्यातनाम पॉप गायिका टेलर स्विफ्टच्या दौऱ्यांचे उदाहरण यासंदर्भात घेता येईल. तिने जगभरात जिथे-जिथे जाऊन आपले कार्यक्रम सादर केले, त्या त्या देशांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली. दुसरीकडे काही खेळ मात्र स्थानिक पातळीवर राहिले. लोक आपापले संघ आणि खेळाशी बांधिल राहिले. त्यामुळे आपोआपच खेळही स्थानिक राहिले. पश्चिम बंगालमध्ये फुटबॉलचे उदाहरण घ्या. उर्वरित देश मात्र क्रिकेटभोवती गोंडा घोळताना दिसतो.

आता मात्र खेळाच्या प्रसारणाच्या बाबतीत तंत्रज्ञानाने क्रांती केली असून, सर्व प्रकारचे साखळी सामने आणि खेळ जागतिक होऊ लागले आहेत. आजवर स्थानिक पातळीवर खेळले जाणारे खेळ (उदाहरणार्थ कबड्डी, खो-खो) आता पुढे गेले आहेत. २०१९ मध्ये इंडियन रेसिंग लीग सुरू झाली. या स्वरूपाच्या खेळांना जागतिक पातळीवर जाण्याची मोठी संधी तयार झाली आहे. माध्यम कंपनीच्या सहकार्याने खेळ लक्षावधी रुपये मिळवून देऊ शकतात, कारण ते जागतिक प्रेक्षकांपर्यंत जातात.

पूर्वी टीव्ही वाहिन्यांवर खेळांचे प्रक्षेपण व्हायचे. आता विविध प्रसारमाध्यमांवर होते. त्यामुळे मोठा बदल झाला आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, ॲपल, जिओ सिनेमा यांनी खेळाचे प्रसारण सुरू केल्याने जगभरातील प्रेक्षकांना त्यांच्या देशाबाहेर खेळल्या जाणाऱ्या खेळातही रुची उत्पन्न होऊ लागली आहे. क्रीडाप्रेमींना आता ऑलिम्पिक किंवा इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील वेगवेगळ्या खेळांचा आनंद लुटण्यासाठी वाट पाहावी लागत नाही.

प्रेक्षकही बदलतो आहे. त्यामुळे खेळाडूंचे व्यक्तिगत चाहते तयार होताना दिसतात. यापूर्वी हा मान  चित्रपट तारे-तारका, करमणूक करणाऱ्यांच्याच ताब्यात होता. आता मात्र एका विशिष्ट संघाचे चाहते होण्यापेक्षा लोक व्यक्तिगत पातळीवर खेळाडूंचे चाहते होणे पसंत करतात. त्यांची वाहवा करतात. लिओनेल मेस्सी हा फुटबॉलपटू याबाबतीतले सर्वोत्तम उदाहरण ठरेल.

त्याचप्रमाणे अलीकडेच आपल्या अशक्य साधेपणामुळे ऑलिम्पिकमध्ये गाजलेला तुर्की नेमबाज युसूफ डिकेक याचेही उदाहरण घेता येईल. आपल्या आवडत्या खेळाडूंचे खेळ पाहणे चाहते पसंत करतात.

सिनेमा आणि करमणुकीच्या इतर प्रकारांप्रमाणेच जागतिक खेळामुळे स्थानिक खेळाचा गळा घोटला जातो आहे, अशी टीकाही होऊ शकते. पण जागतिक खेळामुळे ज्या खेळांना पारंपरिक वाहिन्यांवर स्थान मिळत नाही, त्यांनाही प्रकाशात आणले जाते. महिलांचे खेळ हे अशा प्रकारचे उदाहरण होईल. भारतीय क्रिकेटची वुमेन्स प्रीमिअर लीग २०२४ जियो सिनेमावर दाखवली गेल्यामुळे तिला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला. वस्तुत: ईएसपीएनवर महिलांच्या खेळाला जास्त प्राधान्य मिळत असते.

आता खेळ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून दाखवले जाऊ लागल्याने कबड्डीसारख्या खेळाचे फॅन क्लब मेक्सिकोमध्येही तयार झाले आहेत आणि भारतातल्या कानपूरमध्ये रग्बीचे चाहते तयार झाले आहेत, अशी स्थिती येणे फार दूर नाही. देशाची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून खेळ पुढे येऊ शकतात. सिनेमा आणि वेबसिरीजना त्यातून स्पर्धा निर्माण होईल.     (लेखातील मते व्यक्तिगत)
    sadhna99@hotmail.com

Web Title: Movies and webseries? - The game is more exciting than that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.