चलती रहे जिंदगी

By admin | Published: December 22, 2016 11:41 PM2016-12-22T23:41:02+5:302016-12-22T23:41:02+5:30

आपल्याशिवाय हे जग चालू शकत नाही, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एक मौलिक सल्ला - बाबांनो, तुमचे या जगातील स्थान अडगळीपेक्षा

Moving life | चलती रहे जिंदगी

चलती रहे जिंदगी

Next

आपल्याशिवाय हे जग चालू शकत नाही, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एक मौलिक सल्ला - बाबांनो, तुमचे या जगातील स्थान अडगळीपेक्षा अधिक नाही हे लक्षात घ्या. पूर्वी अडगळीचे सामान ठेवायला एक खोली असायची. आता जागेच्या टंचाईमुळे तीसुद्धा राहिलेली नाही. तुम्ही जर अती करायला लागलात तर एक दिवस लोक तुम्हाला उचलून डायरेक्ट कचऱ्याच्या ट्रकमध्ये भरतील आणि तेथून एखाद्या बेवारस डम्पिंग ग्राउण्डमध्ये नेऊन फेकून देतील. त्यापेक्षा सावध व्हा. आपल्याविना हे जग चालू शकत नाही या भ्रमातून बाहेर पडा. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याचे धंदे बंद करा. पुढे पुढे करण्याचे थांबवा.
आपल्या मार्गदर्शनाची लोकाना गरज आहे या गैरसमजातून बाहेर या. जगाची काळजी करत बसू नका. कुणाचा न्याय करण्याच्या फंदात पडू नका. कुणाला सुधारण्याच्या किंवा शहाणे करण्याच्या मागे लागू नका. एखाद्याने हाक मारली तर तिला जरूर प्रतिसाद द्या पण दुसऱ्याच्या पाटावर बसण्याची किंवा त्याच्या ताटावर टिपणी करण्याची उठाठेव करू नका. जगाची काळजी वाहण्यासाठी तो जगन्नियंता समर्थ आहे, ते त्याचे पहिले कर्तव्य आहे आणि ते त्याच्यावरच सोपवण्यात माणसाचा खरा शहाणपणा आहे.
मात्र एवढा धडधडीत वेदांत समोर असतानाही माणूस त्यापासून काहीही धडा घेत नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो नाना प्रकारच्या उठाठेवी करत बसतो. प्रत्येक बारीक सारीक घटना- प्रसंगावर आपले मत व्यक्त करीत असतो. त्याशिवाय त्या घटनेला पूर्णत्व येऊ शकत नाही असे त्याला वाटते. आपल्याशिवाय गोष्टी सरळ आणि सुरळीत पार पडणार नाहीत अशी जणू त्याला खात्रीच असते. दुसऱ्याला त्याच्या मार्गाने जाऊ देण्याने आपल्या स्वयंभूपणाला कुठेच धक्का लागत नाही हे त्याच्या कधी लक्षात येत नाही. सरळ वाटेपेक्षा वळणदार वाट उलट अधिक सुंदर दिसते, मग वाकड्या वाटा सरळ करण्याचा वेडेपणा कशाला करत बसायचा?
पृथ्वीचा आससुद्धा साडेसत्तावीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीचे काही बिघडते का? काहीच नाही. उलट त्या वाकडेपणामुळे दिवस रात्री होतात. ऋतुंचा सोहळा माणसाला अनुभवायला मिळतो. तेव्हा, डोन्ट वरी, बी हॅपी अ‍ॅण्ड लेट अदर्स आॅल्सो बी हॅपी. जगाची काळजी वाहण्यासाठी तो जगन्नियंता समर्थ आहे. ते काम त्याच्यावर सोपवा व या साक्षात्कारासह आजचा जो दिवस पदरात पडलाय त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करा. जिन्दगी चलती रहेगी...
-प्रल्हाद जाधव

Web Title: Moving life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.