मुंबईची वाटचाल : विकासमार्गावरून भकासमार्गाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:51 AM2019-07-04T01:51:10+5:302019-07-04T01:51:32+5:30

अगदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत सिंगापूर शहरात दरवर्षी मुंबईमध्ये अनुभवत आहोत इतकीच दारुण स्थिती होती.

 Moving to Mumbai: From the road to the road to the Barks Road | मुंबईची वाटचाल : विकासमार्गावरून भकासमार्गाकडे

मुंबईची वाटचाल : विकासमार्गावरून भकासमार्गाकडे

Next

- सुलक्षणा महाजन (नगररचनातज्ज्ञ)

वादळे, पाऊस, पूर आणि पाण्यात बुडणारी शहरे जगात अनेक होती. अगदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत सिंगापूर शहरात दरवर्षी मुंबईमध्ये अनुभवत आहोत इतकीच दारुण स्थिती होती. पाऊस आला की शहरभर पूर आणि पाऊस नसला की दुष्काळ. कधी पाण्यामुळे आणीबाणी तर कधी पाण्याच्या अभावाने आणीबाणी. तीच परिस्थिती जपानमधल्या टोकियोची होती. समुद्राला भरती आली आणि पाऊस खूप झाला की थेम्सचे पाणी चढे आणि लंडन पाण्याखाली जाई. पाठोपाठ रोगराईने हजारो लोक प्राण गमवत.

युरोपमधल्या समुद्रकाठी असलेल्या बहुतेक शहरांमध्येही काही दशकांपूर्वी वेगळे घडत नसे. तेथे कालच्याप्रमाणेच पाऊस पडतो, नद्यांना महापूर येतो आणि समुद्राला भरती येते़ पण हाहाकार आणि शेकडो लोकांचे प्राण क्वचितच जातात. तेथे साथीचे रोग आठवणीपुरतेच उरले आहेत. तरीही तेथे भविष्यातल्या हवामान संकटामुळे किती, कोठे आणि कसे पूर येतील, कोणती संकटे येतील आणि त्यावर काय उपाय करता येतील, हे तेथील नगर नियोजन क्षेत्रात कळीचे प्रश्न झाले आहेत. त्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि परिसर नियोजन केले जाते आहे. संशोधनाला प्राधान्य दिले जाते आहे. विकसित शहरांनी प्रलयकारी नैसर्गिक आपत्तींवर नियंत्रण कसे मिळवले? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे ते म्हणजे मानवी प्रज्ञेने विकसित केलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान.

मुंबईमध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने पाऊस आणि पूर यांचे थैमान असूनही त्यावर आपली माध्यमे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, नियोजनकारांना विचारतही नाहीत. ते सतत एकच प्रश्न विचारतात, ह्याला जबाबदार कोण? ह्या प्रश्नाचा रोख असतो तो राजकारणी प्रशासकांकडे. लोकनेते आयुक्तांकडे बोट दाखवतात नाहीतर समस्याच नाही, असे बिनदिक्कत सांगतात. सर्व समस्यांकडे केवळ राजकीय चौकटीतून बघण्याचा रोगच आपल्याला जडला आहे.

इतिहासातील शिवशाही आणि पुराणातील रामराज्य आणण्याच्या स्वप्नापुढे भूगोल आणि विज्ञान, वर्तमान आणि भविष्य यांचा आपल्या राजकारण्यांना विसरच पडला आहे़ नागरिकांनाही त्याच रोगाची बाधा झाली आहे. त्यामुळे पूर आला, दरडी कोसळल्या, वाहतूक कोलमडली, लोकांचे प्राण गेले तरी त्या सर्वांचे खापर फोडले जाते राजकारण्यांच्या डोक्यावर. ज्यांना ना मुंबईच्या भूगोलाचे ज्ञान आहे ना हवामान बदलाच्या संकटाची चाहूल. ना मुंबईच्या आर्थिक भविष्याची काळजी आहे ना लोकांची.

सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष म्हणायचे मला रस्त्यांची ब्रिटिशकालीन नावे बदलायची नाहीत तर सिंगापूरचे भविष्य बदलायचे आहे. असे स्वप्न बघणारे आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारे एकही व्यक्तिमत्त्व आज मुंबईमध्ये नाही हेच मुंबईचे खरे दुर्दैव आहे. पन्नास वर्षांत अविकसित सिंगापूरने विकसित शहरांनाही मागे टाकून जगात मानाचे स्थान मिळविले. अस्मिता आणि डरकाळ्या यांच्यातच मग्न असणाऱ्या मुंबईला सिंगापूर होणे जमलेले नाही. असेच चालू राहिले तर जमणारही नाही.

मुंबईमध्ये पूल पडले, पूर आले, इमारती कोसळल्या, आगी लागल्या, जमीन खचली, अपघात झाले, वाहतूक ठप्प झाली, घातपात झाले; आणि कुठेही काही जरी खुट्ट झाले की माध्यम चर्चांना नुसता महापूर येतो. त्याच बातम्या, तीच दृश्ये, त्याच कहाण्या, तीच रडगाणी, तीच दूषणे, तीच कारणे आणि त्याच त्या सबबी देणारे नेते! आणि त्यांना उचकावणारे टीव्ही चर्चांचे सूत्रधार.

प्रसारमाध्यमांनी सर्वप्रथम हे आपणहून बंद करायला पाहिजे आहे. बदलायला पाहिजे आहे. काही वेगळे पर्याय सर्जनशीलतेने शोधायला हवे आहेत. सिंगापूरने आणि टोकियोने काय केले, कसे केले, कोणती धोरणे राबवली आणि कशी काय राबवली याची चर्चा, दृश्ये लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शहरांवर पूर्वी कोसळलेली संकटे दारुण होती़ त्या गर्तेमधून शहरांना बाहेर काढणा-या नायकांच्या कथा आणि कहाण्या खूप स्फूर्तिदायी आहेत. अशा कथा सांगणारे कथाकारही ते निर्माण करू शकतात.

प्रसारमाध्यमे आणि टीव्ही अशा शहरांच्या कहाण्यांनी आवश्यक ती लोकजागृती करू शकतात. तीच त्यांची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. अन्यथा एकेकाळी भारतातील सर्वांत विकसित शहराचा मान असलेल्या मुंबईचे पूर्णपणे अविकसित आणि मागास शहरात कसे रूपांतर झाले ते जगातील प्रसारमाध्यमे सांगू लागतील, नव्हे आजच ती सांगू लागली आहेत.

Web Title:  Moving to Mumbai: From the road to the road to the Barks Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.