खासदार जाधवांपुढील आव्हान सोपे खचितच नाही!
By किरण अग्रवाल | Published: March 5, 2023 09:49 AM2023-03-05T09:49:13+5:302023-03-05T09:49:27+5:30
Prataprao Jadhav : खासदार प्रतापराव जाधव यांचा अनुभव व राजकीय मातब्बरी पाहता ते या आव्हानाचे व मुख्यमंत्र्यांनी सोपविलेले शिवधनुष्य लिलया पेलतील, अशी अपेक्षा करूया. घोडामैदान जवळ आहे.
- किरण अग्रवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची शिवसेना बांधू पाहत असताना अकोला जिल्ह्यात मात्र त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रारंभातच दुहीची बीजे रोवली गेली आहेत, अशात नवनियुक्त संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांना बुलढाणा वगळता अकोल्याकडे जरा जास्तीचेच लक्ष पुरवावे लागेल.
राज्यात शिवसेनेवरील हक्काची लढाई एकीकडे जोर धरू पाहत असताना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या प्रयत्नात असताना अकोल्यात मात्र त्यांना या लढाईऐवजी स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांमधील बेदीली मोडून काढण्याचीच वेळ आलेली दिसत आहे.
शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन लाभलेले दिसले, त्या प्रारंभीच्या काळात नेमका अकोला जिल्हा त्यांच्यापासून दूर राहिला होता किंबहुना गुवाहाटीत त्यांच्या छावणीत गेलेले जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख परतून ठाकरे गटाकडे आल्याने अकोल्याचा गड काही दिवस ढासळण्यापासून शाबूत राहिला होता; परंतु स्थानिक वर्चस्ववादाच्या लढाईतून अखेर विधान परिषदेतील आमदार विप्लव बाजोरिया व त्यांचे पिताश्री, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे छावणीची वाट धरल्याने अखेर अकोल्याचा शिवसेनेचा गडही ढासळला; पण ज्यांच्यामुळे शिंदे सेनेला हे यश लाभले, त्या बाजोरिया यांच्या विरोधातच व अल्पावधीतच अन्य पदाधिकारी उभे ठाकल्याने लगतच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची अकोल्यात एन्ट्री होऊन जाणे स्वाभाविक ठरले.
माजी आमदार बाजोरिया शिंदे गटात गेल्यानंतर वरीयता पाहता त्यांची तातडीने अकोला जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. बाजोरिया यांच्या माध्यमातून दोन जिल्हाप्रमुख व एक महानगरप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी होऊन जिल्ह्यात शिंदे सेना कामालाही लागली होती; पण बाजोरिया यांनी ज्यांच्या नियुक्त्या करविल्या, त्यातील बहुसंख्या पदाधिकाऱ्यांनीच डाव उलटविला. या पदाधिकाऱ्यांनी विकास निधी वाटपावरून केलेले आरोप बाजोरिया यांनी तातडीने खोडून काढलेत; पण तेव्हापासून दोन्ही घटकात जे द्वंद्व सुरू झाले ते जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या घरात घुसून तोडफोड करण्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे उभे राहण्यापूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय पॅरालिसीसचा झटका बसला असे म्हटले तर वावगे ठरू नये.
आता खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाण्यासोबतच अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जाधव यांची कणखर व तितकीच सम्यक कार्यशैली सर्वपरिचित आहे. त्यामुळेच तर त्यांना आतापर्यंत बुलढाणा जिल्हा एकहाती बांधून ठेवता आला व तेथील दोघा आमदारांसह त्यांनी जवळजवळ सर्वच्या सर्व शिवसेना शिंदे यांच्या पदरात टाकली. अर्थात राजकारण कधीच एकतर्फीपणे होत नसते, संधी मिळाली की नवे नेतृत्व उदयास येतेच; तसे शिवसेनेचेही झाले; पण शिवसेना व जाधव हे समीकरण मात्र अभिन्न राहिले. आता याच कार्यशैलीने अकोला जिल्ह्यातही शिवसेना (शिंदे) उभी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
विशेषता संघटनात्मक पदाधिकारी एकदिलाने व एका कलाने वागतात तिथे अडचण येत नाही. मात्र, अकोल्यातील स्थिती वेगळी असल्याचे एव्हाना चव्हाट्यावर येऊन गेले आहे, त्यामुळे जाधवांपुढील आव्हान सोपे खचितच नाही. विप्लव बाजोरिया यांच्या निमित्ताने विधान परिषदेतील एकमात्र आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहे, त्यामुळेच त्यांची पक्ष प्रतोदपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. शिवाय गोपीकिशन बाजोरिया यांच्या राजकीय प्रभावाकडे डोळेझाक करता येणारे नाही. अशा पार्श्वभूमीवर सबुरीनेच प्रकरण हाताळत पक्षबांधणीचा ‘प्रताप’ जाधवांना घडवून दाखवावा लागणार आहे. विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना अभियानांतर्गत सुषमा अंधारे व अन्य नेत्यांनी जिल्ह्यात आक्रमकपणे संघटनात्मक बांधणी चालविली आहे, अशावेळी फक्त सोशल मीडियामधील सक्रियतेवर वेळ मारून नेणाऱ्या फळीवर विसंबून चालणार नाही, हेदेखील त्यांना लक्षात घ्यावे लागेल. फेसबुक लाईव्ह बघून जनता राजकीय पक्षांशी जुळत नसते, त्यासाठी घराघरापर्यंत पोहोचणारे सच्चे सैनिकच असावे लागतात.
सारांशात, आव्हान मोठे आहे; कारण पक्षातीलच बेदिली निपटून काढणे सर्वात प्राधान्याचे आहे. खासदार प्रतापराव जाधव यांचा अनुभव व राजकीय मातब्बरी पाहता ते या आव्हानाचे व मुख्यमंत्र्यांनी सोपविलेले शिवधनुष्य लिलया पेलतील, अशी अपेक्षा करूया. घोडामैदान जवळ आहे.