खासदार नित्यानंद रायसारख्या वाचाळवीरांना आवरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:22 AM2017-11-23T00:22:02+5:302017-11-23T00:22:28+5:30
नरेंद्र मोदींवर बोट रोखाल तर हातच तोडू, असे तेजस्वी वक्तव्य भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष व खासदार नित्यानंद राय यांनी केले आहे.
नरेंद्र मोदींवर बोट रोखाल तर हातच तोडू, असे तेजस्वी वक्तव्य भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष व खासदार नित्यानंद राय यांनी केले आहे. भाजपच्या काही पुढा-यांनी एवढ्यात संयम गमावला असल्याचे व गुजरात विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी त्यांची भाषा जास्तीची वाचाळ होऊ लागल्याचे हे लक्षण आहे. मोदींनी आपले पूर्वायुष्य फार कष्टातून काढले आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका कराल तर खबरदार असे या नित्यानंदाने म्हटले आहे. मोदींहून अधिक खडतर आयुष्य काढलेली शास्त्रीजींसारखी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर याआधी आली आणि त्यांनाही टीकेला तोंड द्यावे लागले. मात्र त्यांच्या कोण्या झेंडेक-याने अशी भाषा आजवर वापरल्याचे दिसले नाही. पण आताचा काळ या भाषेवर न थांबता तशी प्रत्यक्ष कृती करण्याचा आहे. आता माणसे मारलीच जातात, त्यांना बांधून मारहाण होते, घरे जाळली जातात आणि वस्त्या पेटविल्या जातात. यातले गुन्हेगार सापडत नाहीत आणि मरणारे मरत असतात. आपल्या राजकीय व सामाजिक भूमिकांसाठी मारल्या गेलेल्या माणसांविषयीची श्वेतपत्रिका तात्काळ निघावी अशी आजची स्थिती आहे. दलित आणि अल्पसंख्याकांचे बळीही या पत्रिकेत सांगितले गेले पाहिजेत. बिहारमधल्या एका साध्या समाज मेळाव्यात बोलताना या नित्यानंदाला चढलेला पक्षज्वर पाहून तेथे उपस्थित असलेले भाजपचे अनेक नेतेच हादरल्याचे दिसले. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे त्या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, की बोटे वा हात तोडण्याची भाषा त्यांनी पक्षाचा अभिमान म्हणून वापरली. ते त्यांच्या मनातले विधान मानण्याचे कारण नाही. एका राज्याच्या पक्षाध्यक्षाला सुशील मोदीसारखा उपमुख्यमंत्री हा वकील म्हणून लागतो ही मुळातच मोठ्या शरमेची गोष्ट आहे. मात्र हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर नितीशकुमारसारखे एकेकाळचे विवेकी व संयमी नेते आहेत. त्यांनीही या प्रकाराची दखल घेतली असणार. शिवाय अशा वक्तव्यांचा जनतेवर जो विपरत परिणाम होतो त्याचीही काळजी पक्षाच्या पुढाºयांना वाटलीच असणार. त्यामुळे अशी बाष्कळ विधाने करणाºया पुढाºयांना संयम शिकविण्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग घेण्याचा निर्णय भाजपच्या बिहार शाखेनेच आता घेतला आहे. हा वर्ग केवळ नेत्यांसाठी नसावा ही अपेक्षा येथे नोंदवणे आवश्यक आहे. भाजपने नेमलेले प्रचारी ट्रोलधारक आणि त्यांच्यावतीने सोशल मीडियावर राष्ट्रीय नेत्यांविषयी अत्यंत घाणेरडी भाषा लिहिणारे लोकही या वर्गात आणून बसवले पाहिजेत. वास्तविक नित्यानंद राय हे संघाचे कार्यकर्ते आहेत. या माणसाने आयुष्यभर संघातली बौद्धिके ऐकली असणार. मात्र ही सारी बौद्धिके किती परिणामशून्य असतात आणि ती ऐकून बाहेर पडलेली माणसे केवढी सडकछाप भाषा बोलू शकतात हे या प्रकरणातून प्रगट झाले आहे. लोकशाही ही विवेकाची शाळा आहे असे म्हटले जाते. प्रत्यक्ष विरोधकांविषयीही संयमाने व आदराने बोलण्याची शिकवण या शाळेत दिली जाते. परवा राहुल गांधी म्हणाले, आम्ही मोदींवर टीका करू पण पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कधी बोलणार नाही. जी गोष्ट राहुलसारख्या तरुण नेत्याला समजते ती या नित्यानंदासारख्या प्रौढाला कळू नये हे लोकशाहीचा संस्कार न स्वीकारल्याचेच खरे लक्षण आहे. जगातील प्रतिष्ठित देशांत निवडणुकांचा होणारा प्रचार समोरासमोरच्या वादविवादातून होतो. बरोबरीचे नेते त्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. पण ते कधी संयम सोडत नाहीत. आपल्या पुढाºयांनीही त्यांच्यापासून काही चांगले शिकले पाहिजे.