श्री सार्इंचा ट्रेडमार्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 12:05 AM2017-12-26T00:05:07+5:302017-12-26T00:05:37+5:30

ब्रँड, पेटंट आणि ट्रेडमार्कचा आजचा जमाना आहे. विकत घेतलेल्या वस्तूची आणि ती बनविणा-या संस्थेच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची हमी देणारे ते एक परिमाण मानले जाते. वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे.

Mr. Sarin's trademark! | श्री सार्इंचा ट्रेडमार्क !

श्री सार्इंचा ट्रेडमार्क !

Next


ब्रँड, पेटंट आणि ट्रेडमार्कचा आजचा जमाना आहे. विकत घेतलेल्या वस्तूची आणि ती बनविणा-या संस्थेच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची हमी देणारे ते एक परिमाण मानले जाते. वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे. पण ती भाषा अध्यात्मातही सुरू झाली तर कसे? नेमक्या याच प्रश्नाला वाचा फोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डीच्या श्री साईबाबांचे देश-विदेशात करोडो भक्त आहेत. त्या भक्तांची मांदियाळी शिर्डी शहरात नित्यनेमाने असते. भक्तांच्या विस्तारत चाललेल्या परिवारामुळे शिर्डी देवस्थान सोई-सुविधांच्या आघाडीवर गतीने विकसित होत गेले. त्या विकासातील महत्त्वाचे पाऊल म्हणून तिथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहता येईल. याच विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळाने परवा एकमताने मंजूर केला. या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करतो. हा प्रस्ताव उचित आहे. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र ६२ वर्षांपूर्वी म्हणजे २१ सप्टेंबर १९५५ रोजी, केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने एक आदेश जारी करून श्री साईबाबांच्या प्रतिमेचा, रेखाचित्रांचा अथवा नावाचा वापर करण्यावर निर्बंध घातले होते. त्या आदेशाचा विसर सध्या सर्वांनाच पडलेला दिसतो. ट्रेडमार्क (मानक) कायद्यांतर्गत त्यावेळी तो आदेश निघाला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या निमित्ताने त्या आदेशाची आठवण आता सर्वांनाच व्हायला हवी. गेल्या ६२ वर्षांत श्री शिर्डी देवस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा, मुळासारख्या नद्यांमधून जसे बरेच पाणी वाहून गेले, तसे महाराष्ट्राच्या धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रातही अनेक प्रवाह वाहू लागले. त्या प्रवाहांचाच परिपाक म्हणून प्रति बालाजी, प्रति श्री साईबाबा, प्रति श्री स्वामी समर्थ अशी अनेक स्थाने राज्यात निर्माण झाली. त्या स्थानांकडे भक्तगणांचा लक्षणीय ओढाही असल्याचा आपण अनुभव घेतो. १९५५ साली ट्रेडमार्कच्या कायद्याने श्री साईबाबांच्या नावाच्या वापराला कायदेशीर निर्बंध असेल तर देशभरात प्रत्येक क्षेत्रात श्री सार्इंच्या नावाने थाटलेल्या संस्थांचे काय? अगदी मद्य व्यावसायिक संस्थांपासून समाजसेवी संस्थांपर्यंत आजवर ज्यांनी श्री सार्इंच्या नावाचा अथवा प्रतिमेचा वापर केला, तो कायद्याच्या चौकटीत नव्हता, असे म्हणायचे का? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. देवस्थानच्या नावाचा वापर या विषयाला न्यायालयात आव्हान दिले गेले तर राज्यातील अनेक संस्थांच्या नाम अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आज श्री साई या ट्रेडमार्कवरून सुरू झालेली चर्चा अनेक नावांवरून सुरू होऊ शकते, हे वास्तव लक्षात घेऊन राज्य शासन आणि श्री साईबाबा देवस्थानने या विषयाची कायदेशीर उकल करून संभ्रम दूर करावा, असे आम्हास वाटते. देश-विदेशात साई संस्थानच्या नावे वेब पोर्टल सुरू करून त्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या उकळण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. तो धंदा आजही सुरूच आहे. याबाबत साई संस्थानने तक्रार करूनही पुढे काहीच कारवाई झाली नाही. कारण काय, तर या वेबसाईट्स विदेशात नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. यापुढे साई नावाचा गैरवापर टाळण्यासाठी संस्थानने या नावाचे पेटंट करून घेतले पाहिजे. पण कोणत्याही धार्मिक आस्थेचे असे पेटंट करता येईल का? आणि समजा तसे झाले तर ‘साईबाबा’ हे नाव या संस्थांनची खासगी मालमत्ता बनेल आणि त्यातून नको तो वाद उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तेव्हा अशा स्थळांचा आणि नावांच्या वापराबाबत अधिकृत अशी नियमावली केली गेली पाहिजे.

Web Title: Mr. Sarin's trademark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.