मुक्काम पोस्ट महामुंबई : मुंबईतील निवडणुका बिहार स्टाईलने होणार का..?
By अतुल कुलकर्णी | Published: March 6, 2023 06:28 AM2023-03-06T06:28:26+5:302023-03-06T06:31:52+5:30
निवडणुका येतील... जातील... मात्र, एकदा का सिस्टीम कोसळली तर आपण येणाऱ्या पिढ्यांसमोर कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहोत..?
अतुल कुलकर्णी,
संपादक, मुंबई
काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना भरदिवसा शिवाजी पार्कसारख्या गजबजलेल्या ठिकाणी बॅट आणि स्टम्पने मारहाण करण्यात आली. ठाण्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून झाला. आ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर कशी पाळत ठेवली जात आहे, त्यांना कसे ट्रॅपमध्ये अडकविले जात आहे, याची कथा सांगितली. महामुंबईतील वातावरण अशा प्रकारे दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकार आणखी वाढतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. निवडणुकांमध्ये हाणामाऱ्या, भोसकाभोसकी, दगडफेक, एवढेच नव्हे, तर मतपेट्या पळविण्यापर्यंतचे प्रकार घडले तर आपली वाटचाल बिहारच्या दिशेने झाली, हे समजायला हरकत नाही.
मध्यंतरी ठाण्यात आनंद परांजपे यांच्यावर अकरा पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आहेर यांनी कशा पद्धतीच्या धमक्या दिल्या याची पुराव्यानिशी तक्रार घेऊन गेल्यानंतर चौकशी करूनच गुन्हा दाखल करू, असे सांगून तक्रार करणाऱ्यांना परत पाठविण्यात आले. मटका चालवणारे, तडीपारचे गुन्हे दाखल असणारे लोक सर्वत्र उजळमाथ्याने फिरू लागले आहेत. अनेक पक्ष आणि संघटना अशा गुन्हेगारांना, भाई लोकांना जवळ करीत आहेत.
कशा प्रकारच्या राजकारणाची बीजं आपण पेरत आहोत याची जाणीव राजकारण्यांना नाही असे नाही. मात्र, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, या न्यायाने सध्याचे राजकारण सुरू आहे. या पद्धतीचे राजकारण ही दुधारी तलवार असते. ती कधी आपल्यावरच उलटेल याचा नेम नसतो. मात्र, अनेकदा ही तलवार घेऊन फिरणाऱ्यांना ती आपल्यावर उलटणार नाही याचा अतिआत्मविश्वास त्याला अडचणीचा ठरू शकतो.
महात्मा गांधींनी अहिंसेचा नारा बुलंद केला. मात्र, त्याच ‘महात्मा गांधींचे फोटो छापलेले रंगीत कागद’ वाटप करत हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहे. जग जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर उभे आहे. भारतात आर्थिक मंदी कधी येणार? यावर अर्थतज्ज्ञ आपापली मतं मांडत आहेत. अशावेळी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आर्थिक मंदीच्या शक्यता धुडकावून लावत ‘गांधीजींच्या फोटोंचे’ बेलगाम वाटप केले जाईल आणि सत्तेसाठी सर्वकाही यावर शिक्कामोर्तब होईल. प्रश्न केवळ गांधी दर्शनाचा नाही, तर हिंसक वातावरण सर्वत्र वाढीला लागल्याचा आहे. कोणीही उठतो, कुणालाही ठोकून काढण्याची भाषा करतो. काही ठिकाणी तर ठोकून काढण्याची प्रत्यक्ष कृतीही करतो. महाराष्ट्र याआधी इतका अस्वस्थ कधीही नव्हता. मुंबई आणि ठाण्यात जर हिंसक घटना वाढीला लागल्या, तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील. निवडणुका जिंकण्यासाठी हिंसा हाच एकमेव राजमार्ग आहे, हे लोकांना खरे वाटू लागेल आणि तो दिवस महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात असेल.
अजूनही वेळ गेलेली नाही. जे लोक सरकारवर प्रेम करतात, या व्यवस्थेला आपल्यासाठीची व्यवस्था मानतात, त्या लोकांचा अजूनही या सिस्टीमवर विश्वास आहे. तुम्हाला लोकांनी राज्य करायची संधी दिली, याचा अर्थ तुम्ही वाटेल तसे वागावे, असा होत नाही. गुन्हेगारांना पाठबळ द्यावे, भाई लोकांना ताकद द्यावी, असाही त्याचा अर्थ होत नाही. मुंबई, ठाण्यात अनेक भाई लोक मंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरताना दिसत आहेत. ज्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत, अशांनी खेळाच्या स्पर्धा भरविणे सुरू केले आहे. पोलिस त्याला संरक्षण देत आहेत. हे चित्र कोणासाठीही चांगले नाही.
निवडणुका येतील... जातील... मात्र, एकदा का आपली सिस्टीम कोसळली तर आपण आपल्याच येणाऱ्या पिढ्यांसमोर कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहोत..? आपण या राज्यावर राज्य केले... या राज्यात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले... आपण आमदार होतो... खासदार होतो... असे सांगताना त्या आठवणींचे काही फोटो जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दाखवाल, त्यावेळी त्या फोटोमध्ये तुमच्यासोबत एखादा तडीपारीचा गुन्हा दाखल झालेला माणूस किंवा हिस्टरी शिटर असेल आणि नेमका तोच कोण आहे? असे जर तुमच्या मुलाबाळांनी तुम्हाला विचारले तर तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल...?
गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार..?
आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. दरवर्षी दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. यावर्षी गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार, हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे. आज साचलेले राजकारण दिसत आहे. एकमेकांवर तेच ते आरोप होताना दिसतात. एवढ्यावरच थांबलेल्या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट राज ठाकरे यांची सभा पुढे नेण्याचे काम करेल, असे सगळ्यांना वाटते. त्यामुळेच ही सभा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून टाकणारी असेल.